Share

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा

डॉ.आनंदा गांगुर्डे
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. बारामती.

आनंद विंगकर यांची ” अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ” ही कादंबरी अवकाळी पावसाच्या दरम्यान एका शेतकरी जोडप्याने केलेली आत्महत्या या विषयावर आधारलेली आहे .परंतु रुढ अर्थाने केवळ शेतकरी आत्महत्या या प्रचलित विषयाभोवती या कादंबरीचे कथानक फिरताना दिसत नाही .तर शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा करण्यापेक्षा आत्महत्येच्या परिणामांचा शोध घेणारी ही कादंबरी आहे .या कादंबरीला नैसर्गिक आपत्ती ,अवकाळी पाऊस, मानवी संघर्ष , कावळ्या- कुत्र्यांचा मृत्यू , त्यामुळे पसरलेला अशुभ संकेत , मुक्या प्राण्यांविषयीची सूडबुद्धी ,मानवी गैरसमज, पाप-पुण्य , शाप असे विविध कंगोरे या कथानकाला आहे .त्यामुळे ही केवळ शेतकरी आत्महत्येची गोष्ट न राहता त्या निमित्ताने समाजातील सर्व थरात उमटलेल्या प्रतिक्रियांची कहाणी ठरते. मानव आणि निसर्ग यांच्या संघर्षाचे विविध पदर आविष्कृत करणारी ही कादंबरी आहे .ऐन सूगीच्या दिवसात आलेला पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांची झालेली तारांबळ, त्यात भटक्या कुत्र्याने बोकडाचा घेतलेला बळी, मेलेल्या बोकडावर विष घालून कुत्र्यांवर घेतलेला सूड, विषारी बोकडाचे मांस खाऊन कावळ्या – कुत्र्यांचा झालेला मृत्यु , मुक्या प्राण्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्यामुळे गावात झालेली अवहेलना, अवकाळी पावसामुळे हाती आलेला शाळू गेला , त्यात बोकड गेला , कुत्र्यावर विष प्रयोग केल्यामुळे कावळ्यांचा मृत्यू झाला , त्यामुळे गावात झालेली अवहेलना , त्यात पतसंस्थेचे वाढत जाणारे कर्ज , या पश्चातापातून यशवंताने बायको पार्वतीस विष पाजून स्वतः केलेली आत्महत्या .अशा अनेक घटनांमधून कथानक घडत जाते .कवी प्रवृत्तीच्या आनंद विंगकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने हे सर्व प्रसंग हाताळल्यामुळे कादंबरीचे कथानक कुठेही बटबटीत न होता संपूर्ण कादंबरी वास्तवाला सामोरी जाते. मेलेल्या बोकडावर विष प्रयोग केल्यामुळे कावळ्या- कुत्र्यांचा झालेला मृत्यू आणि बाहेर दिवस – रात्र कोसळणारा अवकाळी पाऊस , त्यात यशवंता आणि पार्वती यांनी विष पिऊन केलेली आत्महत्या . या व अशा अनेक घटनांची परिणती म्हणून संपूर्ण गावात उभे राहिलेले नाट्य कादंबरीच्या कथानकात उत्कंठा निर्माण करून वाचनीयता वाढवीत नेते.
