स्वाधीन की दैवाधिन?
By Salvi Ramchandra
दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मेजर साळवी यांची रोमहर्षक सत्य युद्धकथा. 'स्वाधीन की दैवाधीन ?' ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथेतून प्रकट होत असेल तर ती माणुसकीची भावना. जाती, धर्म, भाषा, देश इत्यादी मानवनिर्मित भेदांनी जखडली न जाणारी, या भेदाचे अडथळे न जुमानणारी माणुसकीची भावना. एका युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी हे या पुस्तकात ग्रथित झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. या अनुभवकथेचे आभाळ ढगाळलेले आहे, कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जना, काळाकिट्ट अंधार असल्या वातावरणातून ही मेजर रा. गो. साळवी यांची
Book Reviewed by Shri Mohan Pawar ,HOD, Deparment of Histroy, MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco Nashik
मी ज्या पुस्तकाचे परीक्षण करीत आहे ते पुस्तक म्हणजे मेजर रामचंद्र साळवी यांचे दुसऱ्या महायुद्धातील त्यांच्या सहभागाची अत्यंत रोमहर्षक कथा होय. या पुस्तकाचे नाव आहे, ‘स्वाधीन की दैवाधीन?’ हे पुस्तक १९६३ साली मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केले होते.आता ते बाजारात उपलब्ध नाही.या पुस्तकाला तत्कालीन संरक्षणमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना लाभली आहे. शिवाय न.शे. पोहनेरकर तसेच सुप्रसिद्ध समीक्षक वा.ल. कुलकर्णी यांचेही मनोगत छापले आहे. या मराठीच्या सारस्वतांनी अत्यंत ह्रद्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या वाचण्यासारख्या आहेत.ग. त्र्य. माडखोलकर यांचा आशीर्वाद या पुस्तकाला लाभला आहे. पुस्तकात सुरुवातीलाच मेजर साळवी यांचे रेखाचित्र असून तेथे गीतेतील श्लोक ‘यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: तत्र श्रीर्विजयो भूतिधृवा नितीर्मतिर्मम’ लिहिला आहे. यशवंतराव चव्हाण म्हणतात, “श्री साळवी यांच्या लष्करी जीवनातील रोमहर्षक इतिहास ऐकत असताना माझ्या मनात अनेक विचारतरंग येऊन गेले. एका सुखवस्तू मध्यमवर्गीय तरुणाने बुद्ध्या खडतर जीवन स्वीकारून जो अनुभव घेतला तो आजच्या भारतातील तरुण पिढीसमोर येणे आवश्यक होते. साहसीजीवनाचे आकर्षण तरुणांना असले पाहिजे; त्याशिवाय राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही व क्षात्रधर्माची वाढ होत नाही. माझी खात्री आहे की, श्री. साळवी यांच्या जीवनाची ही कथा जेव्हा महाराष्ट्रात घरोघर वाचली जाईल तेव्हा कळत नकळत त्या क्षात्रधर्माचे बीज पेरले जाईल. दुसऱ्या महायुद्धात युरोपच्या भूमीवर कशा तऱ्हेचे जीवन लक्षावधी कुटुंबांना भोगावे लागले आहे त्याचे हृदयद्रावक चित्र इटलीतील त्यांच्या अनुभवातून चित्रित झाले आहे. हवामान, इतिहास, भाषा ही सर्व वेगवेगळी असली तरी मानवी मन समान भावनांनी कसे प्रेरित होत असते; व युद्धाच्या अग्नीवर्षावाने भाजून निघालेल्या जनसामान्यांमध्येही सौहार्दाचे ओलावे किती विपुल असतात याचे हृदयंगम अनुभव या कथेत आढळतील.” तर पोहनेरकर यांनी म्हटले आहे, “दुसऱ्या महायुद्धात मेजर साळवी यांनी तो टोब्रुकच्या युद्धात भाग घेतला. युद्धकैदी म्हणून ते जर्मनांच्या ताब्यात काही दिवस होते. तेथून शिताफीने निसटून इटलीतील व्हिला सान सबस्तिअनो या छोट्या गावात छपून राहिले. या गावी त्यांना जसे अनेक रोमांचकारी भयप्रद अनुभव आले, तसेच माणुसकीच्या जिव्हाळ्याने ओथंबलेले अनुभव ही आले. या सर्व अनुभवांची मोठ्या जिव्हाळ्याने सांगितलेली ही कहाणी होय.” सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी लिहिले आहे की, ‘स्वाधीन की दैवाधीन?”ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथेतून प्रकट होत असेल तर ती माणुसकीची भावना जाती, धर्म, भाषा, देशइत्यादी मानवनिर्मित भेदांनी जखडली न जाणारी, या भेदांचे अडथळे न जमणारी माणुसकीची भावना. एका युद्धकथेतूनही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रकट व्हावी हे या पुस्तकात ग्रंथीत झालेल्या भीषण रम्य अनुभवांचे लक्षणीय यश आहे. या अनुभवकथेचे आभाळ ढगाळलेले आहे, कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जना, काळाकुट्ट अंधार असल्या वातावरणातून ही मेजर रा. गो. साळवी यांची कल्पनेलाही लाजविणारी युद्धकथा प्रवास करीत आहे. शौर्य, शिस्त, सावधानता, प्रसंगवधान कौर्य, उपासमार, आशा, हतबुद्धता,असहाय्यता इत्यादी छायाप्रकाशांनी तिचा मार्ग अथपासून इतिपर्यंत रंगलेला आहे. परंतु ज्या एका ध्रुवताऱ्याच्या रोखाने तिची वाटचाल तिला कळत नकळत होत आहे तो ध्रुवतारा माणुसकी हाच आहे. सैनिकी तळावर युद्धाच्या खाईत युद्धबंद्यांच्या तुरुंगात, जीवावर उदार होऊन शत्रूच्या हातावर तुरी देऊन पडणाऱ्यांमध्ये, एवढेच नव्हे तर धर्म, जात, देश, वर्ण या सर्वच दृष्टींनी परकीय ठरणाऱ्यांमध्येही हा माणुसकीचा हुंकार सदैव कसा ऐकू येतो हेच ही युद्धकथा दाखवीत आहे. मृत्यूवर जीवनाने मिळवलेला विजय हाच जणू तिचा विषय आहे.”
