डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे कोलाज: संस्कृती,मातीतील माणसं व
Read More
डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे
कोलाज: संस्कृती,मातीतील माणसं व त्यांच्या मनाचा..
कोलाज: मानवी मन आणि भावविश्व समृद्ध करणारे ललित लेखन
प्राचार्य डॉ. नारायण टाक एक लोकप्रिय वक्ते म्हणून सुपरिचित आहेत. भाषण व व्याख्याने यातून समाज बदलू शकतो तसेच या प्रभावी माध्यमातून समाज मनाचे भरणपोषण होते यावर त्यांचा ठाम विश्वास विश्वास आहे. त्यांना भाषण व व्याख्यानांमधून ज्या गोष्टी व्यक्त करता आल्या नाहीत असे अनेक अनुभव व घटनांना त्यांनी शब्द व चित्राच्या माध्यमातून आपल्या पहिल्याच ललित लेखनामधून मुक्त वाट करून दिली आहे. ‘कोलाज, हा त्यांचा पहिला पण लक्षवेधी असा ललितलेखसंग्रह. वयाच्या साठीनंतर लेखन केल्यानंतर त्यात परिपक्वता व प्रगल्भता येणे स्वाभाविक आहे. ती या संपूर्ण लेखनात जाणवते. डॉ.टाक हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध महाविद्यालयांमध्ये विशेषतः सांगवी, नसरापूर, सासवड इत्यादी ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केले आहे. मूळचे ते सासवडचे आणि देवाचे टाक बनविणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. जेजुरीच्या खंडेराय देवस्थानाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून पालथा घातला व ढवळून काढला आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारत व भारताबाहेर विविध महत्वपूर्ण अशा स्थळांना त्यांनी भेट दिली.विविध क्षेत्रांमध्ये वावरत असताना त्यांना जे वेगळं अनुभवविश्व प्रत्ययाला आले ते त्यांनी आपल्या ललित लेखनातून अत्यंत प्रभावीपणे व परिणामकारकपणे मांडलेले आहेत. साधी-सोपी, सहजप्रवाही शैली, तिला लाभलेला वक्तृत्वाचा बाज, त्यास मिळालेली चित्रकलेची जोड,प्रगतिशील व पुरोगामी दृष्टिकोन यामुळे ‘कोलाज’ या संग्रहातील प्रत्येक लेख केवळ कोलाज न राहता प्रत्येक माणसाचे अंतरंग ढवळून काढतो. त्याच्यातील माणूसपणाला साद घालतो, हे या संग्रहाचे वेगळेपण नोंदवता येईल.
‘कोलाज’ या ललितलेख संग्रहात एकूण 22 लेख आहेत. यामधील प्रत्येक लेख स्वतंत्र पण दुसऱ्या लेखाशी अंतरिक संबंध असलेला आहे. या सर्व लेखांमध्ये एक समान धागा जाणवतो तो म्हणजे लेखकाने घेतलेला माणूस व माणुसकीचा शोध. जेजुरीचा खंडेराया हा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. या खंडेरायाचे वास्तव्य ज्या गडावर होतं तो गड म्हणजे जेजुरी. जेजुरी ही खंडेरायाची राजधानी. या जेजुरी गडाचे अत्यंत भावरम्य वर्णन लेखकाने केले आहे. त्यांनी या लेखामध्ये खंडेराय हे श्रम करणाऱ्या घाम गाळणाऱ्या कष्टकरी वर्गाचे मुख्य दैवत आहे. सर्व जाती-धर्माचे लोक श्रद्धेने आपल्या दैवताकडे आपल्या सुखदुःखाची व्यथा मांडतात. हा संपूर्ण नक्षीकाम केलेला गडकोट, या मंदिरासमोरील भलं मोठं कासव, येथील खंडा, गडाच्या पायथ्याशी असलेले जेजुरी गाव, गावाच्या दोन बाजूला असलेले तलाव, चिंचेची बाग,कडेपठार, होळकर तलाव, छत्री मंदिर, प्राचीन लवथळेश्वर मंदिर, पांडेश्वर मंदिर, गडावर साजरे होणारे चैत्र पौर्णिमा, सोमवती अमावस्या, दसरा दिवाळी इत्यादी सण यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले आहे.
