माणसाच्या आर्थिक दृष्टिकोनाला चालना देणारे पुस्तक – ‘गोष्ट पैशापाण्याची’
नाव – माहेश्वरी गोरडे (एम.ए. प्रथम वर्ष)
ग्रंथालय आणि माहितीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
मागील २० वर्षांहून अधिक काळ औष्णिक उर्जा, विविध इंधनाचे सुरक्षित ज्वलन, उर्जा संवर्धन या क्षेत्रांतील एक सुपरिचित व केल्व्हिन व लिक्विगॅससह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष असलेले श्री. प्रफुल्ल वानखेडे हे सर्वाना परिचित आहेत. ते भारतात व जगभरातील १८ देशांच्या कंपन्यांच्या व्यवहारात कार्यरत आहेत. सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या प्रफुल्ल यांच्याकडे उद्योगाचा परंपरागत वारसा नव्हताच पण त्याचबरोबर भांडवल उभे करायलाही बळ नव्हते अशा अव्हानात्मक व विपरीत परिस्थितीतही त्यांनी संधी शोधत आणि अव्हानाला सामोरे जात आपला प्रवास सुरू केला आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आज त्यांचे नाव उद्योजक जगतात आदराने घेतले जाते.
‘गोष्ट पैशापाण्याची’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे आर्थिक नियोजनात काय करावे आणि काय करू नये याबाबत असणारी गुंतगुंत सविस्तर मांडून व्यवसायीक क्षेत्रात पडल्यावर आपण योग्य ती कौशल्ये वापरली तर निर्विवादपणे आपल्या क्षेत्रात यश कसे मिळवू शकतो याची प्रचिती देणारे हे पुस्तक. याच्या वाचनाने मी तर भारावून गेले आहे. अस्सल भारतीय मानसिकतेला अव्हान देणारे तसेच पैसे आणि पुस्तक या दोन्हीचे महत्व सांगणारे हया पुस्तकातील विवेचन मार्गदर्शक ठरून जाते. बाजारात येण्यापूर्वीच त्याची ऑनलाईन विक्री होण्याचा विकम हे या पुस्तकाचे महत्व अधोरेखित करणार आहे.
व्यवसाय करायचा म्हटल्यावर अभ्यास, ध्यास, कष्ट, चिकाटी, सातत्य या गुणांची आवश्यकता असतेच. साखळीमध्ये अनेक कड्या असतात त्याचप्रकारे नवउद्यमीसाठी अशा कडयांचा सामना करावा लागतो. यात एखादी कडी कच्ची राहीली किंवा तुटली तर संपुर्ण उद्यम ढासळलाच म्हणून समजा ! ‘गोष्ट पैशापण्याची’ मध्ये प्रामुख्याने व्यवहारज्ञान कसे असावे आणि तुमची व्यावसायीक इमारत उभी करण्यासाठी ज्या मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत त्याचा लेखाजोखा दिला आहे. हा लेखाजोखा मराठी मनास उभारी घेण्यास भाग पाडतो.
फक्त स्वप्न बघून काही उपयोग नाही तर ते रक्तात आणायला हवं आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर काही पाश तोडता यायला हवेत. भीती आणि संकटांच्या पलीकडे ध्येय गाठायचे स्वप्न मनापासुन जपता यायला हवे प्रस्तुत पुस्तक गोष्ट पैशापाण्याची लेखक प्रफुल्लजी वानखेडे, सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेलं हे पुस्तक गेल्या दोन वर्षापासून वाचकांच्या मनात धुमाकुळ घालत आहे लेखकाने मांडलेले वेळेचे, पैशाचे, कामाचे आणि आयुष्याचेही नियोजन ध्येय गाठण्यास मदत करत आहे.
वाचकाला नव्याने उदयोग करू पाहणाऱ्यास नवा दृष्टिकोन मिळतो. उदयोजगतामध्ये बुध्दी असो पैसा योग्य ठिकाणी कसा वापरावा याविषयी मार्गदर्शन दिले आहे तसेच पैशाच्या गुंतवणूकीबरोबर माणुसकीला दिलेला मदतीचा हात व सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची तत्त्वे लेखकांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. स्वप्न, ध्यास, नियोजन, सातत्य आणि कठिण परिश्रम हा यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात घेतो.
बुध्दी आणि पैसा योग्य ठिकाणी कसे वापरावे तसेच उभारलेल्या उदयोगाला आर्थिक शिस्त कशी दयावी गोष्ट पैशापाण्याची यात लेखकाने पुस्तकाला योग्य तो आयाम दिला आहे.
पैशाचे व बुध्दीचे योग्य नियोजन व आर्थिक साक्षरतेचे महत्व आपल्या अनुभव कथनातुन स्पष्ट केले आहे मराठी माणसांचा उदयोग क्षेत्रातील व गुंतवणूकीतील गुंता सहतेने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवास माणसाला घडवतो, शिकवतो आणि नवनवीन आव्हाने पेलायची ताकदही देतो माणसांतील गुंतवणुकीमुळे माणुस आर्थिकदृष्टया, सामाजिकदृष्टया तसेच एक माणुस म्हणून अधिक प्रगल्भ होतो यशस्वी होणं हातांच्या रेषावरती नाही तर, आपल्या प्रामाणिक आणि नियोजनबद्ध प्रयत्नावरती आहे.