सर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून आपल्याला असे जाणवते, की बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन या माणसाने जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हा कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला, तरी मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला. `स्मरणगाथे’च्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे.