नाव :-जगताप प्रतिक प्रभाकर
जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ,( ग्रंथालय प्रशिक्षणार्थी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ,
इळनमाळ हे अशोक पवार यांची २००८ मध्ये प्रकाशित झालेली आत्मचरित्रात्मक कादंबरी. भटके जीवन,जातपंचायत , दारिद्र्य , व्यसनाधीनता , शिक्षणाचा अभाव,पोटाची आग, अंधश्रद्धा , जातिव्यवस्थेने गुन्हेगार ठरवलेली जमात या विळख्यात जखडून पडलेल्या बेलदार या भटक्या विमुक्त जातीचे यामध्ये चित्रण आले आहे.
सदर चित्रण वाचून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लेखक लोकनाथ यशवंत लिहतात आयुष्य खूप घाणेरडी शिवी वाटली. जीवन असंच असतं काय? संस्कृती वगैरे म्हणतात ती काय आहे? समाज वगैरे हा काय प्रकार आहे? आपल्या स्वतंत्र देशातील बांधव एवढ्या खालच्या स्तराचं आयुष्य जगतात, याचं कुणाला काहीच वाटत नाही? त्यांना मतदानाचा अधिकार नाही. गाव नाही. पोलीस गोचिडासारखे त्यांना सोडत नाहीत. अशोक पवार अन् त्यांच्या बांधवांचं जीवन दुःखदायी आहे. संताप आणणारं आहे. क्लेशदायी आहे. माणूस म्हणून उभं राहायला जे काही लागतं ते त्यांच्या जवळही फिरकत नाही. आणि आपण कोणत्या बलशाली देशाच्या बाता करतो ?
तर असं हे पुस्तक वाचताना जाणवलेल्या काही महत्वाच्या बाबी…
भटके जीवन – विसाव्या शतकात आपण झालेल्या सामजिक सुधारणांच्या गप्पा मारत असताना या भटक्या विमुक्त जातींच्या या परिस्थितीचा आपल्याला ठावठिकाणाच नसतो. मग ज्या वेळी अशोक पवार यांच पडझड, इळनमाळ असो की धनंजय धुरगुडे यांच माझा धनगरवाडा अशी आत्मवृत्त ज्या वेळी येतात तेव्हा आपला घसा कोरडा होतो अन् शब्द हरवून जातात.इळनमाळ मध्ये गावोगावी भटकणाऱ्या आणि काबाडकष्ट करणाऱ्या या बेलदार समाजाची गोष्ट वाचताना हृदय तीळ तीळ तुटत. ना मतदानाचा अधिकार, ना रेशन कार्ड, अन् नाही कुठल्या सरकारी सोयी सुविधांच ज्ञान.आलेला प्रत्येक दिवस भटकत संघर्ष करत, अत्याचार सहन करत ढकलायचा एवढच काय ते.यामध्ये मारुती शाळेत शिकत असताना त्याच्या शाळेला सुट्टी लागते तेव्हा आपल बिऱ्हाड कुठल्या गावी आहे याचा शोध घेण्यासाठी त्याला रात्रीपर्यंत पायपीट लागते.
जात पंचायत – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून उर बाडवणारे आपण. पण समाजातील सर्वच घटकात कायदा, स्वातंत्र्य, समता या गोष्टी पोहचल्यात का असा मोठा प्रश्न घेवून ही कादंबरी समोर उभी राहती. आज ही समाजातील अनेक जाती- जमातीत जातपंचायत नावाचा असुर आपली मक्तेदारी सरास पणे चालवतोय. कधी दुसऱ्या समाजात लग्न केल, तर कधी प्रेम विवाह तर अनेकदा लहान पणी ठवलेल लग्न न मानता मनाप्रमाणे दुसरीकडे विवाह केला कारण काही असो या जात पंचायतीतील पंच बसून स्वतःचा कायदा निर्माण करून क्रुर शिक्षा करतात अन् त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला की संपुर्ण कुटुंबावर बहिष्कार घालण्याच अस्त्र वापरल जात परिणामी ती शिक्षा भोगण्या शिवाय पर्याय समोर नसतो. शिक्षा तर स्वीकारावी लागतेच पण आलेल्या पंचांचा दारूचा खर्च आणि मटणाचा खर्च देखील करावा लागतो. तर अशाच जतपंचायतीच भीषण वास्तव लेखकानं यात मांडलय.
भारतीय राज्यघटनेने केलेले कायदे हे केवळ शिक्षण घेऊन सुदृढ झालेल्या विचारांच्या माणसांसाठी आहे का हा प्रश्न इळनमाळ वाचताना डोक्यात भिनभिनत राहतो.
स्त्रियांवरील अत्याचार – इळनमाळ पुस्तकामध्ये स्त्रियांची परस्थिती वाचताना डोकं सुन्न होउन जात.
रोजच्या भाकरीसाठी पुरुषांच्या तोडीचं काबाड कष्ट करून देखील भाकरीसाठी गावभर भीक मागावी लागते. एकदा तर पोटासाठी बलात्कार ही सहन करावा लागतो अन् एवढा अक्षम्य कृत्य आपल्या सोबत घडून देखील त्याची वाच्यता न करत मिळालेल्या धान्याच्या वाट्याचा झगडा चालतो. सामान्य घरात रोज जेवढ्या भाकरी शिळ्या राहतात तेवढ्या भाकरीच्या तुकड्यासाठी कुणीतरी स्त्री आपली अब्रू खर्ची घालते हे वाचताना एकदम असह्य होतं…
एवढा त्याग, एवढं कष्ट एवढी फरफट सोसुन देखील दारुड्या नवऱ्या कडून रोजचा मार चुकत नाही, शिव्या चुकत नाही, अपमान चुकत नाही …. अन् हे जगणंही चुकत नाही!
