एकदा नक्की वाचा

Share

पुस्तक परीक्षक – भदाणे आश्विनी लहू
तृतीय वर्ष, वाणिज्य विभाग
म. स. गा. कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव कॅम्प

राधेय म्हणजे महाभारतातील कृष्णाच्या राधेसंबंधीत कादंबरी असेल याबाबत अनेक नववाचकांचा गैरसमज होऊ शकतो. रथाचा सारथी अधिरथ बाबा व त्याची पत्नी राधा माता यांनी गंगेत सापडलेल्या परंतु स्वतःच्या मुलासमान सांभाळलेल्या कर्णाने तिच्या सन्मानार्थ ‘राधेय’ हे नाव धारण केले. त्याला जन्मभर ‘सूतपुत्र’ म्हणजे एक सर्वसामान्य सारथ्याचा मुलगा असे म्हणून हिणवले जात असे. त्यामुळे, पांडवांसमोर कौरवांना ‘अंधपुत्र’ असे म्हणून जशी अपमानास्पद वागणूक मिळते व या भावनेतून निर्माण झालेली वेदना समजून घेऊन, पांडवांना शह द्यायला दुर्योधनाने पांडवांच्या पराक्रमाच्या तोडीसतोड महापराक्रमी वीर कर्णाला आपल्या साम्राज्याचा एक भाग असलेल्या ‘अंग’ या देशाचे राजपद बहाल केले तर कर्णाला स्वतःहून ‘अंगराज’ ही पदवी प्रदान केली. पण या घटनेमुळे कर्णाच्या आयुष्याला दिशा मिळाली की त्याची वाताहत झाली, या संबंधीचा निर्णय लेखक वाचकांवर सोडतो.
बऱ्याचदा, विविध प्रसंगात केलेल्या वर्णनात भाषेची पकड सैल होत जाते तर अचानक कधी कधी घट्ट होत जात असल्याचे लक्षात येते. काही प्रसंगांचे प्रभावी वर्णन शक्य होते, जसे काही युद्धे व त्यातील लढवय्ये, धाडसी कर्णाचे पराक्रम. द्रौपदी वस्त्रहरणाचा वेदनादायी प्रसंग, त्याने कितीही त्याची बाजू मांडली तरी कर्णाबद्दल नकारात्मकता निर्माण करतो. अर्जुनासोबत झालेले शेवटचे निर्णायक युद्ध नजरेसमोर उभे राहते. शेवटपर्यंत प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार कर्णाला वापर करून घेतला, हे त्याला कालानुरूप त्याला उमगल्यानंतर त्यातून निर्माण झालेला त्याच्या मनातील द्वंद वाचकांच्या मनातही निर्माण होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. हेच या कादंबरीच्या भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. आपल्याच माणसांसाठी आपल्याच माणसांशी लढाव लागल, तर जिंकूनही हरणे किंवा त्यांच्या भल्यासाठी हरणे या दोन्ही गोष्टी किती अपमान, अवहेलना, तिरस्कार व वेदनादायी असू शकतात हे कादंबरी वाचताना कर्णासह वाचकांच्या मनाला पोखरत जाते आणि वाचक कादंबरीसह मनाने जोडले जातात. तत्वज्ञानयुक्त अनेक विचार वाचताना मनाचा ठाव घेतात व थांबून विचार करायला लावतात अशी अनेक वाक्ये या कादंबरीचे सौंदर्य आहेत, जसे की “माणसानं एवढं किर्तीवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं ती जागा व्यापण्याचं धाडस कुणाला होऊ नये” किंवा “जिंकल्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो”. अशा अनेक अर्थपूर्ण वाक्याचा समावेश लेखकाने कादंबरीत वेळोवेळी केला आहे.