पश्चिम महाराष्ट्रातील जिराईत पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या मायणी , विटा , कराड या माणदेशातील प्रांतात ही कादंबरी आकाराला आलेली आहे . फेब्रुवारी महिन्यात सुगीच्या दिवसात शाळूची काढणी सुरु असताना अवकाळी पावसाचे वातावरण तयार होते . यशवंत व पार्वती त्यांच्या उषा ,आशा व नकोशी या मुलींसोबत ज्वारी काढत असताना शेजारी वगळातील झाडाला बांधलेल्या बोकडावर रानटी कुत्रा हल्ला करतो व त्याचा फरशा पाडतो . हाता तोंडाशी आलेला बोकड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या ज्वारीची नासाडी . शिवाय डोक्यावर वाढत जाणारा कर्जाचा डोंगर यामुळे यशवंता अत्यंत नाराज होतो व आपल्या नशिबाला दोष देत राहतो , ” माझ्याच नशिबाला कुठलं हे कुस्पाट लागतं ? काय चांगलं यवजावं तर इपरीतच कसं घडतंय ? कुठं कमी पडतात माझे श्रम ? का हमेशाच माझ्या वाट्याला असं अपयश ? ” ( पृष्ठः ३ ) असे म्हणत तो स्वतःला अपयशी मानत राहतो. सततच्या आत्मवंचनेमुळे तो स्वतःवरील ताबा हरवून बसतो . ज्या कुत्र्याने बोकड मारला त्या कुत्र्याविषयी सूडाने पेटून उठतो . त्या कुत्र्याला आता मी जिवंत सोडणार नाही , मारतोस त्याला . असे म्हणत सगळ्या कुत्र्यांच्या जीवावर उठतो . मेलेल्या बोकडावर विष टाकून वगळाला फेकून देतो . जेणेकरुन विषारी बोकड खाऊन तमाम कुत्री मरावीत यासाठी यशवंताने केलेले हे आघोरी कृत्य. अवकाळी पाऊस रात्रभर कोसळत राहतो .भर पावसात कावळे व कुत्री मरण पावतात . कुत्रे मारण्याच्या नादात कावळ्यांचाही मृत्यू होतो . मेलेल्या कावळ्या – कुत्र्यांचा सडा पाहून संपूर्ण गाव अवाक होतो . या कृत्यामागे यशवंताचा हात आहे . हे कळल्यावर सबंध गावभर यशवंताची निर्भर्त्सना होते .करायला गेलो काय अन् झालं काय ? असे म्हणत तो स्वतःला दोष देत राहतो .गावात त्याला तोंड दाखवायला जागा राहात नाही .एका बाजूला सावकाराचे कर्ज आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि त्यात कुत्र्यांवर विषप्रयोग केल्यामुळे संपूर्ण गावात झालेली मानहानी यामुळे यशवंताला आपला जीव नकोसा होतो. त्याची आयुष्याची नकारात्मकता वाढत जाते .आत्महत्या करण्याच्या विचार त्याच्या मनात येतो .शेवटी इतकी नकारात्मकता वाढते की तो आत्महत्या करण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत येतो .शेवटी बायको पार्वती नको नको म्हणत असताना तिला बळजबरीने विष पाजतो व स्वतःही विष घेऊन आपले जीवन संपवितो.
परिस्थितीने गांजलेला यशवंता बायकोसह आत्महत्या करुन आपल्या तीनही मुलींना अनाथ करुन टाकतो. त्यांच्या पश्चात उषा, आशा व नकोशी या तीन जीवांची मोठी परवड होते. या घटनेला जबाबदार म्हणून संपूर्ण गावात यशवंताच्या आत्महत्येची चर्चा होते. मुक्या प्राण्यांना मारल्याचा शाप शेवटी यशवंताला भोगाव लागला अशी वदंता गावभर पसरते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींवर आभाळ कोसळते. आशा व नकोशी लहान म्हणून कुटूंबाचा सगळा भार उषावर येतो. उषा सर्वात मोठी म्हणून तिची जबाबदारी वाढते. ती पण मोठी धीराची . धिरोदात्तपणे आलेल्या प्रसंगाला सामोरी जाते .दुःख उगाळत बसण्यापेक्षा दोन्ही लहान बहिणींना प्रेमाने सावरते. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आहे ते वास्तव स्विकारते .उषा मुळात कणखर स्वभावाची आहे. शेतात गड्या सारखं ती काम करते .मुलाची कमतरता तिने भरुन काढली आहे .