मन मे है विश्वास

Share

Review By Dr.Rohini Bhiku Yewale, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
“मन मे है विश्वास” या विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मचरित्रात वाचताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि ध्येयाचा शोध घेताना त्यांना लागणारे ब्रेक, ठेचा,अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगा सारखी स्थिती व्हायची असे ते सांगतात,पण त्यांच्या डोळ्यात भोळीबाबडी स्वप्न होती. त्याला प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली.ते सांगतात, जेवढा मोठा संघर्ष,तेवढे मोठे यश! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही! बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची आणि पंखात बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी तरुणांनी ठेवावी लागते.
विश्वास नांगरे पाटील सांगतात माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधनसामग्री आणि पराकोटीच्या ध्येयनिश्चेन कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ ना दिशा दाखवण्यासाठी मी या पुस्तकाचा प्रपंच केला आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी पुस्तक लिहिताना आपला जीवन पट आणि संघर्ष 11 प्रकरणात अनुभवांचे भरीत खेड्यातल्या त्यांच्यासारख्या असंख्य सम परिस्थितीतल्या भावंडांसाठी समर्पित केले आहे. त्यातील 1) गाव आणि गोतावळा 2) शाळा 3) हायस्कूल 4) अकरावी बारावी 5) बी.ए. 6) एम. ए.- मुंबई विद्यापीठ 7) एस. आय. ए. सी.8) यू.पी.एस.सी. पूर्व परीक्षा 9)एम.पी.एस.सी. चं घोडामैदान 10) संयुक्त मोहीम 11)अखेरची पायरी.त्यांनी हा प्रवास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज समोर ठेवून लिहला आहे. अभ्यास आणि रोजच्या जीवनातील सूक्ष्म निरीक्षण, परीक्षेची तयारी आणि कॉमन सेन्स याचा खूप जवळचं नातं आहे. त्यांनी या पुस्तकातून बेरोजगारी व गरिबीमुळे निर्माण होणारी शहरी युवकांमधील नैराश्याची पोकळी, रेव्ह-पार्टी वरील धाडीच्या वेळी जाणवलेली हाय फाय संस्कृतीतील वाढती व्यसनाधीनता आणि चंगळ वाद यांना पुसटसा स्पर्श करताना समाजातील चांगल्यावाईट प्रवृत्तींचा मागोवा घेण्याचाही प्रयत्न केला आहे. बालक, पालक, शिक्षक यांना आणि विद्यार्थी दशेत व्यक्तिमत्त्वाची जडणघडत करणाऱ्या व भावनिक जाणीव प्रगल्भ करणाऱ्या समाजाच्या प्रत्येक अंगाला उद्देशून हे आव्हानंपर लेखन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे असे मला वाटते.