‘राधेय’ या कादंबरीच्या या आवृत्तीचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ श्री. सुभाष अवचट यांनी तयार केले असून, त्यावर नजर टाकताना त्यातील बारकावे सहज वाचकांच्या लक्षात येतात आणि ‘कर्ण’ ही महाभारतातील एक पात्र आपल्याला दिसत तितक समजायला सोप नाही हे जाणवते. तसेच, थेट सूर्यदेवतेकडून कवचकुंडले जन्मताच लाभलेल्या या व्यक्तीचे पायही इतरांसारखे मातीचेच आहेत, ही बाजूदेखील या कादंबरीतून लेखकाने वाचकांसमोर मांडली आहे. कर्णाच्या आयुष्याचे प्रयोजन हे त्याच्या जन्मविषयक रहस्याचा सतत मागवा घेत राहते. मात्र हे सत्य उघडल्यानंतर कर्णाचे जगण्याचे प्रयोजनच नष्ट होईल, त्याचे आवेशपूर्ण लढाईचे अवसान गळून पडेल, या हेतूने कृष्ण व कुंती यांनी जाणीवपूर्वक कौरव-पांडव अंतिम युद्धापूर्वी सांगून पांडव सुरक्षित ठेवले, ही खंत त्याला कायमस्वरूपी सलत राहते. याच हेतूने खुद्द इंद्रदेव त्याच्याकडे वामन रूपात येऊन कवचकुंडले दान म्हणून मागतो, आणि माता कुंती याचक म्हणून ‘माझे पाच पुत्र वाचव’ असे दान मागते, ते देखील तो मान्य करतो. त्यामुळेच दानशूर हे विशेषण कर्णाला यथार्थपणे शोभून दिसते. कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्याचे अनेक गुण-अवगुण, अहंकार, गर्व, पराक्रम, दातृत्व, स्वतःचा जन्मविषयक सत्याचा सातत्यानं शोध व त्यातून कुरुक्षेत्रावर होऊ घातलेल्या युद्धाच्या तोंडावर अचानक त्याच्या कानात शिस ओताव तसं जन्मविषयक सत्य जाणीवपूर्वक सामोरे आणले जाणे, वास्तवाची जाणीव होताच करण्याचे अवसान गळून पडणे, आपल्या भावंडांना सुरक्षित ठेवण्यासाठी विजयी असूनही पराजय स्वीकारणे, जिंकूनही काहीच हाती न लागणे हे किती गुंतागुंत निर्माण करणारे आहे हे कळते…. पदोपदी दुःख, वेदना, अपमान, अवहेलना, साहस, प्रेम, स्नेह, मैत्री, स्पष्टवक्तेपणा, असे अनेक कंगोरे पानोपानी उलगडत जातात. मोठा भाऊ म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्याचा निर्णय घेत, माता कुंतीला दान म्हणून दिलेले वचन पाळायला, लढणे शक्य असूनही मृत्यूला सामोरे जाणे, ही बाब दुर्योधनाला फसवणे नसून दुर्योधनाच्या निस्सीम मैत्रीत आणि माता कुंतीला दिलेल्या वचनाच्या कात्रीत सापडून तात्विक लढाईमधे जिंकणे की हरणे, हे सर्व लेखक वाचकांच्या अधीन सोडतात. या निर्णयामुळे कर्णावर लागत आलेला चुकीचा व खोटा भ्याडपणाचा आरोप परत एकदा शेवटच्या निर्णायक क्षणी स्वतःहून सिद्ध करण्यासारखं झालं. या निर्णयामुळे कर्णाने आत्तापर्यंत अनेकदा अहंकारातून केलेल्या चुका व पापांचे प्रायश्चित्त घेणे असे तो मानतो, तरीही दुर्योधनाला सगळ्यात जवळचा मित्र म्हणून शेवटचे भेटण्यासाठी आणि त्याला सत्याची जाणीव देण्यासाठी अतिशय जखमी असूनही स्वतःचे प्राण जाण्यापासून रोखून धरणे, हे कोणत्याही संवेदनशील मनाला उद्विग्न करणारे आहे.

मराठी भाषाप्रेमींना आणि मनातील वेदना ठसठसत राहिलेल्या सर्वांना आपलासा वाटेल असा हा ‘राधेय’ वाचलाच पाहिजे, मात्र, ‘मृत्युंजय’ ही अधिक सखोल कादंबरी वाचण्यापूर्वी, दोन्हीची तुलना न करता, तरच खऱ्या अर्थाने ‘कर्ण’ ही व्यक्तिरेखा कुणा एका माणसाची नसून, पिढ्यानपिढ्या मानसिक द्वंद्व लढणार्‍या प्रत्येक माणसाची भावना आहे हे लक्षात येईल.
एकदा नक्की वाचा, श्री. रणजित देसाई लिखित ‘राधेय’!”