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लाखो भारतीय सैनिक दोस्त राष्ट्रांच्या बाजूने जगाच्या कानाकोपऱ्यात हिटलरच्या आणि इटालीच्या सैन्याच्या विरोधात लढले. हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. हजारो जखमी झाले. हजारो बेपत्ता झाले.जेसुदैवी होते ते परत आले. त्या सुदैवीसैनिकांपैकी एक म्हणजे मेजर रामचंद्रसाळवी होय. सन १९४२पासून ते १९४५पर्यंत ते या युद्धाच्या खाईत लोटले गेले. देवासचे संस्थानाधिपती (नंतरचे कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख शहाजी छत्रपती) जनरल विक्रमसिंग पवारांना सुट्टी देऊन ब्रिटिश लष्कराने त्यांचे जागी मेजर साळवी यांना ७००सैनिक घेऊन उत्तर आफ्रिकेच्या वाळवंटामध्ये नियुक्त केले. हे ७००सैनिक म्हणजे बेळगावच्या मराठा लाईट इंफ्रट्रीकॅम्पमधीलमराठा सैनिक होय. उत्तर आफ्रिकेमध्ये ब्रिटिश लष्कर आणि जर्मन लष्कर यामध्ये तुंबळ युद्ध होते. या युद्धात ब्रिटिश लष्कराचा पराभव होऊन मेजर साळवी इटालियन लष्कराचे कैदी झाले. त्यांची रवानगी इटलीमध्ये करण्यात आली. तेथे असताना त्यांनी कैदखान्यातून स्वतःची सुटका करून घेतली. मजल दरमजल करीत ते एका खेडेगावामध्ये आले. ते खेडेगाव म्हणजे विला सान सबास्टियानो होय. या गावातील इटालियन सामान्य नागरिकांनी मेजर साळवी आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना आश्रय दिला. कालांतराने येथे जर्मन तुकड्या या पळून गेलेल्या युद्धकैद्यांच्या पाठलागावर आल्या. तेव्हा त्या गावातील लोकांनी अत्यंत उदार मनाने या पाचही लोकांना आपल्या घरामध्ये आश्रय दिला. विशेषत: अदलीना नावाच्या उदारअंतकरणाच्या एका इटालियन स्त्रीने जीवावर उदार होऊन मेजर साळवी यांचा जीव वाचविला. कारण तिचा पती इटालियन लष्करामध्ये असताना ब्रिटिशांचा युद्धकैदी होऊन भारतात तुरुंगात होता. त्याला भारतीयांनी उत्तम वागणूक दिलेली पाहून तिच्या मनामध्ये भारतीयांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. त्या भावनेपोटी, माणुसकी पोटी तिने मेजर साळवींना आपल्या घरामध्ये आश्रय दिला. जर्मन लष्कराचा राबता वाढल्यानंतर तेथून जवळच असलेल्या डोंगरावर त्यांनी आश्रय घेतला. एके दिवशी एक जर्मन सैनिक डोंगरावर चढून आला. तो ज्या खडकावर उभा होता त्या खडकाच्या भेगेमध्ये मेजर साळवी लपून बसले होते. त्या सैनिकाची नजर थोडी जरी खाली गेली असती तरी त्याने आपल्या स्टेनगनमधून गोळ्या झाडून साळवींना संपविले असते. परंतु तसे घडले नाही. असे अनेक जीवावरचे प्रसंग मेजर साळवींनी आपल्या या आत्मकथेतून सांगितले आहे. खरे तर इटाली हे राष्ट्र दोस्त राष्ट्रांच्या विरुद्ध जर्मनीच्या बाजूने लढत होते. तरीसुद्धा या ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांना या इटालियन खेडेगावातील सामान्य लोकांनी आश्रय दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. कालांतराने न्यूझीलंडच्याफौजाइटलीमध्ये दाखल झाल्यानंतर हे गाव त्यांनी ताब्यात घेतले. मेजर साळवींना त्या गावाचेप्रशासक म्हणून नेमण्यात आले. महिनाभरात साळवींची भारतात परत येण्याची वेळ आली. सर्व गावकऱ्यांनी भाषणे केली.साळवी यांनी या निरोपाचे हृदय पिळवटून टाकणारे वर्णन केले आहे. ते लिहितात, “मी त्या लोकांकडे तोंड करून जीपमध्ये उभा होतो. रोमानो, सीरिओ, अन्तोलेनी, पापा पेत्रीनो सर्वजण डोळे पुसत उभे होते. जीपने वेग घेतला व शेवटी मला ऐकू आला तो अदलीनाचा हृदय फाडून टाकणारा हुंदका ! माझ्या डोळ्यात पाणी आले.”
भारतात परतल्यावर श्री. साळवी युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होतात. त्यांचे लग्न होते. काही वर्षानंतर ते आपल्या पत्नीला घेऊन इटलीत आपला प्राण वाचविणाऱ्या देवदूतांच्या भेटीसाठी पुन्हा विला सान सबस्तिअनो या गावात जातात. अशी ही माणुसकीचे दर्शन घडवणारी एका मराठीलष्करी अधिकाऱ्याची कहाणी प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी आहे.