आजच्या स्पर्धेच्या युगात छोट्या छोट्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीत आपली मुले वाढवणे संस्कारित करणे हे एक आव्हान ठरले आहे. मुलांची बौद्धिक आणि भावनिक गरज पूर्ण करताना पालकांची दमछाक होते. वाढती स्पर्धा नवे नवे ताण-तणाव, अपुरा व्यायाम, टीव्ही, मोबाईल सारखी आकर्षण आणि त्यामुळे खचणारी सांस्कृतिक मुल्ये या सगळ्यांमधून मुलांना योग्य वाढवणे आणि त्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची जोपासना करावी हे सांगणारे डॉ. रमा मराठे यांचे ‘असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व’ हे पुस्तक उपयुक्त आहे. भक्कम मानसशास्त्रीय तत्त्वांची बैठक आणि दैनंदिन जीवनात वापरता येतील अशा छोट्या छोट्या युक्त्या यामुळे हे पुस्तक पालकांसाठीसंग्रही ठेवावे असेच आहे.
वेगवेगळ्या पाच भागात लेखिकेने पुस्तकाची विभागणी केलेली आहे. पहिल्या भागात मुलांचे पालकांशी वर्तन आणि त्यांचा संवाद नंतर मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दिशा, मुलं आणि अभ्यास, मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास आणि शाळा आई-बाबांची असे विभाग आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना तशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून काळजी आणि खबरदारी घेण्यासाठी दिलेल्या टिप्स उपयुक्त आणि अनुभवांवर आधारित आहेत. अनेक उदाहरणे देऊन उद् बोधक तसेच रंजक आणि सोपी माहिती मिळाल्यामुळे पालकांना पालकत्वाची जबाबदारी पेलताना सोपे किंवा सुलभ होईल.
भाग पहिला- पालकांचा मुलांशी संवाद या लेखमालांमध्ये मुलांची सकारात्मक आत्मप्रतिमा निर्माण करणे, त्यांच्यामध्ये आत्म गौरवाची भावना वाढवणे, योग्य कृतीला प्रोत्साहन किंवा बक्षीस देणे आणि अयोग्य कृतीला शिक्षा याचे पालन, छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन आत्मनिर्भर बनवणे, काय करू नये ऐवजी होकारातील सूचनाचा अवलंब अशा उपयोगी आणि दैनंदिन जीवनात सहज वापरता येतील अशा युक्त सांगितल्या आहेत.
दुसऱ्या भागात- मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दिशा या सदरातील लेखमाला आहेत. मुलांच्या शिस्तीवर भर देणाऱ्या कृती, जबाबदारी घेताना घ्यावयाची काळजी, त्यातून येणारा आत्मविश्वास याचे महत्त्व उत्तमरीत्या पटवून दिले आहे. अनावश्यक भीती, धमक्या देण्यापेक्षा, टीका करण्यापेक्षा घरगुती कामात सहभागी करून घेण्यासाठी दिलेली उदाहरणे समर्पक आहेत अतिसंरक्षण तसेच अति महत्त्वाकांक्षांचे ओझे मुलांवर न देता आत्मगौरवाची जोपासना शिकवणे हेही खूपच आवश्यक आहे. घातक स्पर्धेच्या युगात खिलाडू वृत्तीची जोपासना चांगल्या भावनांची देव ठेव आणि आनंदी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण या लेखमाला उदबोधक आहेत.
तिसऱ्या संचातील लेखमालांमध्ये अत्यंत गरजेचा विषय हाताळला आहे- मुलं आणि अभ्यास. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाचे अभ्यासाचे वेळापत्रक वेगळे असते हे पालकांनी समजून घेणे आवश्यक! महत्त्वाच्या गोष्टींचा नियोजन, वाचनाची गोडी लावण्यासाठी दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स उपयुक्त आहेत. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चे सोपे उपाय करून बघता येतील. विद्यार्थ्यांचा आहार आणि मन याचे शास्त्रीय विश्लेषण योग्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा आणि ताण हटाव हा लेख. आजच्या जीवनात ताण कमी करण्याचे उपाय आचरणात आणणे अत्यंत गरजेचे ठरतात त्यामुळे हा लेख मार्गदर्शक आहे.
पुस्तकाचा चौथा भाग- मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास हा गोष्टी रुपातून रंजक ठरला आहे. मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी गोष्टीतून नीती मुल्ये, विवेक विचार, चांगले आचरण यामुळे उद बोधन आणि प्रेरणा निर्मिती झाली आहे. पालकांनी गोष्टी सांगण्याचे तंत्र आत्मसात केले तर मुलांमध्ये आवड निर्माण होईल आणि अपेक्षित संदेश त्यांच्यापर्यंत सहज पोहोचवता येईल. त्यांना विचार प्रवृत्त करता येईल. टीव्ही आणि मुले या लेखात टीव्हीचे फायदे तोटे समजावत त्यावरील बंधने घालणे पालकत्वाची परीक्षा कशी आहे याचे योग्य निवेदन केले आहे. खेळांचे व्यक्तिमत्त्व विकासातील अनन्यसाधारण स्थान योग्य समजावून देऊन, बालपणाची मजा घेत विविध खेळांची ओळख करून द्यावी हे सांगितले आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात मुलांचा भावनिक बुद्ध्यांक तसेच सामाजिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी खूप उदाहरणे देऊन स्व ची जाणीव आणि एक्सेल युअरसेल्फ ही संकल्पना विकसित केली आहे. सोबत पालकांची भूमिका, परीक्षा तंत्रे, मानसशास्त्रीय चाचण्यांची उपयुक्तता असे संदर्भ जोडणी केली आहे. एकूणच सहज सोपी भाषा, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि नेमक्या पालकत्वाच्या टिप्स यामुळे ‘असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व’ हे पुस्तक वाचनीय व संग्रही असावे असे आहे.