डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या
Read More
डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचरित्राचा वास्तव वेध घेणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने आढळते. यामध्ये प्रामुख्याने डॉ.आ.ह.साळुंखे,सदानंद मोरे,भालचंद्र नेमाडे’ दिलीप पुरुषोत्तम चित्रे,किशोर सानप इ. लेखकांनी तुकोबारायांचे चरित्र जनमानसासमोर एक आश्वासक भूमिका घेऊन व कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्यान्वेषी पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नव्या पिढीतील एक महत्त्वाचे नाव जोडावे लागेल ते म्हणजे विनायक होगाडे. विनायक होगाडे यांचे ‘डियर तुकोबा’हे कादंबरीवजा पुस्तक या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये लेखकाने ‘तुका रामायण’,’मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’, आणि ‘डियर तुकोबा’ अशा तीन भागात तुकोबांची चरित्रगाथा वास्तवपणे मांडण्याचा एक अनोखा प्रयोग केला आहे. यादृष्टीने तो मराठी साहित्यामध्ये नावीन्यपूर्ण म्हणून खूप महत्त्वाचा प्रयोग आहे. यामध्ये त्यांनी केलेले तुकोबारायांचे चित्रण हे अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक स्वरूपाचे झाले आहे. कादंबरीमध्ये त्यांनी ४०० वर्षांपूर्वीचे तुकोबाकालीन सांस्कृतिक राजकारण व आजचे सामाजिक सांस्कृतिक राजकारण यांचा सूक्ष्मपणे वेद अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तुकोबारायांचा कालखंड हा चारशे वर्षांपूर्वीचा असला तरीसुद्धा आजच्या काळात सुद्धा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक या संदर्भात केलेले चिंतन तंतोतंत लागू पडणारे आहे.या काळाच्या कसोटीवर तुकोबारायांची गाथा आजही लोकगंगेत तरली आहे . या कादंबरीतून आपण जगद्गुरु तुकोबारायांना भेटत आहोत असाच भास सातत्याने होत राहतो. एखाद्या कवीला स्वतःच आपल्या कविता इंद्रायणीत बुडवायला लावणे आणि स्वतः त्याने त्या बुडवणे याचे किती दुःख झाले असेल तुकोबांना? याचा प्रत्यय या कादंबरीतून पानोपानी येतो.त्यामुळेच ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’हे यातूननच आले असावे. अलीकडेच एका लेखकाचा मृत्यू वाचण्यात आला. यापेक्षा काय जीवघेणे व भयंकर काय असू शकते. तुकोबारायांनी हे जीवघेणे दुःख पचविले आणि ते खऱ्या अर्थाने ‘जगद्गुरु’ झाले.तुकोबांशी साधलेला संवाद हा नव्या पिढीला जगद्गुरुंशी जोडणारा आहे. आजच्या जगण्याच्या संदर्भात तुकाराम महाराज हे आपणा सर्वांना समकालीन वाटणे हे अपरिहार्य आहे आणि तुकोबारायांच्या अभंगाचा अन्वयार्थ आजच्या काळात कसा लावता येऊ शकतो हे सुद्धा या पुस्तकातून आपणास सहज पाहता येईल.कविवर्य विंदा करंदीकर यांनी ‘तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला’ ही कविता लिहिली आहे. पण ‘डियर तुकोबा’ या कादंबरीमध्ये तुकोबांच्या भेटी महात्मा गांधी, गाडगेबाबा, साने गुरुजी, सॉक्रेटिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज,गॅलेलियो,कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर हे आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय संवाद होईल हे या कादंबरीत कवितेच्या माध्यमातून विनायक होगाडे यांनी हे काल्पनिक पध्दतीने चित्रित केलेले आहे. ते अवर्णनीय आहे.ते कुठेही काल्पनिक वाटत नाही.किंबहुना या महापुरुषांना यामुळे एक वेगळ्या उंचीवर नेण्यात ते यशस्वी झाले आहेत.कुठेही ते काल्पनिक व कृतक वाटत नाही ‘शेवटी दोघे निघूनिया गेले एक दिशा। कौतुक आकाशा आवरेना।’ हा प्रत्येक कवितेचा शेवट अत्यंत भावपूर्ण,उत्कट व समकालीन संदर्भाचे भान देणारा आहे. तो अंतरंगातून आला आहे असे वाटते तुका म्हणे झरा आहे मूळचाची करा ही तुकोबांची अनुभूती इथे प्रत्यास येते.
‘डियर तुकोबा’या कादंबरीचे लेखक विनायक होगाडे हे प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत असल्यामुळे तेथील वृत्ती-अपप्रवृत्ती,चांगल्या- वाईट बाबींचे भान त्यांना आहे.याचाच एक भाग म्हणून आजच्या माहिती तंत्रज्ञान व समाजमाध्यमांच्या युगात प्रत्यक्षात प्तुकोबारायावरच जर मीडिया ट्रायल झाली तर आजची समाजमाध्यमे कशा पद्धतीने याकडे पाहतील याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ या भागात केले आहे.हे तुकोबारायांना आजच्या काळाशी व पिढीशी जोडणारे आहे. आजच्या समाज माध्यमात असलेल्या अपप्रवृत्ती,बाजारीकरण,सत्ताशरणता याचाही पंचनामा करण्यास लेखक मागेपुढे पाहत नाही. “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा।
इतरांनी वहावा भार माथा।” हे वादग्रस्त वक्तव्य जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केल्यानंतर व त्यांचे कीर्तन व कार्यामुळे त्यांच्यावर धर्मपीठाने खटला दाखल केला आहे. त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा आहे इशारा प्रतिगामी मंडळींनी दिला आहे.या ब्रेकिंग न्यूजने कादंबरीची सुरुवात सुरू होते. तुकोबारायावर वर्णाश्रम धर्म बुडवल्याचा आरोप दाखल होतो. मग तिथून तुकोबाराय यांचा पक्ष व प्रतिगामी सनातनी मंडळींचा पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होतात.यातून तुकोबारायांचा संपूर्ण जीवनपट इथे आपल्यासमोर विविध समाज माध्यमांच्या द्वारे लेखक उलगडतो. मंबाजी गोसावी, रामेश्वर भट,सालोमालो,इ.सनातनी ब्रम्हवृंद एका बाजूला आणि तुकोबाराया व बहुजन समाजातील सर्व स्त्री-पुरुष संत मंडळी दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने दावे प्रतिदावे होतात.मीडिया ट्रायल चालते. टीव्ही, ट्विटर फेसबुक, याच्यावर हॅशटॅग वार सुरू होते. व्हाट्सअप तुकाराम विरुद्ध वर्णाश्रम धर्म ही लाइव्ह महाचर्चा रंगते.टीव्हीवर प्रमो झळकू लागतात. मीडियावाल्यांनी तर तुकारामांना थेट धर्मविरोधातच उभ केलं असतं आणि सनातन्यांची बाजू हाच धर्म असल्याचा अप्रत्यक्ष निवाडा देखील मीडियाने आजच आधीच करून टाकला होता. यादरम्यान आवलीची’टाळकरी यांची मनस्थिती, तुकोबांचा दोस्त गुळ्या याचे चित्र अत्यंत प्रभावी उतरले आहे. तुकोबारायांना झालेला साक्षात्कार, कान्होबाची हृद्य संवाद,त्यानंतर इंद्रायणी नदीमध्ये स्वहस्ते गहाणखते बुडवण्याचा कार्यक्रम, इंद्रायणी नदीमध्ये गाथा बुडवल्यानंतर धरणे आंदोलनास बसलेले तुकोबा, त्यांचे उपोषण, सत्याग्रह आणि ट्विटर व इतर सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’ या हॅशटॅगमुळे त्यांच्या अभंगावर बंदी असतानाही लोक ते शेअर करत होते. सायंकाळी ट्विटर फेसबुकवर ‘हॅशटॅग तुका म्हणे’ ट्रेंड झाला होता. त्यामुळे विठ्ठल हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडलेले आहे.जगभरामध्ये बंदी आलेली आहे आणि तुकोबारायांचा शिष्य संताजी जगनाडे मात्र सर्व अभंग प्रसारित करत आहे. यातून तुकोबांच्या गाथा तरल्या. जगभर तुकोबांची कविता पोहोचली.गाथा तरल्याची तक्रारदारांनी स्वतःहून घोषणा केली. अशा पद्धतीने या भागाचा समारोप होतो. याला काही रेखाचित्रांचीही जोड दिलेली आहे ती रेखाचित्रे मूळ आशयाला अनुरूप व ठसठशीत रूप देणारी आहेत.
