ययाती हि ययातीच्या न संपणाऱ्या उपभोगाच्या लालसेची गोष्ट आहे. हि शर्मिष्ठेच्या त्यागाची आणि निरपेक्ष प्रेमाची गाथा आहे. देवयानीच्या स्वप्रेमाची कथा आहे. आणि कचाच्या संयमाची आणि करुणेची गोष्ट आहे. “वासनेला अंत नाही” या चिरंतन सत्याचं भयाण रूप ययातीच्या रूपाने आपल्यासमोर उभं राहत. “मला हवं”,”माझी गरज”,”माझी दुःख” यापलीकडे जाऊन आयुष्याला कसं पाहावं हे सांगते ययाती कादंबरी. खरं सुख हे भोगात नसून त्यागात आहे, नव्हे मनापासून केलेल्या, प्रेमापोटी केलेल्या त्यागात आहे, हे आजच्या चंगळवादी पिढीला सांगते, ययाती कादंबरी.आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.कथा तशी छोटीच आहे पण त्यातील भाषाशैली व त्या काळात दृश्य आपल्यासमोर खुप व्यवस्थितरित्या मांडले आहे.
ह्या कथेत मुख्य पात्र ही चार आहेत पण प्रत्येक पात्राला सारखेच महत्व आहे. जसे एखादी व्यक्ती नसती तर ह्या घटना घडल्याच नसत्या. प्रत्येक व्यक्ती त्या त्या घटनेला तेवढीच कारणीभूत आहे. ह्या कथेत ययाती, देवयानी, शर्मिष्ठा व कच हे मुख्य पात्र आहेत.