“नुकतेच हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी लिहीलेले व सविता दामले यांनी मराठीत अनुवादीत केलेले पुस्तक वाचनात आले. हे एक आत्मकथन असून यामध्ये प्रेमाची असफल कहाणी तसेच मित्रांनी केलेल्या विश्वासघाताची कहाणी आहे. ‘सोशल मीडिया’ एखाद्याच्या जीवनात कल्पनाही न केलेली एक बिकट परिस्थिती कशी निर्माण करू शकते याचे वर्णन या पुस्तकात केले आहे. पुस्तक वाचताना वाटते ही एक काल्पनिक कहाणी असावी परंतु ही काल्पनिक कहाणी नसून प्रेम एखाद्याची अवस्था काय करू शकते याच कटू वास्तव आहे.
ही सत्य कहाणी हमीद अन्सारी या तरुणाची आहे. हमीद अन्सारी हा मुंबईतील एक ‘आयटी इंजिनीअर’ सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवतीच्या प्रेमात पडतो. मात्र या युवतीचं वास्तव्य असतं पाकिस्तानात. ती युवती आपले हे प्रेम प्रकरण घरच्यांना स्वतः सांगत नाही तर त्यासाठी ती हमीदला पाकिस्तानात बोलावते. तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला हमीद हे धाडस करायला तयार होतो. पण पाकिस्तानला जाण्यासाठी त्याला पासपोर्ट व्हिसा मिळतं नाही.युवती ज्या ठिकाणी राहत असते ते ठिकाण अफगाणिस्तान सीमेवर असते. मग हमीद अफगाणिस्तानात जाऊन तेथून घुसखोरी करून पाकिस्तानात जाण्याची एक अत्यंत धाडसी योजना हमीद तयार करतो.
कुटुंबीयांना तो आपण काही व्यावसायिक संधींसाठी अफगाणिस्तानात जात आहे असं सांगून अफगाणिस्तानात जातो. अफगाणिस्तानातील काही मित्रांच्या सहकार्याने तो पाकिस्तानात शिरकाव करतो. पाकिस्तानात त्याच्याशी दगाफटका होतो व तो पकडला जातो पकडल्यानंतर काय करायचं, याची कोणतीही योजना त्याने केलेली नसते.मग तिथून सुरू होते त्याच्या प्रेमाची दाहक आणि अंगावर काटे आणणारी कहाणी.
पाकिस्तानात त्याला भारतानं पाठवलेला हेर म्हणून पकडलं जाते.त्याला तुरुंगात टाकले जाते,तुरुंगात मोठ्या प्रमाणावर छळ केला जातो. इकडे भारतात हमीदचे कुटुंबीय त्याच्याशी संपर्क होत नसल्यानं कमालीचे बेचैन झालेले असतात. ते त्याची समाजमाध्यमांवरील खाती उघडतात आणि आपला मुलगा अफगाणिस्तानातून ‘घुसखोरी’ करून पाकिस्तानात गेला आहे, हे वास्तव त्यांच्या समोर येते. त्याचे कुटुंबीय त्याला सोडविण्यासाठी फार प्रयत्न करतात परंतु त्यांना यश येत नाही. यावेळी त्यांना मदत करतात मुंबईतील एक शांततावादी कार्यकर्ते आणि भारत-पाक मच्छीमारांसंबंधात अतुलनीय कामगिरी करणारे जतिन देसाई आणि लोकमत समूहाचे पत्रकार राजदीप सरदेसाई. जतिन देसाई हमिदच्या कुटुंबीयांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घडवून देतात. हमीदची शिक्षा संपताच, तो लगेच भारतात कसा परततो याचे अंगावर शहारे आणणारे वर्णन मुळातूनच वाचायला हवे.
हमिदच्या पाकिस्तानातील अनुभवावर पुस्तक लिहण्यासाठी ‘इंडिया टुडे’च्या पत्रकार गीता मोहन यांनी हमिदला बोलते केले व त्याच्या पाकिस्तानातील परिस्थितीचे चित्रण या पुस्तकात केले आहे . गीता मोहन यांनी ही कहाणी सांगताना एक बाज निवडला आहे. एका प्रकरणात थेट हमीद आपल्याशी बोलत असतो अशी मांडणी केली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात लेखिका तटस्थ नजरेने हा अंगावर येणारा हमिदचा भूतकाळ चित्रित करत असते. पाकिस्तानातील दगाबाज मित्रांची ही जशी कहाणी आहे, तसेच पाकिस्तानात हमीदच्या मदतीलाही धावून आलेले आणि हमिदच्या कुटुंबीयांना कशी साथ दिली,त्याचेही वर्णन या पुस्तकात आहे. त्यातून सीमेपलीकडेही माणुसकीचा ओलावा कसा असतो, त्याचीही प्रचीती येते.
हमीद’ हे आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे कहाणीचा ओघ कुठेही तुटणार नाही आणि वाचक पुढे वाचतच राहील, अशा सुबोध पद्धतीनं त्यांनी ही कहाणी आपल्याला सांगितली आहे.