Review By Prof. Priyanka Pravin Mahajan, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
महाभारत या महानाट्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यामध्ये अनेक स्त्रियांचा सहभाग आहे. त्यातील गांधारी हे प्रमुख स्त्री व्यक्तिमत्व. परंतु गांधारीची लोकमाणसात रूजलेली किंवा मुद्दाम रुजवलेली कथा परिस्थितीशी अतिशय विसंगत आहे. सरोजिनी शारंगपाणी यांनी लिहिलेली ‘गांधारी’ कादंबरी महाभारतातील गांधारी या पात्राशी निगडित अनेक चुकीच्या गैरसमजाचे पडदे बाजूला सारते. कादंबरी वाचताना ही गोष्ट नक्कीच लक्षात येते की तिचा विवाह तिच्या पूर्वसंमतीने नक्कीच झाला नसेल. त्याकाळी सुंदर स्त्री म्हणजे राजघराण्यातील शोभा वाढवण्यासाठी आणलेली एक दिमाखदार वस्तू. त्यातून महादेवाचे कठोर तप करून व तपस्वी दुर्वास ऋषींकडून मिळालेल्या शंभर पुत्रांचा आशीर्वाद म्हणजे तर जण कुरुवंशाला लाभलेली अखंड शौर्य संपदा आणि या लालसेतूनच हस्तिनापूर सारख्या बलाढ्य राज्याने हिंदकुश पर्वतापलीकडील गांधार सारख्या छोट्या राज्याकडे केलेली विवाहाची मागणी सुबल राजाला राज्याच्या हितासाठी मान्य करावी लागून गांधारीचा सौदा करण्यात आला.
गांधारी म्हणजे अतिशय सौदर्यवती. पण धृतराष्ट्रासारख्या जन्मता अंध व्यक्ती सोबत जन्मगाट बांधत असल्याकारणाने भीष्म पितामह व राणी सत्यवती यांचा विरोध करण्याच्या हेतूने गांधारीने आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली पण असा आयुष्यभराचा अंधार कवटाळणे सोपं नव्हतं पण गांधारीने हे व्रत आजन्म पाळले.
आपल्या पुत्रांना तिने नेहमीच चांगले संस्कार देऊ केले परंतु त्यांच्या संपत्ती, राज्य यांच्या लालसेने आंधळे झालेल्या आपल्या मुलांना त्यांच्या होणाऱ्या सत्यानाशापासून वाचवू शकली नाही. पतीकडून आपले सौंदर्य बघू शकत नाही या जाणिवेतून तसेच आपल्या जिवंतपणी आपल्या 99 मुलांचे झालेले मृत्यु यामुळे आयुष्यभर तिच्या वाटेला दुःख आले. परंतु, यामागे देखील आपलाच मुलगा राजा झाला पाहिजे ही महत्त्वाकांक्षा ठेवून केलेली मुलांना शिकवणी याचा देखील गंभीर परिणाम झालेला आहे.
आपला भाऊ शकुनि – धूर्त प्रवृत्तीचा व आपल्या अंधत्वाला नेहमीच कमीपणा मानणारा पती धृतराष्ट्र याच्या पक्षपातीपणामुळे त्यांच्या पुत्रमोहापुढे गांधारी देवीला नेहमीच मनस्वी त्रास झाला. राज्य लोभामुळे झालेला द्यूताचा अघटित खेळ थांबण्यासाठी गांधारीने पूर्ण प्रयत्न केले परंतु व्हायचे ते होऊन गेले, व द्रौपदीचे वस्त्रहरण यासारख्या कलंकित प्रसंगाची ती फक्त प्रेक्षक बनून राहिली. आणि यातूनच युद्ध सुरू झाले महाभारताचे – सत्तेचे, भावाभावामधील वैराचे, गुरु-शिष्याचे, पितासमान आप्तेष्टय व पुत्रांचे, नाशाचे. न जाणो कित्येक बळी गेले, किती नुकसान झाले आणि यातच गांधारीचे 99 पुत्र गेले.
पुत्रशोक अनावर झाल्याने तिने श्रीकृष्ण व पूर्ण त्याच्या द्वारकावासीयांना शाप दिला व त्यातच द्वारकेचा नाश् झाला. परंतु तरी पुत्रशोकाने व्याकुळ झालेली गांधारी-धृतराष्ट्र, आपले पुत्र पांडव विजयी झाले असले तरी त्या युद्धातून काही हाती न लागल्यामुळे माता कुंती व सर्वांचा त्याग करून महामंत्री विदुर यांनी वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला व शेवटी आयुष्यभर डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडून आयुष्यातला काळोख दूर सारून धगधगत्या आगीच्या वनव्यामध्ये आपले प्राण अर्पण केले.
या महान, साध्वी, सत्यप्रिय, अतिशय मृदू व प्रेमळ स्वभावाची गांधारी तिचे पूर्ण जीवनच त्याग आहे. कठोर शिवाचे व्रत करणारी, पतिव्रता, द्रौपदीच्या रक्षणासाठी आपल्याच पती व पुत्रांपुढे ढाल बनून उभी राहणारी गांधारी खरंच वंदनीय आहे. तिच्या स्वभावाच्या अनेक छटा या पुस्तकात खूपच चांगल्या रीतीने रेखाटल्या आहेत. सर्व भारतीय स्त्रियांपुढे गांधारी एक आदर्श स्त्री आहे की जिचे वाचन सर्वांनी करावे.