शेतीकाम करण्यात तिचा हातखंडा आहे .रात्री अपरात्री फावडं खांद्यावर टाकून ती पिकांना पाणी पाजते .दुष्काळात सायकल वरुन पाणी आणून तिने जनावरं जगवली आहे .परत चांगल्या मार्कांनी बारावी पास झाली .एफ.वाय.बी.ए. ला प्रथम श्रेणीत पास झाली. अंधश्रद्धा निर्मूलन व दारुबंदीसारख्या चळवळीत ती सक्रिय आहे .गावातीलच सुभाषवर तिचे मनापासून प्रेम आहे. पण दुर्दैवाने ती त्याच्याशी लग्न नाही करु शकत.तिच्यात उपजतच शहाणपण आहे .सुभाष बरोबर पळून जाण्याची संधी असतानाही ती नाकारते .कारण अवकाळी पावसामुळे शेतीची झालेली दैन्यावस्था तिला बघवत नाही .आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चुलते विलास व चुलत भाऊ विश्वास वगळता गावातील भावकी त्यांच्या दुःखात सहभागी होत नाही .सुभाष मात्र अर्ध्या रात्री उशाच्या मदतीला धावून येतो .दलित समाजातील पगम वाघमारे तिला मदत करतात पण भावकीतील माणसं टाळतात. गावागावातील भावकीय अन गावकीचा संघर्ष येथे दिसतो .आता दुःखाच्या प्रसंगी भावकीपेक्षा प्रेमाने जोडलेली गावकीची माणसं मदतीसाठी धावून येतात. येथेही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर भाऊबंदकी यशवंताच्या वाईट गुणांवर बोट ठेवतात. त्यांच्या पापाचे हे फळ आहे असं म्हणतात .मात्र दलित समाजातील माणसं या कुटुंबावर मायेची सावली धरतात . उषा व तिच्या बहिणींच्या तोंडचा कडू घास काढतात .रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाची नाती अधिक उपयोगी पडतात असा संदेश या प्रसंगातून मिळतो .
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय महाराष्ट्राला नवा नाही पण या कादंबरीत चित्रित झालेल्या या प्रसंगाला अनेकविध आयाम आहेत. केवळ कर्जबाजारीपणामुळे या कादंबरीचा नायक आत्महत्या करत नाही. अवकाळी पावसाचे रौद्ररुप, त्यामुळे उभ्या पिकाची झालेली नासाडी, बोकडावर झालेला विषारी प्रयोग , त्यामुळे कावळ्या – कुत्र्यांचा झालेला मृत्यू , मुक्या प्राण्यांची हत्या केल्यामुळे संपूर्ण गावात झालेली मानहानी , या सर्व कारणांमुळे यशवंताची मानसिक अवस्था ढासळते. तो नकारात्मक मानसिकतेत जातो. बोकडाला मारलेल्या कुत्र्यावर सूड उगवण्यासाठी तो मेलेल्या बोकडावर विष टाकतो ,जेणेकरुन ते कुत्रे मरावे म्हणून .पण होते मात्र वेगळेच .विषारी बोकडाचे मांस खाल्ल्यामुळे गावातील असंख्य कुत्री व कावळे मृत्युमुखी पडतात.गावातील माणसे यशवंताची निर्भर्त्सना करतात .असंख्य कावळे त्याच्यावर डूख धरतात. यशवंताला घराबाहेर पडणे मुश्किल होऊन जाते.सगळ्या गावावर अशुभ संकेताचे सावट येते. गावावर काहीतरी मोठे संकट येणार, याची चर्चा सुरू होते. रात्रंदिवस धो-धो बरसणारा पाऊस , कुत्र्या – कावळ्यांचा पडलेला सडा , एकमेव वाचलेल्या काळ्या कुत्र्याच्या ईवळण्याच्या आवाजामुळे एका मोठ्या अरिष्टाची चाहूल .त्यामुळे सगळा गाव भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसतो .या सर्व घटनेला आपणच जबाबदार आहोत म्हणून यशवंताला पश्चाताप होतो. कावळे तर त्याचा पिच्छा सोडत नाही. घराबाहेर पडल्यावर त्याच्यावर झडप घालतात. त्याला घराबाहेर पडणे मुश्किल होते. त्यामुळे त्याला बाहेर कुठेही तोंड दाखवायला जागा राहत नाही .या सर्व गोष्टींना वैतागून यशवंता बायको पार्वतीसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो.तो पत्नीला म्हणतो , ” या कर्जाच्या पुरात आशेचं कुठलं मूळकांडच दिसत नाय मला . बघ मी कसा वाहात चाललोय . मग एकटी राहून काय करशील ? चल माझ्या जोडीनं .