अजब शास्त्रज्ञाच्या गजब कथा

Share

Review By Prof. Kadam Anupama Mohan, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
मराठी मध्ये एक म्हण आहे “व्यक्ती तितक्या प्रकृति “ त्या म्हणीला साजेसे असे एक पुस्तक म्हणजे “अजब शास्त्रज्ञाच्या गजब कथा”. हे पुस्तक प्रा. डॉ. सुनील विभुते यांनी लिहिले आहे. प्रा डॉ सुनील विभुते हे विज्ञान कथा लेखक आहेत. त्यांनी आकाशवाणीवरील कार्यक्रम ,माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. त्यांना मराठी विज्ञान परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
‘अजब शास्त्रज्ञाच्या गजब कथा’ पुस्तकामध्ये शास्त्रज्ञानी लावलेले शोध व त्या शास्त्रज्ञाच्या स्वभावाचे विविध पैलू लेखकाने अगदी खुमासदार पणे लिहिले .लेखकाची सहज सोपी भाषा, मानवी भावनांची विज्ञानासोबत घातलेली मजेशीर सांगड आपल्याला पुस्तक वाचताना वेळोवेळी जाणवते . शास्त्रज्ञाच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्यासमोरच घडत आहेत असे प्रकर्षाने जाणवते. हेच लेखकाच्या लेखणीचे वैशिष्ट्ये. शास्त्रज्ञ म्हणजे एक अत्यंत बुद्धिमान, कर्तृत्वसंपन्न मोठा माणूस पण त्यांचे जीवन सुद्धा सर्वसामान्य माणसांसारखे असते. सामान्य माणसांच्या स्वभावामध्ये जसे गुणदोष असतात तसेच शास्त्रज्ञाच्या स्वभावामध्ये सुद्धा गुणदोष असतात. अलबर्ट आईनस्टाइन यांचा विसरभोळेपणा असेल, पॉल एर्दोस यांचा विक्षीप्तपणा असेल हे वाचताना आपल्याला हसू आवरत नाही. लेखकाने शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध याची माहिती तर दिलेली आहेच पण त्यासोबत शास्त्रज्ञांच्या स्वभावाचे वेगळेपण आपल्या लेखणीतून ठळकपणे मांडले . शास्त्रज्ञाचे जीवन, त्यांचे शोध या विषयावर बरीच पुस्तकं लिहिली गेली पण “अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा” म्हणजे एक इंद्रधनुष्यच आहे. त्या इंद्रधनुष्यातील सगळे रंग जणू या पुस्तकातच उतरले आहेत. शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, निरीक्षण, प्रयत्न, धाडस, जिद्द, परिश्रम यांचे दर्शन घडते. या पुस्तकामध्ये शास्त्रज्ञांना संशोधन करताना सोसलेल्या हाल, अपेष्टा अपमान हे सगळे सहन करून त्यांनी जे यशाचं शिखर गाठले आहे. हे आपल्याला या पुस्तकातून सुचवायचे असेल असे वाटते. आपल्यासारख्या वाचकाला हे पुस्तक नक्की प्रेरणादायी ठरावे. अशीच लेखकाची अपेक्षा असावी. हे पुस्तक वाचताना शास्त्रज्ञांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला भुरळ पाडून जातात. काही प्रसंग हसवून जातात तर काही प्रसंग खरंच विचार करायला लावणारे आहेत. हे पुस्तक म्हणजे अनेक शास्त्रज्ञांनी भरलेला खजिना आहे जे नक्कीच प्रेरणा देऊन जातो.