Review By डॉ. सुवर्णा खोडदे, मराठी विभाग प्रमुख, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी, पुणे ४११०२७
१९०७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लेखक मॅक्झिम गोर्कि यांनी लिहिलेली ‘आई’ ही प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे. या कादंबरीत रशियन क्रांती, मालकवर्ग व कामगारांमधील संघर्ष, हुकूमशहा झारच्या विरोधात उठाव करण्यासाठी कम्युनिस्ट तरुणांचे प्रयत्न, त्यांचा होणारा छळ, त्यांच्यावरील सरकारचा दबाव, कारखान्यांसाठी कष्ट करत, खितपत मरणारे कामगार, त्यांच्या मनातली भीती, असंतोष आणि या सगळ्यामध्ये आपल्या मुलाच्या काळजीने स्वतःला लढ्यात झोकून नव्याने आयुष्याला सामोरं जाणाऱ्या आईची ही कथा होय .
या कादंबरीतील स्त्री, एक केविलवाणी बायको, काळजीग्रस्त आई आणि मुलाच्या विचाराला खंबीरपणे पाठिंबा देणारी, त्याचा लढा सुरू ठेवत इतर लोकांसाठी आदर्श बनलेल्या आईचा हा प्रवास. फक्त पुस्तकं वाचली, कामगारांना सत्य सांगणारी पत्रकं वाटली म्हणून मुलाला अटक होईल या काळजीने घाबरलेली आई ते ‘तुला हे जमेल ना!, घाबरणार नाहीस ना!’ असं विचारल्यावर चिडणाऱ्या आणि ‘आई, तुला जेलमध्ये जावं लागतंय’ असं सांगितल्यावर, ‘मला त्याची पर्वा नाही!’ असं ठामपणे सांगणाऱ्या, अनेक लोकांसमोर खंबीरपणे भाषण देणाऱ्या, त्यांना प्रेरणा देणाऱ्या आईचा हा प्रवास कमालीचा भारावणारा, थक्क करणारा आणि प्रचंड प्रेरणादायी आहे.
अटक झालेल्या मुलाला वाचवण्यासाठी क्रांतिकारी लढ्यात सहभागी होणे, वेळोवेळी आपल्या भावना आणि श्रद्धेवर होणारे आघात सोसणारी, शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस मारत असतानाही, कामगारांसाठी लढणारी ही आई, ‘कामगारांनो उठा! मनानं एक व्हा! तुमची शक्ती दुसऱ्यांना देऊ नका, जगातल्या साऱ्या वस्तूंचे तुम्ही निर्माते आहात, तुमची शक्ती एकत्र करा, तरच तुम्ही सगळं जग जिंकाल!’ असं ओरडून सांगते तेव्हा खरंच आपल्या मनामध्येही चैतन्याची ज्योत उजळते. आपल्या सुरक्षित परिघातून बाहेर पडल्याशिवाय कोणतेही परिवर्तन होत नसते हा खूप महत्त्वाचा धडा या कादंबरीतून घेण्यासारखा आहे असं मला वाटतं. ‘आई’ ही केवळ एका क्रांतिकारी लढ्याविषयीची कादंबरी नाही तर चळवळीत सामील झालेली साधी माणसं अंतर्बाह्य कशी बदलून जातात, याचे चित्रण या कादंबरीत वाचायला मिळते.