लग्नाची थोरली ,पाठच्या दोघी. ढिगभर कर्ज ! कुठं कुठं पुरशील ? दोन दिवसात तो शंकर सावकार घरात शिरंल , कर्ज फेड नायतर जमीन कर माझ्या नावावर.आन हातची जमीन विकली तर नंतर आपल्या पोरी जातील कुठे ? त्या परास आपणच संपवून टाकू .कशाला हवा हा पाश ? मेलोतर आजची काळजी जाईल उद्यावर. बघेल काय ते भाव .” (पृष्ठः ३५ ) यावरुन यशवंता बळजबरीने पार्वतीला आत्महत्येस प्रवृत्त करताना दिसतो . ती तयार होत नाही . तिला आपल्या पश्चात मुलींचे भवितव्य दिसते .नवऱ्यापेक्षा ती धोरणी व कणखर आहे. यशवंता पायाजवळ बघतो , उद्याचा विचार करत नाही. पार्वती मात्र मुलींच्या भविष्याचा विचार करताना दिसते. ती नकार देते. वारंवार नकार देते .पण यशवंता बळजबरीने तिला विष पाजतो . तिच्यानंतर तोही स्वतः विष घेऊन आयुष्य संपवून टाकतो. यावरुन सूचीत होते की , पार्वती सगळ्या संकटांशी लढताना दिसते. यशवंता मात्र प्रत्येक ठिकाणी हार खाताना दिसतो . आपणास मुलगा झाला नाही , मुलीच झाल्या यालाही तो पत्नीला जबाबदार ठरवतो. मुलगा न होता मुलीच झाल्या तर त्यासाठी सर्रासपणे पत्नीला दोषी ठरवले जाते .नव्हे नव्हे ही समाजाची मानसिकताच दिसते .ज्या सावकाराचे यशवंतावर कर्ज असते , तो कुचेष्टेने म्हणतो , ” जमीन तर चांगली न्हाती धुती हाय , एखाद्याकडनं पोरीच जर होत असतील तर बेनं बदलून बघावं .दोन पोरगंच आहेत मला . ” ( पृष्ठः३६) यात सावकाराचा निर्लज्जपणा तर आहेच पण स्त्रीला केवळ भोगवस्तू मानायची ग्रामीण मानसिकताही दिसते .आपला समाज सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला नाही .असे या प्रसंगावरुन दिसते . शिवाय असं म्हणणारी माणसं लांबची नसतात तर नात्यातलीच असतात . शंकर सावकार भावकीतलाच आहे . पार्वतीला धाकट्या दीरावानी .ती त्याला आदराने रावसाब म्हणते. ग्रामीण भागात आजही स्त्रीला कुचेष्टेचे धनी व्हावे लागते .पार्वतीची इच्छा नसताना यशवंता तिला बळजबरीने विष पाजतो. यावरुन आजही ग्रामीण भागात तमाम स्रियांची निष्क्रिय नवर्‍याबरोबर फरपट होताना दिसते.शिवाय मुलगा होणार अशी अपेक्षा असतानाही जर मुलगी झाली तर तिचं नाव नकोशी ठेवले जाते. हा एक मोठा सामाजिक गैरसमज ग्रामीण भागात रुजलेला आहे .शिक्षणाचे प्रमाण वाढले पण शहाणपण न वाढल्याचा हा परिणाम आहे. अखेरपर्यंत पार्वती आपल्या फाटक्या परिस्थितीशी चिवटपणे लढा देत राहाते. म्हणून ही कादंबरी वाचताना तिच्याविषयी सहानुभूती वाटत राहाते .तिच्या विषयी लेखकाने केलेले भाष्यः मोठे समय सूचक आहे. कादंबरीकार म्हणतात की, ” पार्वतीला मला या गोष्टीत मारायचे नव्हते .मुळात तिच्या जीवनाची दोरी निसर्गतःच आम्हा पुरुषांहून फार बळकट आहे. सलग दोन-तीन वर्षांच्या दुष्काळात वगळाच्या काठावर आपल्या पानाफुलातून बोलत इतरांच्या जगण्यातला आधार देणाऱ्या या रानटी वेलीसारखी ती आहे .फार कमी उर्जेवर तग धरुन उभं राहण्याची क्षमता असते त्यांच्यात . अशी ती इत्यंभूत स्री ! पण व्यवस्था जिवंत ठेवू शकली नाही तिला. पार्वती मेली .” ( पृष्ठः ३७ ) लेखकाने असा हा तमाम स्री वर्गाचा केलेला गौरव येथे सुसंगत आहेच पण कथेची उंची वाढविणारा आहे . शिवाय सामाजिक व्यवस्था जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत स्त्रियांचे भोग संपणार नाही .असा संदेशही लेखकाच्या या निवेदनातून व्यक्त होताना दिसतो .
