Share

डॉ.हनुमंत भवारी,सहयोगी प्राध्यापक, श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ.

विद्यार्थ्याला देशाचा सक्षम नागरिक किंवा मुळातच माणूस बनवायचं जर असेल तर त्याचा प्राथमिक शिक्षणाचा पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात प्राथमिक शिक्षणासंदर्भात बदललेली शासनाची धोरणं आणि एकूणच शिक्षणाकडे बघण्याची शासनकर्त्यांची भूमिका हे सारंच काही आव्हानात्मक आहे. जपानमध्ये शिक्षणाचा उद्देश व्यक्तीला माणूस घडविण्याचा आहे. तो विद्वान कदाचित नंतर बनेलही. परंतु आपण विद्वान घडविण्याच्या नादात माणूस घडविणेच विसरतोय की काय? असा प्रश्न पडायला लागलाय. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना पहिल्या तर याची प्रचिती येते.
युवराज माने यांचं दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं ‘गुरुजी तू मला आवडला’ हे पुस्तक नुकतंच वाचून संपवलं. ‘गुरुजी तू मला आवडला’ या पुस्तकाच्या शीर्षकातच मला वाटतं, या पुस्तकाचं सारं गुपित दडलेलं आहे. एखादा व्यक्ती ‘माणूस’ म्हणून आवडला तरच आपण त्याच्या अंतरंगात शिरायचा प्रयत्न करतो. एखादा शिक्षक आवडला तर त्याचा विषय आवडायला लागतो. आता हे आवडणं मी बाह्यपातळीवरती म्हणत नाही. ज्ञानाच्या, सर्जनशीलतेच्या, अभिव्यक्तीच्या, कृतीशीलतेच्या अगदी नैतिकतेच्या या अनुषंगाने आवडणं हे मला अभिप्रेत आहे.
आज आपल्या व्यवस्थेने अनेक मुलांच्या शिक्षणाचा हक्कच हिरावून घेतला आहे. ऊसतोड कामगार, मेंढ्या चारणारे मेंढपाळ, अशाप्रकारे वर्षातील बाराही महिने पोटापाण्यासाठी भटकंती करणारी माणसं, यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो. बरं, या मुलांना शिकविण्यासाठी आपल्याकडे तशी काही योजनाही नाही. आणि कोणतीच यंत्रणा आपण त्यासाठी उभीही केलेली नाही. त्यामुळे या मुलांना इच्छा असूनही शिक्षणापासून दूरच राहावं लागतं. अशीच एक ऊसतोड कामगाराची ‘ममता’ नावाची मुलगी. काही दिवस शाळेत येते. रमते, शिक्षणाच्या आनंदात नाहून जाते, शाळेतील वातावरण तेथील शिक्षक, तिला मनापासून आवडू लागतात. ‘गुरुजी तू मला आवडला’ असं व्यक्त होण्याचं धाडसही तिच्यात निर्माण होते. मला वाटतं ‘गुरुजी तू मला आवडला’ हे ममताचे उद्गार लेखक युवराज माने यांच्या कार्याची पोहचपावतीच आहे. ती कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही.
लेखकाने सांगितलेली आनंदाची डहाळी ही संकल्पना मला भन्नाट वाटते. डहाळी म्हणजे मोठी फांदी नाही तर त्या फांदीचा एक छोटासा भाग. त्या डहाळीवर पक्षी आनंदाने बसू शकतो. झोके घेऊ शकतो. गाणं गाऊ शकतो आणि मनातलं गुपितही सांगू शकतो. अशी डहाळी शिक्षकाला होता येणे हेच शिक्षक असण्याचं मुख्य लक्षण असायला हवं. शिक्षकाबरोबरच शाळा हे ठिकाणही मुलांना आवडलं पाहिजे. मुलं त्या ठिकाणी रमली पाहिजेत. “अरे, इथे मजा आहे की” असे मुलांना वाटले पाहिजे आणि हाच मुख्य धागा युवराज माने यांनी अचूकपणे पकडलेला दिसतो. लेखनाची खरडपट्टी आणि पाठांतराची घोकमपट्टी याच्या दावणीला शिक्षण न बांधता, त्याला नवीन अनुभव घेण्यासाठी वातावरण निर्माण करून देणे. एखादी ‘बी’ कशी रुजते आणि झाड कसं उगवतं हे वर्गात चार भिंतीच्या आत न सांगता प्रत्यक्ष ‘बी’ लावून निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून देणे, सहल गाडीच्या माध्यमातून सभोवतालचे भवताल न्याहाळणे, नवे नवे मित्र जोडणे, शाळेच्या स्वयंपाक घरात रमणे, आजी-आजोबांना शाळेत बोलावणे, वाचनाला त्रासदायक न बनवता वाचनाचा आनंदसोहळा करणे, गोष्टी फक्त ऐकण्यापेक्षा गोष्टी निर्माण करण्याची सर्जनशीलता वाढीस लावणे, चिमणीच्या घरट्यातून प्राण्या-पक्षांबद्दलची संवेदनशीलता रुजवणे, कल्पनाशक्तीच्या विकासासाठी आभाळ मोकळं करून देणे, वर्ग सभा घेऊन नेतृत्वाची, वक्तृत्वाची उर्मी निर्माण करणे, अशा प्रकारचे विविध अनुभव देणारा हा गुरुजी मुलांना शिकवता-शिकवता खूप सारं काही शिकतो. आणि समृद्ध होत जातो. इतका समृद्ध होतो की मुलांकडून हरण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते.
भुरा या पुस्तकात डॉ. शरद बाविस्कर म्हणतात की, शिक्षण म्हणजे मुलांच्या हातात रेडिमेड पेंटिंग देणे नव्हे तर त्यांना भरपूर रंग देणे आणि कॅनव्हासचा आकार वाढवत नेणे. हा कॅनव्हासचा आकार वाढवण्याचे काम लेखक युवराज माने हे अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत. असे मला वाटते. हे पुस्तक प्रत्येक शिक्षकांनी तर वाचलेच पाहिजे परंतु सर्व पालकांनीही वाचायला हवे.

Recommended Posts

Ikigai

Yogesh Daphal
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Yogesh Daphal
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More