सायली योगेश होनुले, वर्ग एफ वाय बी ए
गुरुजी तू मला आवडला , लेखक – युवराज माने
शिक्षणाची गगनचुंबी इमारत उभी करण्यासाठी सर्वप्रथम त्या इमारतीचा पाया मजबूत असणे महत्त्वाचा आहे. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या भक्कम पायावरच त्याची शैक्षणिक नव्हे तरी यशस्वी आयुष्याची इमारत उभी केली जाते. जन्माला येताना जशी बाळाची नाळ जोडलेली असते. तशीच मुलाचे शिक्षणाची नाळ त्याच्या शिक्षकांशी जोडलेली असते. बाळाच्या जन्माच्या वेळी त्याची नाळ आईपासून अलगद हळुवारपणे विलग केली जाते, त्याचप्रमाणे मुलांच्या भावनांना धक्का लागू न देता त्याची शिक्षणाची नाळ हळुवार जोडता आली तर मुलांचा शैक्षणिक प्रवास हा नक्कीच सुखकर, आनंददायी व चिरंतर टिकणारा ठरेल.
‘गुरुजी तू मला आवडला’ या पुस्तकाच्या नावातच हे पुस्तक म्हणजे लाडक्या गुरुजींच्या सोबत शिक्षण प्रवास आरंभलेल्या लेकराच्या आनंददायी शिक्षणाचा सोहळा असावा असं वाटत. लेकराकडूनच गुरुजींना तू मला आवडला अशी मायेची पोच पावती मिळणं म्हणजे खरंच एक शिक्षक म्हणून लेखक युवराज माने यांचा हा मोठा सन्मान आहे. एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यासोबत अनुभवलेला प्राथमिक शिक्षणाचा आनंदमेळा एक लेखक म्हणून मनात टिपून ठेवला आणि त्याच शिक्षणाचा सोहळा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर शब्दात मांडला आहे.
मूल प्रथमच शाळेत येताना वावरतात घाबरतात त्यांना घरातील सुरक्षित वातावरणातून शाळेच्या अनोळख्या वातावरणात राहण्यासाठी आपलं काही आणि आपलं कोणी जवळ हवा असतं, नेमकं हीच भूमिका युवराज माने सरांनी अतिशय चोख बजावली आहे. जशी आई असते तसेच शाळेत शिक्षक आईची जागा भरून काढणारे असतीलतर मुलांना शाळेत आनंदाने रुळायला वेळ लागत नाही.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करणे नसून अनुभवातून आजूबाजूला घडणाऱ्या गटातून मुलासाठी नकळत देता येईल असा एक ठेवा, मुलांना लहान वयात आपलं आपण जितके जास्त नवनवीन अनुभव देऊ तितकी त्यांची मेंदूची वाट चांगली होते, वेगवेगळे अनुभव युवराज माने सरांनी आपल्या शाळेतील मुलांना देऊन मुलांना शिक्षण प्रवास कसे घडवले व स्वतः एक शिक्षक म्हणून त्यातून कसे घडत गेले याचे सहज सुंदर वर्णन सोप्या भाषेत आपल्याला ‘गुरुजी तू मला आवडला’ या पुस्तकातून आपल्या भेटीस आणले आहे. लेखकाने या पुस्तकात तब्बल 70 पेक्षा जास्त लेखातून स्वतःचे अनुभव अतिशय मोजक्या व प्रभावी भाषा शैलीतून आपल्यासमोर मांडले आहेत. या पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक उपक्रम त्यांच्या शाळेतील मुलं त्यांच्या घरचा आवडीनिवडी लक्षात घेऊन मुलांना सहज आनंदायी शिक्षणाची अनुभूती देणारा असून प्रायोगिक तत्त्वावर हे उपक्रम राबवताना शिक्षक स्वतःच आपल्या मुलांनी मला घडवलं हे मोठ्या मनाने मान्य करतात. विशेष कौतुक वाटलं शिक्षक विद्यार्थी घडवतो असे म्हणतात पण इथे तर विद्यार्थ्यांनी एक शिक्षक घडवला. शाळा म्हणजे बंदहीवास नसून इथेही मजा आहे हा विश्वास मुलांना मिळाला आणि मग हे आनंदाचे झाड कसं बहार लागलं याचं सुरेख वर्णन लेखकाने या पुस्तकात केला आहे. मलातर पुस्तक वाचताना असं वाटलं की कोणतंही पान काढावं, कुठूनही सुरुवात करावी आणि अलीबाबाच्या गुहेप्रमाणे या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून मुलांना हसत खेळत शिक्षणाच्या खजिन्यापर्यंत पोहोचता येते हे या पुस्तकातून घडून येते. सदर पुस्तक हे लहान मुलांचा पालकासाठी उपयुक्त आहे.