Review By Dr. Goraksha Dere, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
२१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात राजकीय अभ्यासक डॉ.यशवंत सुमंत यांनी महात्मा गांधींची विचारसृष्टी काही अलक्षित पैलू या शीर्षकांमध्ये त्यांनी केलेली गांधी विचारांची मांडणी आणि त्याद्वारे त्यातील काही अलक्षित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न गांधी अभ्यासकांनी समजून घेताना हे लक्षात घेतले पाहिजे की, गांधींच्या हयातीत आणि त्यांच्या हत्येनंतर मागील ७० वर्षात देश विदेशातील विद्वान व अभ्यासकांनी गांधी विचारांची एवढ्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली आहे की, या टप्प्यावर खरेच काही अलक्षित राहू शकते का असा प्रश्न पडू शकतो. अलक्षित या शब्दाच्या मुळाशी असलेल्या आशयाचा उहापोह करणे हा दुसरा उद्देश येथे गृहीत धरला आहे. राजकीय विद्वान व अभ्यासकांपैकी काहींना महात्मा गांधी हे आवश्यकवादी तर काहींना राष्ट्रवादी प्रस्तापितांचे वंचित समूहावरील वर्चस्व टिकून ठेवण्याचा प्रकल्प वाटतात. दखल घेण्याची बाब म्हणजे मागील सात दशकात गांधीविचारांची क्रांतिकारी परिवर्तनाशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी बनविण्यात गांधीवाद्यांनी तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधींना जातीव्यवस्था समर्थक/मनुवादी म्हणत प्रचलित भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच शत्रू क्रमांक एक मानले आहे. परिणामी गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधींच्या विचारातील अनेक महत्त्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलूंचा सदर पुस्तकात साधक बाधक दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्यामुळे गांधींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन समोर आला आहे.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संवाद शोधण्याची भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा त्यांचा त्यामागील संवादाचा नेमका हेतू आणि तात्विक बैठकीवरील चर्चेतून स्पष्ट होताना दिसतो. समाजातील व्यापक परिवर्तनासाठी शोषित वंचित समूहामधील संवादाचा आग्रह धरताना दिसतात. कारण हा संवादाचा अवकाश सुमंतांना गांधींमध्ये सापडतो. प्राचीन ग्रीक नगराज्यापासून ते आज पर्यंत गांधी व उपर्युक्त शिक्षणतज्ञांमधील मूलभूत फरक हा आहे. की शरीर, मन, बुद्धीचा समन्वय गांधी निव्वळ विचारांच्या पातळीवर व माध्यमातून प्रतिपादित नाहीत तर तो ते मूलोद्योगांच्या माध्यमातून सांगतात. मूलोद्योगांमुळे शरीरश्रम हे उत्पादक श्रमात मिळून जातात. मूलोद्योगातील उत्पादक कर्म हे ज्ञानमय होते व कर्माच्या सिद्धी बरोबरच ज्ञानाची प्राप्ती होते.
राजकारणाच्या संदर्भात गांधींनी राज्यसंस्था आणि नागरी समाजाचे क्षेत्र हे परस्परांपासून अलग, स्वायत्त व परस्पर पर्यायी असे मानले नव्हते. त्यामुळे राज्यसंस्थेच्या पातळीवरील राजकारणास नागरी समाजाच्या क्षेत्रातील राजकारणाचा पर्याय देणे किंवा नागरी समाजाच्या क्षेत्रातील राजकारणास राज्यसंस्थेच्या पातळीवरील राजकारणाचा पर्याय देण्याचा विचार गांधींनी कधीही केलेला नाही.तशी त्यांची भूमिका ही नव्हती. आजची शहरकेंद्री विकास आणि उद्योगनीती सर्वांना सामावून घेऊ शकत नाही. कारण शेती आणि खेड्यांच्या शोषणावरच शहरी जीवन आधारित आहे. ही गांधींची स्पष्ट भूमिका होती म्हणूनच खेड्याकडे चला असा संदेश ते प्राय: सवर्ण शहरवासीयांना देतात, शुद्रातिशुद्रांना नव्हे. खेडी सनातन्याची बालेकिल्ले आहेत हे माहीत असलेल्या गांधींनी ज्ञान, रोजगार व सुरक्षिततेपोटी शुद्रातिशुद्रांनी खेडी सोडण्यास त्यांना कधी विरोध केला नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. खेड्यांच्या पुनर्रचनेतूनच रोजगार, शिक्षण, आरोग्य, निवारा व विश्रांती या मूलभूत मानवी गरजांची पूर्तता होऊ शकते आणि म्हणून गांधी ग्रामीण पुनर्रचनेचा आग्रह धरतात.
अशा प्रकारे समकालीन सिद्धांतिक आणि संकल्पनांची महात्मा गांधींवर केलेले आरोप विचारवंतांच्या हेतून बरोबर अनेकदा प्रतारणा करणे हे यशवंत सुमंतांचे उद्दिष्ट होते. अशा प्रकारच्या मांडणीतून विचारातील सूक्ष्म फरक समजून घेण्याच्या शक्यता कशाप्रकारे नष्ट होत जातात हेही ते नेहमीच आपल्या लेखनातून निदर्शनास आणून देत होते. महात्मा गांधी असोत किंवा आधुनिक भारतातील इतर कोणताही विद्वान त्यांच्या चिंतनातील काही महत्त्वाचे पैलू अलक्षित राहण्याची मुख्य कारण म्हणजे विचारवतांचे विचार समकालिन प्रश्नांना सोडविण्यासाठी उपयोगी ठरणार नसतील तर विचार अभ्यासण्याचे प्रयोजन काय ?. भूतकाळातील विचारवंतांच्या अभ्यासाकडे केवळ अकादामिक उपक्रम म्हणूनच पाहिचे का?. असे अनेक प्रश्न राजकीय अभ्यासकामध्ये निर्माण होतात.डॉ.सुमंत यांनी गांधीविचारांची मांडणी आणि त्याव्दारे त्यांच्या विचारातील काही अलक्षित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या मांडणीतून समजून घेताना वरील नमूद प्रश्नांच्या संदर्भात वेध घेणे आवश्यक बनते.