दारिद्र्य – प्रस्तुत पुस्तकामध्ये चाललेली भटकन हीच मुळात पोटासाठी आहे. गावोगावी फिरून जनावरा सारखं कष्ट करून मिळल तो भाकर तुकडा पोटात ढकलून आजचा दिवस जगणं. ज्या दिवशी हाताला काम नसल त्यादिवशी गावात भीक मागून भाकर तुकडा जमवण्याची धडपड.
इळनमाळ या आत्मचरित्रात्मक कादंबरीत मुख्य पात्र असलेला मारोती स्वतःच्या गर्भवती पत्नी राधाला घरात अन्न नसल्याने चोरी करून तुरुंगात जाण्यास प्रोत्साहित करतो कारण तुरुंगात तरी आपल्या गर्भवती पत्नीला दोन वेळचं पोटभर जेवण मिळल. कुठ आजच्या काळात गर्भधारणेच्या वेळी कित्येक चाचण्या करुन अन् गर्भसंस्कार चे पालन करून होणाऱ्या मुलाची/मुलीची काळजी घेतली तर इथ माञ आपल्याला तर उपसमरीची सवय आहे पण पोटातल्या त्या गोळ्याला उपासमारीचा धगा फटका नको म्हणून चोरी करून तुरुंगवास…. दोन वेळच्या भाकरीसाठी!
अंधश्रद्धा – दारिद्र्य , व्यसनाधीनता चिखलात अडकलेल्या समूहाला आपल्या सुटकेच्या आशेचा किरण देवाच्या हाती दिसतो अन् तिथून चालू होती पारंपारिक चालत आलेली अंधश्रद्धा.
एवढं अठरा विश्व दारिद्र्य असतानाही देखील देवाच्या निवेदा साठी मात्र जोरात खर्च केला जातो. प्रसंगी उपाशी पोटी राहणार हा समाज देवाच्या कार्यासाठी बोकड आणि दारूसाठी भरपूर पैसे खर्च करतो.
पोलिसांकडून मिळणारी वागणूक -स्वातंत्र्याच्या आधीपासून चालत आलेली चातुवर्ण समाज व्यवस्थेने प्रत्येकाला जातीनुसार काम , उपाध्या विभागून दिली होती ती जातीय व्यवस्था स्वातंत्र्यानंतर नष्ट झाली असा आपला विश्वास वास्तवात मात्र फाटका वाटतो.
भारतीय जातीव्यवस्थेने बेलदार समाजाला पूर्वी गुन्हेगारी करणारा समाज अशी ओळख दिली . परंतु आज विसाव्या शतकात देखील या विकृत व्यवस्थेचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही हे आवर्जून सांगावेसे वाटते. प्रस्तुत कादंबरीत अनेकदा पोलीस गुन्हेगार सापडला नाही तर या समाजातील लोकांना तुरुंगात टाकून जनावरा प्रमाणे मारत , स्त्रियांवर अत्याचार करत. हे सर्व बघून एम. ए.च शिक्षण घेवून आलेला मारुती पेटून उठतो.शिक्षण घेताना वाचलेले बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड करायला भाग पाडतात पण जाब विचारण्यास गेलेल्या मारुतीलाच इथले पोलीस मारझोड करून मोरक्या घोषित करून तुरुंगात टाकून जातीव्यवस्था आजही तेवढीच जिवंत असल्याची जाण करून देतात.
व्यसनाधीनता आणि शिक्षण – रोज भाकरीसाठी फरफट चालू असली तरी दारू मात्र रोज नित्याने घेतली जाते. तिथे स्त्री-पुरुष, लहान मोठा असा भेद ही केला जात नाही. जत्रा , जातपंचायत अथवा लग्न किंवा कुठलाही संभारंभ असला तरीही दारू मात्र मोठ्या प्रमाणात गरजेची आहे. आणि त्यामुळे या नशेत गर्द झालेल्या या समाजाला शिक्षणाची आस्था राहिली नाही. पिढ्यान पिढ्या हेच काम करून जीवन जगणं जणू काही यांनी स्वीकारलच आहे असं जाणवतय.
याउलट कादंबरीचे मुख्य पात्र असलेला मारुती या खडतर आयुष्यातून आपलं शिक्षण पूर्ण करतो परिणामी समाजाला बदलण्यासाठी त्याच्या डोक्यात काहूर माजत. तो या चाललेल्या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एल्गार पुकारतो.
अशा तऱ्हेने इळनमाळ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी मराठी आत्मवृत्तांमधील भटक्या समाजाचं एक भीषण वास्तव दर्शविणारी कादंबरी आहे असे मला वाटते. त्यामूळे भावविश्वात जगणाऱ्या माझ्या सारख्या कित्येकांना वास्तवाचा चटका देवून भानावर आणण्याच काम ही कादंबरी करते.
जगताप प्रतिक प्रभाकर