दुष्काळाचे सावट आपल्या महाराष्ट्रावर अनेक वेळा आलेले आहे. या दुष्काळाच्या झळा लेखकाने स्वतः अनुभवल्या आहेत. १९७२ सालच्या दुष्काळात जेजुरी गड परिसरामध्ये दुष्काळाने केलेली वाहतात व त्यातही माणुसकी जपणारी माणसं येथे दिसतात. या दुष्काळात पाण्यासाठी वण- वण फिरणाऱ्या बायाबापड्या, या काळात सुरू असणारी रोजगार हमीची कामे, जिथे माणसालाच खायला नाही तिथे जनावरांना कसे जगावणार?म्हणूनच शेतकरी आपले बैल-कृषीधन पूजा करून नसरापूर- वेल्हा या भागातील डोंगरामध्ये सोडतो. माझी दावण मोकळी झाली,असं म्हणत मोठ्याने हुंदका देणारी बैलाची मालकीण दुष्काळाची तीव्रता व्यक्त करते.
बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथून जेजुरीला प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये देवासारखा मदतीला धावून आलेला गरीब बाबू हमाल आजही लेखक गर्दीमध्ये शोधतो आहे. श्रमिक आणि माणुसकी यांचं नातं घट्ट असतं हे लेखकाने मांडलेले निरीक्षण खूप काही सांगून जाणार आहे.
खंडेरायांचा भक्त ‘वाघोबा’हे व्यक्तिचित्र लेखकाने अत्यंत हुबेहूब व बारकाव्यासह रेखाटले आहे. अत्यंत नम्र,इतरांविषयी आदर बाळगणारा, महिलाविषयी सन्मानाची भावना ठेवणारा, कुणाचेही मन न दुखावणारा,मीतभाषी वाघोबा स्वतःच्या मांडीला काप घेऊन त्यामध्ये खंडेरायांना पेटीत बंद करून ठेवतो. देवाला मी माझ्याजवळ कायमस्वरूपी ठेवले आहे असे म्हणतो. अशी माणसंही समाजात असतात.खंडोबाच्या वाघ्याने कष्ट करायचे असतात, लबाडी करायची नसते असेही तो सांगायला विसरत नाही. अशी श्रद्धाळू आणि नैतिकता पाळणारी माणसेसुद्धा या संग्रहात आहेत.
योद्धा खंडेराय हस्तलिखित ‘मार्तंड विजय’ हा ग्रंथ पुनरलिखित करण्याचे ऐतिहासिक काम लेखकाच्या वडिलांनी करून एक ऐतिहासिक दस्तऐवज सर्वांसाठी उपलब्ध करून दिला.या ग्रंथात खंडेरायांचा संपूर्ण जीवनप्रवास व इतिहास कथा रूप स्वरूपात आलेला आहे. खंडेरायाचे भक्त, अभ्यासकांसाठी हा ग्रंथ एक दुर्मिळ ठेवा आहे. तो टाक कुटुंबियांनी जपून ठेवला आहे.
‘कोलाज’संग्रहातील व्यक्तिचित्रे अत्यंत प्रभावीपणे लेखकाने चित्रित केलेली आहेत. पु.ल. देशपांडे,व्यंकटेश माडगूळकर यांनी साकारलेल्या व्यक्तिचित्रांच्या तोडीची ही व्यक्तिचित्रे आहेत.भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी भेटलेली म्हातारी तिला लेखकाने ‘बनेश्वरची म्हातारी’म्हटले आहे. ही सत्तरी पार केलेली म्हातारी आपल्याला खूप अंतर्मुख करून जाते.ही वृद्ध महिला तरुणपणामध्ये अत्यंत काबाडकष्टाने उभी राहते.गावपुढाऱ्यांनी तिच्या कष्टाची माती केली. मुलगाही तिला सोडून गेला. मग शेवटी जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणावर मस्तक ठेवून त्याची सेवा करते. मजुरी मिळत नाही म्हणून शेवटी ती तिथेच पोट भरण्याचा विचार करते. शेवटी बनेश्वरला तुला चांगली मदत होईल अशा सल्ल्याने बनेश्वरला येते.तिथे जिलेबी व इतर फास्टफूड नको,तर मला जेवण हवय असा आग्रह लोकांना करते.म्हणजेच दारोदार भटकणाऱ्या माणसांची गरज काय आहे हेदेखील इथे प्रकर्षाने जाणवते.आजही धनदांडग्यांची दंडेलशाही संपलेली नाही.सामान्यांचा आक्रोश संपला नाही.याचे उत्तर एकच स्वातंत्र्याची लढाई अजून संपली नाही हे यानिमित्ताने लेखकाने बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जीवनामध्ये रक्ताच्या नातेवाईकांनी सोडून दिल्यावर एकमेकांना साथ देणारे सातबा आणि गणपत हे ‘जोडीदार’ अनोखे आहेत. सातबा प्रवचन शिकून उदरनिर्वाह करण्याचा मनोदय व त्यासाठीची तयारी दर्शवितो ही गोष्ट उल्लेखनीय आहे. शेवटी ज्याचे जगात कोणीच नाही त्याला त्याचा जोडीदारच तारतो हे या लेखातील लेखकाचे निरीक्षण महत्त्वाचे आहे
कोणत्याही माणसाच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व असतं.कला त्याच्या सुखदुःखामध्ये त्याला साथ देत असते.किंबहुना त्याला कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे बळसुद्धा देत असते. कलेमुळे मिळालेले मानसन्मान, त्याचबरोबर संपूर्ण जगभर केलेली भ्रमंती हेदेखील त्यामुळेच शक्य झाली. म्हणूनच प्रत्येकाने कलेशी मैत्री करावी असेही आवाहन लेखक करतो. वक्तृत्वकला आणि चित्रकलेने मला आयुष्यभर साथ दिली. माझ्या आयुष्यातील समाधानाचा व आनंदाचा आलेख जर कोणी उंचावला असेल तर तो या दोन कलांशी असलेल्या मैत्रीनेच, कबुली जबाब लेखक प्रामाणिकपणे देतो.
