गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
कु. थोरात गायत्री नवनाथ
एफ.वाय.बी सी एस.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले 2000 साली स्पर्धा परीक्षा मार्गावर, सुरू केलेला प्रवास परिश्रमांनी यश अपयशांना तोंड देत 2010 साली UPSC परीक्षेतून IRS पदी निवड घेऊन खडतर प्रवास करणारे भरत आंधळे सर यांनी लिहिलेले हे प्रेरणादायी पुस्तक. गरुडझेप हे पुस्तक स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी तसेच शाळकरी विद्यार्थी आणि अगदी वयोवृद्ध लोकांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना तोंड देत आपल्या इच्छारुपी पंखांना जिद्दीचे बळ देत यशपूर्ती पर्यंतचा प्रवास लेखक भरत आंधळे यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे. आयुष्यातील अनुभव कथन करत असताना त्यांनी हे पुस्तक ५ प्रकरणांमध्ये लिहिलेले आहे. यामध्ये त्यांनी बालपणापासून सुरुवात करून आजोबांनी त्यांच्या शाळेत शिक्षकांशी भांडून, वाद घालून शाळेचा प्रवास कसा मिळवून दिला हे देखील सांगितलेले आहे. आजीचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास हे ही पुस्तकात कथन केलेले आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका हातात काठी व दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन डोंगराळ भागात गुरे चारण्यासाठी गेलेल्या लाल दिव्याची गाडी आणि अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून आहे अशा मुलाचा फोटो हे चित्र पाहायला मिळते आणि ते पाहून लेखक भरत आंधळे यांनी किती जिद्दीने, चिकाटीने अभ्यासाची तयारी केली असावी याचा प्रत्यय येतो आणि पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळते.
दहावी नंतर ITI करण्यासाठी लेखकांनी घेतलेली मेहनत, नंतर नोकरी करत, बाहेरून शिक्षण घेत असताना खाण्यापिण्याची झालेली गैरसोय, कच्ची भाकरी खाऊन काढलेले दिवस सारं काही या पुस्तकात आपणास वाचण्यास मिळते. याच काळात संजय पाटील यांच्याशी भरत आंधळे सरांची घट्ट मैत्री झाली. त्यांच्याशी भेट झाल्यावर लेखक म्हणतात की त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. PSI होण्याची तयारी करू लागले. शेवटी त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले. परंतु अजित जोशी नावाच्या मित्राची IAS पदी निवड झाली होती. त्यांचा सल्ला लेखक घेऊ लागले.
PSI नंतर 2004 साली रेल्वे टीसी, 2005 साली जलसंपदा विभागात नोकरी, 2007 साली LIC विकास अधिकारी तसेच 2008 साली समाज कल्याण खात्यातील नोकरी अशा विविध नोकऱ्या मिळवून ही आपले मुख्य ध्येय न विसरता सर्व सोयीचा त्याग करून ध्येयवेडे होऊन UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अथक परिश्रम घेत असूनही बऱ्याचदा येणारे अपयश, त्यावर लोकांकडून होणारी टीका हे सर्व त्यांनी सहन करत पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांनी केलेले प्रयत्न वाचून आपल्यालाही नव्याने प्रेरणा मिळते.
ठाणगावासारख्या खेड्यातील मुलगा ज्याचे वडील दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे कष्ट करणारा छोटा, प्रेमळ आजी, पाठिंबा देणारी आई, बहिण, त्यांची होणारी बायको, सखे, मित्र या सर्वांचे लेखकाने या पुस्तकात प्रसंगांरूप वर्णन केलेले आहे.
जीवन प्रवास सांगताना ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ असे सांगून स्वतःला धीर देऊन पुन्हा एकदा नव्या जिद्दीने परीक्षेची तयारी करत असताना अनेकदा अपयश येऊन जणू काही अपयशाचा जिनाच चढून वर आलेलो आहे असा उल्लेख करतात. भरत आंधळे सर म्हणतात ज्या क्षणी मी अपयशी व्हायचो त्याच क्षणी माझ्या मनात दडलेले ते स्वप्न अधिक गहिरे व्हायचे. “अशक्य असे काहीच नाही, बस जिद्द हवी” भविष्य आपल्या हातानं स्वप्नांच्या झुल्यात झुलवता येतं.
मला हे पुस्तक खूपच प्रेरणादायी वाटले. 2010 साली भरत आंधळे यांना कष्टाचे फळ मिळाले. ‘यशाने हुरळून न जाता आपल्यातले माणूसपण कायम टिकवून ठेवायचे’ आपले पाय जमिनीवरच ठेवून आपल्या गरीब व तळागाळातील मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे असे ठरवून त्यांनी समाजकार्य करण्याचे व्रत हाती घेतले. विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना व्याख्याने दिली, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य केले.
असे भरत आंधळे सरांच्या जीवनाची कहाणी प्रत्येकाने वाचावी असे माझे मत आहे. पुस्तकातील भाषा समजण्यास सोपी आहे. असा खडतर आणि प्रेरणादायी प्रवास पुस्तकरूपी माझ्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी लेखक भरत आंधळे सर यांचे मनापासून आभार मानते.