प्रा. डॉ. योगिता मारुती रांधवणे, रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर
रूपसावली, लेखक – तानाजीराव पाटील
डॉ. तानाजी पाटलांची ही कादंबरी म्हणजे ग्रामीण स्रीचे जीवंत चित्रण होय. ग्रामीण स्रीच्या जीवनामध्ये न घडलेल्या स्थित्यतराबद्दल आपल्याला बरेच काही सांगून जाते. एकीकडे भारत माहिती तंत्रज्ञानाच्या संगणक क्षेत्रात भरारी घेऊ पाहत आहे. तर भारताचे दुसरे चित्र म्हणजे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी यांचे जीवन विशेषतः स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक याची वास्तवता, आपल्याला या कादंबरीतून जाणवते. कोल्हापूर जिल्हयातील छोट्याश्या सोनवली गावात शेती करणारे कुटुंब, डोंगर उतारावरची जमीन, सदूची बायको लक्ष्मी, मुलगी सुशीला यांची कहाणी, त्यांचे दारिद्र्य, आईने भोगलेले दुःख मुलीच्या वाट्यालाही येते, तेव्हा आईला आपली लेक आपल्याच रुपाची सावली वाटू लागते.
एकविसावे शतकात प्रवेश करणाऱ्या, संगणक आणि अनुउर्जेच्या क्षेत्रांत भरारी घेऊ पाहणाऱ्या भारताचे दुसरे चित्र म्हणजे सोनवली गावचे हे शेतकरी कुटुंब ! या कुटुंबाला, विशेषतः त्यातील स्त्रियांना दास्यामध्ये जखडून ठेवणाऱ्या शृखला केवळ पुरुष प्रधान संस्कृतीच्या नाहीत, तर आर्थिक दुरावस्थेच्याही आहेत. याची जाणीव आपल्याल्या ही कादंबरी वाचत असताना वारंवार होत राहते. कादंबरीला मराठी साहित्यिक चिंतनशील समीक्षक प्रा.म.द. हातकणंगलेकर यांनी दीर्घ अशी प्रस्तावना लिहून लेखकाच्या लेखन शैलीला प्रेरणा दिलेली आहे. जिथे कादंबरी संपते तेथूनच ती वाचकाच्या मनात सुरु होते, हेच तिचे यश आहे असे मला वाटते.