आई-वडिलांच्या आत्महत्येनंतर आता कुटुंबाचे काय ? हा खरा प्रश्न आहे . कादंबरीचा बराचसा भाग त्यावर आधारलेला आहे . ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्येचे काय परिणाम त्याच्या कुटुंबावर होतात ? याचे वास्तव चित्रण या कादंबरीत आहे . उषा , आशा आणि नकोशी यांच्या दुःखाला पारावार राहात नाही. या तिनही मुली अनाथ होतात .त्यांच्या डोक्यावरील मायेचे छप्पर नाहिसे होते .पुण्याला नोकरीला असणारे चुलते विलास व चुलतभाऊ विश्वास त्यांच्या मदतीला धाऊन येतात .चुलते तर पुरते भांबावून जातात.ते भावाला व भावजईला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करतात . पण त्याच्या हाताला यश येत नाही. विश्वासने स्वतःला सावरलं . बहिणींचे डोळे पुसले. ” रडायचं नाही आता ! मी आहे ना .” असा विश्वास त्याने आपल्या बहिणींना दिला .परंतु तोही या दोन आत्महत्यांमुळे पुरता हादरुन गेला आहे .या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर चुलत का असेना पण आपल्या बहिणींविषयी गावात सुरु झालेली चर्चा या गोष्टीमुळे त्याच्या मनाला क्लेश होतो . शेतकरी आत्महत्येचं गांभीर्य तोवर लक्षात येत नाही जोवर तो अनुभव आपल्या व्यक्तिगत पातळीवर उतरत नाही. हे आता त्याच्या लक्षात यायला लागतं .नाही तरी अशा मथळ्याच्या बातम्या रोज पेपरात असतातच की . त्या वाचून एका निःशब्द हळहळीशिवाय आपण काहीच करु शकत नाही .जेव्हा अशी घटना आपल्या घरात घडते तेव्हा त्या घटनेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. तसा विश्वास इतर तरुणांसारखा आत्मकेंद्री नाही .गावच्या ठिकाणी असावेत तसे रुढार्थाचे सरंजामी संस्कार त्याच्यावर झालेले नाहीत . घराचा विकास, त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त, अनाठायी खर्च कुठे करायचा नाही . आहे त्यात समाधानी राहायचं .शक्यतो कसलं व्यसन लावून घ्यायचं नाही . वडीलधाऱ्यांना आदर आणि एखाद्याची मर्जी हासील करण्यासाठी हवी असलेली नम्रता ही सर्व लक्षणं त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहेत .त्याचा जिवाभावाचा मित्र सुभाष .सुभाषमुळेच तालमीत जाऊन तो व्यायाम करायला शिकला . ग्रामपंचायतीत सतरंजीवर बसून पेपर आणि गोष्टीची पुस्तक वाचायला शिकला . मुख्य म्हणजे सुभाषमुळेच त्याला वाचनाची आवड लागली .त्याला आपल्या गावाविषयी विशेष लळा आहे. चुलता चुलतीचा तो लाडका आहे . वर्षातून किमान एक दोन वेळा सुट्टी मिळाल्यावर तो गावाला चक्कर मारतो .पुण्यात तो पुरोगामी डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संघटनेची दोन-तीन शिबिरं व दिल्ली पर्यंतचे मोर्चे त्यात तो सहभागी झालेला आहे. आता तो महाराष्ट्रातील एका नामवंत कृषी विद्यापीठात बीएस्सी .ॲग्री.च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. त्यामुळे शेती विषयीची त्याची वेगळी मते आहेत .असा विश्वास आता आपल्या बहिणींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. शंकर सावकाराच्या कर्जामुळेच आपल्या चुलत्याने आत्महत्या केली . याची त्याला आता खात्री पटते .