नाव :- कल्याणी बनकर ,
मराठी विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे .
सारीका उबाळे यांच्या २०२१ साली प्रकाशित झालेल्या कथार्सिस या कवितासंग्रहातील कविता ही समग्र स्त्री
जातीच्या अनुभवांचे, बदलत्या विचारांचे, सुखदुःखाचे,शारीरिक-मानसिक स्थितीचे चित्रण करते. स्वतःला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणाऱ्या स्त्रियांची कविता,उसवलेले जीवन पुन्हापुन्हा विणू पाहणार्या स्त्रियांच्या जीवनातील अलौकिकत्व शोधणाऱ्या कविता, मोकळेपणानं स्वतःच्या लैंगिक भावभावनांना वाट निर्माण करून
देणार्या आणि बाईच्या लैंगिक प्रेरणांविषयी अतिशय तरलपणे बोलणार्या कविता, प्रियकरासोबत स्वच्छंदी आयुष्याचे चित्र रंगवणाऱ्या स्त्रियांच्या कविता अशा स्त्री
जीवनातील व्यामिश्र अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता या कवितासंग्रहात समाविष्ट आहेत.
कथार्सिस या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता सर्वसामान्य
जीवन जगणाऱ्या स्त्रियांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते. या कवितांची खासियत म्हणजे कवितांमध्ये फक्त स्त्री जीवनाचे वास्तव चित्रण केलेले नसून स्त्रियांच्या जाणीवा, विचार, पराकोटीची सोशिकता, अलौकिकत्व, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध असणारा असंतोष, विद्रोह यांच्या मुळाशी जाऊन विचार केला गेला आहे त्यामुळे या कवितांतून केवळ वास्तव चित्रण येत नाही तर ते वास्तव प्रखर आणि परखडपणे वाचकांसमोर येते. शिक्षित, अशिक्षित, आधुनिक, उपेक्षित, शहरातल्या, खेड्यातल्या, वस्तीतल्या अशा अनेकविध वातावरणात वावरणाऱ्या स्त्रियांची जाणीव सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करून वाचकाला अंतर्मुख होऊन स्वचिकित्सा करायला लावणारी कविता सारिका उबाळे यांनी लिहिली आहे. फक्त स्त्री जीवनातील चांगले वाईट अनुभवच नाहीत तर स्त्रियांच्या ' स्त्री ' असण्याविषयी, समाजातील दुय्यमत्वाविषयी या कविता भाष्य करतात.
मूर्ख अडाणी येडपट बायका, तळमळत्या बायका, खोटारड्या बाया, तल्लीन होतात बाया, स्वतःभोवती गोल गोल फिरत राहतात बाया यांसारख्या कवितांच्या शीर्षकावरुन सारिका यांचा रोजच्या जीवनात घडणार्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यातून निर्माण झालेला आवेग आणि पारंपरिक नात्याच्या जाळ्याला नकार देण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसून येते. आधुनिक समाजव्यवस्थेमुळे हतबल झालेल्या तरीही आत्मसन्मानाची आणि स्वातंत्र्याची भाषा बोलू न शकणार्या स्त्रियांन हायटेक जमान्यातली | कमावती उच्चशिक्षित | स्मार्ट तू | जात धर्म परंपरा | मान प्रतिष्ठा इभ्रतीच्या सावलीत बसून | काय कमवतेस बयो आता ? असा प्रश्न कवयित्री विचारताना दिसते. आधुनिक जीवन जगणाऱ्या, पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या, पैसे कमावणाऱ्या, हुशार, शिक्षित आणि आत्मनिर्भर स्त्रियांनाही आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा सांभाळत घरात व घराबाहेर अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.