‘डियर तुकोबा’ या कादंबरीच्या तिसऱ्या भागात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची लोकप्रियता व त्यांनी केलेल्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर तुकोबांशी साधलेला हृद्य संवाद भावपूर्ण भावपूर्ण उतरला आहे. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।” असं सांगणारी तुकोबांची कविता जगभर पोहोचली.सेज तुका या नावाचा सर्व जगभर ट्रेंड होऊन तुकोबा जगाच्या केंद्रस्थानी आले. ‘ज्ञानबा-तुकाराम’हे आत्मभानासाठी आचरणाचं सूत्र झालेले आहे. तुकोबांची कविता जी एकेकाळी डेंजर ठरवली गेली होती ती आज जगाची दृष्टी बनलीय. देहू गाव, इंद्रायणीचा काठ, एनसीक्यूवर
विठोबा, भांबानाथाचा डोंगर, तुका झालासे कळस म्हणणारी बहिणाबाई,तुकोबांच्या कवितेतील संतत्वाचा, कवित्वाचा, भक्तीचा धागा, त्याचबरोबर बंडखोरीचा आणि नैतिकतेचे धागा लेखकांना नेमकेपणाने उलडलेला आहे.जगात कुठलेही माध्यम नसताना तुकोबांची कविता ही अनेक वेळा पाण्यात बुडवूनही न लोकमानसात कशी टिकून आहे याचे वर्म उलगडण्याचा प्रयत्न विनायक होगडे यांनी केलेला आहे. कर्ज खतांच्या वह्या ऐन दुष्काळात पाण्यात बुडवण्याचा साक्षात्कार तुकोबांना झाला.एवढं सारं फ्रस्ट्रेशनआणि त्रास सोसूनही तुकोबांनी आत्महत्येचा विचार कधीही केला नाही.लेखकाला त्याचं साहित्य नष्ट करायला सांगणं म्हणजे आत्महत्या करायला सांगण्यासारखं. परंतु इंद्रायणीच्या काठी तेरा दिवस उपोषण करून शेवटी पाण्यात बुडालेले अभंग लोकगंगेत नेमके कसे तरले हे मी इंद्रायणीला विचारेन म्हणतो हा तुकोबांबरोबरचा संवाद हृदयस्पर्शी आहे.. ज्या ज्या वेळी तू अतिशय व्यथीत झालास त्या त्यावेळी तू सृजनाचा उत्कट आनंद अनुभवलास.आवलीने तुला काव्यनिर्मितीला आधार दिला आणि तू सनातन व्यवस्थेचा पाया मोडकळीस आणला हे लेखकाचं निरीक्षण खूप काही सांगून जाते.
जगण्याचं मर्म।अस्खलीत प्रेम ।
अक्षरांचा श्रम।तुकाराम।।
विवेकाचं गाणं।विचाराचं भान
कवितेचा प्राण तुकाराम।।
सृष्टीचा अंकुर।आशेचा किरण।
जीवाचे जीवन।तुकाराम।।
मुक्याचा तो शब्द।अपंगांचे बळ।
आधाराचे मूळ।तुकाराम।।
विद्रोहाचे बीज।कोसळती वीज
रांगडा आवाज।तुकाराम।।
प्रवाही राहतो। उसळी मारतो ।
पुन्हा खळाळतो। तुकाराम।।
सांगून उरतो। खलांना पुरतो।
गाडून उगवतो। तुकाराम।।
शेवटी तुकोबांची कविता त्यांचा जीवनसंघर्ष व जगण्याचं मर्म उलगडणारी आहे.
Show Less