दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली खरी पण चित्रपटात किंवा नाटकात स्त्री भूमिका करणे स्त्रियांसाठी अतिशय निषिद्ध समजले जात होते. पण समाज बदलला तसे हळूहळू का होईना चित्रपट सृष्टीचे दार स्त्रियांसाठी खुले झाले. माणूस या चित्रपटातील ‘आता कशाला उद्याची बात’ हे शांता हुबळीकरांवर चित्रित झालेले गाणे अजूनही बरेच प्रसिद्ध आहे.
चित्रपट सृष्टीत बरीच लोकप्रियता मिळवलेल्या शांता हुबळीकर यांचे हे आत्मचरित्र आपल्याला त्यांच्या बालपणाविषयी, चित्रपटसृष्टीतल्या अनुभवांविषयी,त्यांचे लग्न,संसार, मुलं आणि त्यांच्या पतीने केलेले लैंगिक आणि आर्थिक शोषण, मुलाच्या प्रदीप या नावाने बांधायला घेतलेला बंगला शेवटी दीप बंगला कसा झाला याची आठवण, प्रदीप नावातील ‘प्र’ गळून गेला आणि तो दुरुस्त करण्याची नसलेली आर्थिक परिस्थिती, चित्रपटसृष्टीतील महिलांच्या वावराविषयी, त्यांच्या होणाऱ्या शोषणाविषयी देखील बरीच माहिती देते.
चित्रपटसृष्टीतून त्यांना बरीच प्रसिद्धी आणि पैसा मिळाला असला तरी पुरेशा आर्थिक नियोजना अभावी त्यांचे आयुष्यातील उत्तरार्धाचे दिवस अतिशय हलाखीत गेले.
नुकतेच 2024 मध्ये मल्याळम चित्रपट सृष्टीवर स्त्री अभिनेत्रींनी केलेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता स्त्री कलाकारांची चित्रपटसृष्टीतील परिस्थिती शांता हुबळीकरांच्या काळापासून अजूनही फारशी बदललेली दिसत नाही असे जाणवते.