तुम्ही द्याल तेवढा ओरडा खातात | कधी लाथा कधी बुक्क्या | तरी | तुम्हाला सोडून हलत नाहीत त्या | चिकटून
राहतात गोचीडीसारख्या या ओळींमधून दिसते ती पराकोटीची सोशिकता. काही ठिकाणी नवर्याला देवासमान मानणार्या तर काही ठिकाणी परिस्थितीमुळे
स्वतःला हतबल समजणार्या, स्वतःवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज न उठवणाऱ्या स्त्रियांना लेखिका मूर्ख अडाणी येडपट बायका असे संबोधते. तमाम पळपुट्या, बिचार्या | सोशिक | शिकून सवरून | वडाभोवती दोरा गुंडाळत | फिरणार्या | नटव्या उत्सवी बाया या ओळींमधून मनासारखं वागण्याची हिम्मत करू न शकलेल्या, परिस्थितीसमोर हतबल होऊन स्वतःच्याच मनाविरुद्ध वागणार्या स्त्रियांचे लेखिका खोटारड्या बायाअसे नामकरण करताना दिसते तर जिला करता आला नाही विरोध | जिला करता आला नाही विद्रोह | व्यवस्थेच्या विरुद्ध अशा स्त्रियांना लेखिका हीच ती असे म्हणून खुणावते आहे. हे चेहरे कुणाचे आहेत ? या कवितेतून बिनचेहर्याच्या बायकांना हे चेहरे कुणाचे आहेत | चेपलेले, दबलेले, पिचलेले ? असा प्रश्न कवयित्री विचारते आहे.
या सर्व कवितांच्या केंद्रस्थानी असली तरी या कवितांमधे वैविध्य असलेले दिसून येते. कवितासंग्रहाच्या उत्तरार्धातील कविता soul, वीण आणि दहशतीच्या कविता अशा तीन प्रकरणांमध्ये लिहिल्या आहेत. Soul या प्रकरणात शाश्वत प्रेमाचा आणि प्रियकराचा शोध घेणार्या कविता आहेत.
आता | असुरक्षिततेची सगळी | कवचं फोडून | विणूयात चल पाखरांची घरटी | आणि पिसं होऊन अलगद | तरंगत राहू वाऱ्यावरती… असे आपल्या प्रियकराला सांगून नात्याच्या सीमारेषा ओलांडून जगण्याचा स्वच्छंदी पट कवेत घेण्याचा प्रयत्न या कवितांतून दिसतो. वीण या प्रकरणात विणलेल्या, भ्रमिष्ट, लोकलमधल्या,गावाबाहेरच्या, सिग्नलवरच्या, लुटलेल्या, बुरख्यातल्या, बसमधल्या अशा विविध भूमिका पार पाडणार्या स्त्री जीवनाचे विविध पदर उलगडवत जाणारी कविता आहे. स्त्रियाच कशाप्रकारे स्त्रियांच्या प्रगतीत अडथळा आणतात, स्वतःला सुरक्षित वाटणार्या परंतु अतिशय संकुचित परिसरात वावरणाऱ्या स्त्रिया कशाप्रकारे पुरुषाचं पुरुषपण ठळक, अधोरेखित करत राहतात आणि नव्या पिढीत झिरपवत राहतात याबद्दल शुचिर्भूत ही कविता भाष्य करते. आता ही व्यवस्थाच उलथवून टाकू आम्ही | आता ही व्यवस्था तोडून मोडून टाकू आम्ही | हा धर्म जाळून टाकू आम्ही | अग्नीतून निघालेल्या याज्ञसेनी आम्ही | शपथ घेतो मिळून सार्याजणी की |आम्हाला डावावर लावण्याचा | तुमचा अधिकारच काढून घेतो आम्ही | आत्ता या क्षणी अशी विद्रोहाची, स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची भाषा
याज्ञसेनी, आणखी किती काळ ?, बिनचेहर्याच्या बाया यांसारख्या कवितांमधून प्रखरपणे येते.
स्त्रीवादी साहित्य, स्त्री लिखित साहित्य तसेच स्त्रीकेंद्री साहित्याची मोठी परंपरा मराठी साहित्याला लाभलेली आहे. स्त्रीवादी, स्त्री लिखित आणि स्त्रीकेंद्री या तीनही प्रकारच्या साहित्याच्या मुळाशी हा घटक केंद्रवर्ती असला तरीही साहित्याच्या या तीनही प्रकारांत भिन्नता
आहे हे लक्षात घ्यावयास हवे.
सीमॉन द बोव्हार यांनी लिहिलेल्या द सेकंड सेक्स या पुस्तकापासून पाश्चात्य जगात स्त्रीवादाची सुरुवात झाली.
कालांतराने या पाश्चात्य स्त्रीवादी चळवळीचे पडसाद भारतीय स्त्रियांच्या लेखनातूनही उमटू लागले हे खरे परंतु १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या स्त्री-पुरुष
तुलना या पुस्तकात भारतीय स्त्रीवादाची मुळे रोवली गेली आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून पाहता सारिका यांचा कथार्सिस हा कवितासंग्रह लक्षणीय ठरतो.