लेखकाचे दोन शब्द
गेल्या वीस वर्षांत अनेक मराठी लोकांनी उद्योग सुरू केले आहेत. या पहिल्या पिढीच्या उद्योजकांमुळे ही चळवळ पुढे जात आहे असे म्हणायला हरकत नाही. तरी पण तुलनेने अजूनही मराठी माणूस उद्योगांत मागेच आहे. २५ वर्षापूर्वी मोठे असलेले अनेक मराठी उद्योग- किर्लोस्कर व गरवारे, आज इतरांच्या तुलनेने मागे पडले आहेत. अनेक उद्योग- उदाहरणार्थ साठे बिस्किटस्, गरवारे नायलॉन्स, मॅस्वी अँड कंपनी वगैरे बंद पडले आहेत. महाराष्ट्र शासन, जागतिक मराठी चेंबर व इतर चेंबर्स यांना याविषयी काहीही आस्था असू नये याचा खेद वाटतो. उद्योग आजारी पडू नयेत व पडल्यास त्यांतून ते बाहेर कसे येतील यावर सर्वांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.
हे मनोगत लिहिताना देशभर मंदीची लाट आलेली आहे. पुणे, मुंबई व इतार औद्योगिक वसाहतीत ६० टक्क्यांच्या वर उद्योग आजारी आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या तोंडाने ‘उद्योजक बना’ असे सांगावे ? पण नोकऱ्यांची परिस्थिती तर त्याहून भयावह आहे.
अनेक कंपन्या मनुष्यबळ कपात (डाऊन साइझिंग) करीत आहेत. एकेकाळच्या मक्तेदारी व यशस्वी कंपन्या- टेल्को व बजाज ऑटोमधून हजारोंनी नोकरकपात करण्यात आली आहे. त्यांना ‘व्ही आर एस’ मिळाला असेल; पण आता ४५ ते ५० वयोगटांतील लोकांनी काय करावे? ज्यांचे उद्योग बंद पडले आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी काय करावे?
निराश न होता, आता पुन्हा आपल्याला मंत्र जपावा लागणार आहे ‘उद्योजकते’चा. विक्रेत्यांच्या बाजारपेठेत असताना ज्या भ्रमात हे उद्योजक राहिले व चुका केल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही हे बघावे लागेल. मार्केटिंग, नावीन्याचा सतत ध्यास, जागतिकीकरण, मनुष्यबळ विकास, हातमिळविणी (नेटवर्किंग) वगैरेद्वारे आपण आपला उद्योग यशस्वी करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. आपल्या देशाची, समाजाची व स्वतःचीही उन्नती फक्त उद्योग वाढीनेच होऊ शकेल. याला पर्याय नाही.
त्यामुळे पुनःश्च एकदा ‘उद्योजक बना’.
दिलीप सरवटे