गावातील चर्चा त्याच्या कानावर आलेली आहे .शंकर सावकाराचा यशवंताच्या जमिनीवर डोळा आहे.आपल्यावर ही बिलामत येणार याची कुणकूण लागल्यामुळे सावकार सावध होतो .उषा व सुभाष यांचे प्रेम प्रकरण गावात पसरवतो .मुलगी सुभाषबरोबर पळून जाणार असे कळल्यामुळे यशवंताने आत्महत्या केली अशी चुकीची वार्ता गावभर पसरवतो . की जेणेकरुन हे बालंट आपल्यावर येऊ नये. पण असे होत नाही. ” कर्जबाजारी शेतकरी पती-पत्नीची विष पिऊन आत्महत्या ” ( पृष्ठः १०७ ) अशी बातमी वर्तमानपत्रात येते व खरा गुन्हेगार गावाला कळतो. दुसऱ्या दिवशी शंकर सावकाराला अटक होते .मात्र त्यानंतर उषा व सुभाष यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा गावभर पसरते .आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या कुटूंबाची संपूर्ण गावात बदनामी झाल्यामुळे उषाला अत्यंत वाईट वाटते .
सुभाष मात्र उषावर मनापासून प्रेम करतो .तो या गावचा नाही . विजापूर कडचा आहे. मोलमजुरी करुन पोट भरण्यासाठी त्याचे आई वडील या गावात आलेले आहेत . लहानपणीच्या सहवासातून या दोघात स्नेह वाढत गेला. उषाच्या घरी सुभाषचे येणे जाणे सुरु झाले. तो एसवायबीए ला आणि उषा दहावीच्या वर्गात शिकत असते . सुभाष अभ्यासात अत्यंत हुशार . गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्याला कष्टाची जाण होती .त्याला कुस्तीचा नाद होता .आखाड्यात उतरुन कुस्तीत मिळालेल्या बक्षिसांचे पैसे साठवून तो शिक्षणाचा खर्च भागवत असे. त्याचे उषावर निरपेक्ष प्रेम होते .त्याच्या पाकिटाच्या कप्प्यात तिचा फोटो पण होता.तो परिश्रमपूर्वक सैन्यात भरती झाला होता.हिमाचल प्रदेशात लष्करात सेवा बजावताना तो उषाशी पत्राने संपर्कात होता. उषाने सुभाष बरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा डाव आखला होता.परंतु अवकाळी पावसाने व उषाच्या आई-वडिलांच्या आत्महत्येने त्यांचे सर्व मनसुबे धूळीस मिळविले . बातमी कळताच सुभाष धावत येतो .उषा व तिच्या बहिणींना आधार देतो. रात्रभर पावसात उषा जवळ बसून राहतो .असा हा सुभाष उषाच्या कुटुंबावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे त्यांच्या दुःखात सहभागी होतो .शंकर सावकाराने हे आत्महत्या प्रकरण त्यांच्या प्रेमप्रकरणाशी जोडले होते . परंतु प्रसाद कुलकर्णी या वार्ताहराने या आत्महत्येमागील सत्य शोधून काढले .शंकर सावकाराच्या छळाला कंटाळूनच यशवंताने पार्वती सह आत्महत्या केली.या बातमीने गावातील चर्चेचा सूर बदलतो.पोलीस संशयीत गुन्हेगार म्हणून शंकर सावकाराला अटक करतात .सुभाष व उषा यांच्यावरील संशयाचे किटाळ दूर होतं . परंतु शंकर सावकार भावकीतला असल्यामुळे त्याला गावकऱ्यांची सहानुभूती मिळते .उषा कुचेष्टेची बळी ठरते .भावकीतल्या स्त्रियांनी तिचा साधा तोंडचा कडू घास पण काढला नव्हता. चुलत्यांचा पण तिच्यावर राग आहे .पण ती धिरोदात्तपणे आलेल्या प्रसंगाला सामोरी जाते. आई बापाच्या माघारी आता आपल्यालाच हे सावरायचं आहे .याची तिला जाणीव आहे .गोठ्यात गुराढोरांची उपासमार तिला बघवत नाही .म्हणून ती गुरांना चारा आणण्यासाठी रानात जायला निघते .