आपल्या समाजात प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा ठासून भरलेल्या आहेत. आपले संत,समाजसुधारक,अगदी डॉ. दाभोळकरांपर्यंत अनेक मंडळींनी या अंधश्रद्धा जाव्यात यासाठी प्रयत्न केले. पण भारताच्या सर्वच प्रांतात भूताविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या भयातून जन्मलेल्या आहेत, हे शाश्वत सत्य कुणीही नाकारू शकत नाही. याचाही शोध लेखकाने आपल्या जीवनातील ‘भुताचे पलायन’कशा पद्धतीने झाले या लेखातून घेतला आहे.
सांगवीमधील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात नोकरीला असताना भेटलेला शंकर हे एक अफलातून व्यक्तिमत्व. आत्मस्तुती आणि स्वतःच्या कल्पनाविश्वात रममान असणारी माणसं यांचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकर.शंकरला त्याच्या बायकोने का चोपून काढले याचा शोध जेव्हा लागतो तेव्हा कोणालाही हसू आवरणार नाही. चोप या लेखामध्ये हे विनोदी वर्णन आले आहे. आपल्या समाजामध्ये अनेक लोक दारू पिऊन आपल्या बायकांशी अत्यंत वाईट पद्धतीने वागतात.किंबहुना त्यांना मारझोड करतात.अशा मारहाण होणाऱ्या व कोंडमारा होणाऱ्या अनेक स्त्रियांच्या अंगात येते.त्या आपल्या प्रतापी नवऱ्यास ‘चोप’ देतात,याचे रसभरीत वर्णन या लेखांमध्ये आलेले आहे.
महामार्गाच्या आसपास उदयास आलेल्या निमशहरी अशा गावांमध्ये सुद्धा आता जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. तिथे सुरू असलेले खरेदी विक्रीचे व्यवहार,त्यामध्ये दलाल लोकांचा झालेला सुळसुळाट,मालकाच्या सांगण्यावरून या मंडळींनी केलेली दंडेली,सामान्य शेतकरी व कष्टकरी लोकांचे त्यांनी तोडलेले लचके हे सर्व ‘दत्तू’या लेखातून आपणास प्रत्ययास येते.
‘कन्नड रिक्षावाला’ हा या ललितलेख संग्रहातील हृदयस्पर्शी असा लेख. नातेसंबंध,भाषा,प्रदेश यांच्या पलीकडे माणुसकी हे नातं अत्यंत मोठं आहे.स्वार्थ, भाषा, प्रांत यांच्या संकुचित भिंती मोडणारा व मदतीला धावून येणारा कन्नड रिक्षावाला हा देवापेक्षा कमी नाही तो केवळ त्यातील माणुसकीमुळे.
याशिवाय या ललितलेख संग्रहामध्ये बुक्का आणि भंडार, आर्थिक सुबत्ता आणि स्वातंत्र्य, सूर्योदय, जेजुरीतील सासू- सुना, चिंध्यादेवी, गाढविणीचे दूध, मानवी नंदीबैल, रुढींचा जन्म यासारखे वैशिष्ट्यपूर्ण लेख आहेत.या लेखांमधील सहज सोपी भाषाशैली व सूक्ष्म समाज निरीक्षण थक्क करणारे आहेत.लेखकाने प्रत्येक लेखास दिलेली रेखाचित्रांची जोड या ललितलेख संग्रहाचे सौंदर्यमूल्य वाढविणारे आहे.
Show Less