Dr. Uday Jadhav.
पांडुरंग सांगवीकर, पंचविशीतील युवक कादंबरीचा नायक. खेड्यात राहणारा नायक पुण्यात शिक्षणासाठी वस्तीगृहात राहतो. त्याचा न्यूनगंड आणि त्याला आलेले अनेक अनुभव यामुळे तो स्वतःच्या विचारांच्या कोशात अडकत जातो. गावाकडे परतल्यावर तिथेही त्याला अनेक अनुभव येतात ज्यातून तो कायम शिकत राहतो. कादंबरीचा नायक आहे तो, परंतु अपयशी, आतून अस्वस्थ, ध्येय नसलेला, हरलेला, समाजाच्या दृष्टीने जगण्यास लायक नसलेला, रूढ अर्थाने अपयशी. कोणतेही काम, जगण्यात अर्थ नसलेला. पांडुरंगला अंतर्मनातून प्रश्न सतावत असतो जीवन का जगायचे? कोणतेही स्पष्ट ध्येय डोळ्यांसमोर नाही. हे अस्वस्थ, निराश, ध्येयाशिवाय जगत असलेले आयुष्य तो कोणताही आडपडदा न ठेवता आहे तसे वाचकासमोर मांडतो. क्षणभर वाचकही अस्वस्थ होवून जातो. जीवनाकडे नकारात्मक दृष्टिने, निराशामय पणे पाहणारी ही कादंबरी आहे. कादंबरी 63 वर्षांपूर्वीची असली तरीही आजच्या वैफल्यग्रस्त समाजाची, युवकांची ती प्रतिनिधीत्व करते. कादंबरीचे मुखपृष्ठच बरेच काही सांगून जाते. भालचंद्र नेमाडेंची लेखनशैली वाचकाला पांडुरंगशी एकरूप करून सोडते. अंतर्मनाच्या संघर्षाचं चित्रण आहे. वैचारिक, गहन आणि गंभीर विषयाची आवड असेल तरच हे पुस्तक वाचावे.