तेव्हा चुलता म्हणतो , ” काही गरज नाही, तुला कळत नाही , घरात काय झालंय आणि तू मळ्यात निघालीस एकटी. तिथे कोण भेटणार आहे का तूला ? ” त्यावर मात्र ती रागाने म्हणते ,” कालपासून गुरं बांधून आहेत उपाशी ,कोण भेटणार असेल , तर बघायला या पाठीमागून .” ( पृष्ठः १०२ ) यावरुन तिचा खमक्या स्वभाव कळतो. ती कुणाच्याही बोलण्याला भीक झाली नाही . आलेल्या संकटाने ती डगमगत नाही . ती म्हणते ,” विसरुन जातील माणसं , परत बोलायला लागतील . खरं खोटं काय ते बाहेर येईलच कधीतरी . आणि विचारलं कोणी तर सांगेन केलं मी त्याच्यावर प्रेम. अजूनही करते .म्हणून मी माझं घर सोडणार नव्हते.” (पृष्ठः १०३ ) असं म्हणणारी उषा बाणेदार स्वभावाची आहे .ती लेचीपेची नव्हतीच कधी.काय आहे ते बेधडक तोंडावर बोलणारी . आलेल्या परिस्थितीला तोंड देत ती उभी राहाते . एकटा सुभाषच नव्हे तर अन्य मुलेही तिच्यासाठी वेडी व्हायची . सायकलवरुन कॉलेज करीत होती . मात्र ती घमेंडखोर नव्हती. सर्वांशी बोलायची आणि मर्यादेत राहायची. म्हणून तिचा नाद कोणी करीत नसत .वेळ आली तर चावडीवर एखाद्याचं गचूरं धरायलाही ती कमी करत नव्हती .अशी ही उषा मोठ्या धाडसाने आलेल्या संकटाला सामोरी जाते . आपल्या प्रेम प्रकरणामुळे नसून कर्जबाजारीपणामुळे आई-वडिलांनी आत्महत्या केली .असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न करते. सुभाषवरील प्रेम नाकारत नाही .परंतु परिस्थिती अभावी त्याच्याशी लग्नाचा नाद सोडून दोन्ही बहिणींना सांभाळण्याचा निर्णय घेते. खरं तर ही संपूर्ण कादंबरी म्हणजे उषाची शोकांतिका आहे. तिच या कादंबरीची खरी नायिका आहे. ती मोठी असल्यामुळे आई-वडिलांच्या आत्महत्येचे चटके तिला अधिक सोसावे लागतात. तिच्या दुर्दैवाचीच ही गोष्ट आहे.
अशा प्रकारे आनंद विंगकर यांची ” अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ” ही कादंबरी शेतकरी आत्महत्येचे परिणाम चित्रित करणारी कादंबरी आहे .आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची झालेली वाताहत मनाला चटका लावून जाते. अवकाळी पावसाच्या रुपाने आलेले अस्मानी संकट व शंकर सावकाराच्या कर्जबाजारीपणाला वैतागून यशवंता व पार्वती यांनी विष पिऊन केलेली आत्महत्या . हा विषय या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे . आत्महत्येनंतर त्या शेतकरी कुटुंबाला भयाण वास्तवाला सामोरे जावे लागते. जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो .शेवटी आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नावरचा उपाय होऊ शकत नाही. याउलट मागे राहणाऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात .आत्महत्येमुळे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत याउलट आहे त्या प्रश्नांची तीव्रता वाढते व अख्ख्या कुटुंबाची परवड होते .असा संदेश देणारी ही कादंबरी आहे.

Recommended Posts

उपरा

Alka Jagtap
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Alka Jagtap
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More