नाव : गणशे गोरखनाथ खटुवड
पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रम (विदयार्थी)
पत्रकारिता विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
कधी कधी ग्रथालयाचा एक फेरफटका करावा. हजारो पुस्तकातून एखादे पुस्तक डोकावत असते. आपले मन आपले भावविश्व, आपल्या संवेदना ज्याच्याशी जुळतात, हळुवारपणे उमलतात असे एखादे पुस्तक सहज हाती येते. आईची बाळाशी नाळ जोडली जावी तशीच अशा एखाद्या पुस्तकासोबत आपल्याही मनाची नाळ जोडली जाते. कपाटातून ते पुस्तक आपल्या डेस्कवर येईपर्यंत त्याच्या अनेक कुह्तूल हालचाली मनाच्या गर्भात घडत असतात.
असा अनुभव आपल्या पुनर्जन्माचीच चाहूल असते, नाही का? पुस्तके आणि आपण असे एकमेकांशी जोडले जातो. त्यामुळे पुस्तक परीक्षण हे दुसरे तिसरे असे काही राहत नाही तर ते आत्मपरीक्षणाच ठरते. स्वतःशीच केलेला तो आत्मसंवाद असतो. एम. ए. चे वर्ष संपले सुट्ट्या लागल्या आणि हिरवा गार सदाबहारलेला विद्यापीठाचा परिसर अचानक रुक्ष रुक्ष वाटू लागला. मित्र आपल्या गावी परतले, तास नाहीत, परीक्षा संपल्या, एम. ए. पर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास संपला, आयुष्याचा एक अध्याय कायमचा संपला. आता पुन्हा वर्ग नाहीत, शिक्षकांचे तास नाहीत, मित्र नाहीत, जयकर समोरच्या त्या मुक्त गप्पा-चर्चा नाहीत. येथून पुढे आता आपला वेगळा प्रवास, वेगळी धडपड आणि नोकरीसाठीचा संघर्ष. मन असं गजबजून गेलं होतं सगळेच अवघड वाटू लागले होते, काही करण्याची इच्छा नव्हती. प्रश्न होता, पुढे कसे जावे? मात्र अजून महिनाभर तरी जयकर मधील पुस्तकांचा सहवास दुरावणार नव्हता. त्यामुळे एकदा सहज ग्रंथालयात गेलो तोच नेहमीचा फेरफटका मारायला. निळ्या आकाशी रंगातले मुखपृष्ठ असणारे एक पुस्तक दिसले. वर लिहिले होते, ‘चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये, म्हणून!’ लेखक डॉ. आ. ह. साळुंखे. ‘विद्रोही तुकाराम’, ‘आस्तिक शिरोमणी चार्वाक’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’, ‘आता आमच्याच घडावर आमचेच डोके’ यांसारखे विद्वत्तापूर्ण, गहन सामाजिक, तात्विक चर्चा असणारे ग्रंथ लिहिणाऱ्या साळुंखे सरांनी हे असे कोणते वेगळे पुस्तक लिहिले आहे? या गोष्टीने माझ्या मनात मोठे कुतूहल निर्माण झाले तोपर्यंत मी ते पुस्तक केव्हाच रीडिंग हॉल मध्ये घेऊन आलो होतो.
‘चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये, म्हणून!’ या केवळ ९२ पानी पुस्तकात साळुंखे सरांचे २९ वेगवेगळे लेख आहेत. खरंतर ते लेख नाहीत साळुंखे सरांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, महत्त्वाचे क्षण चांदण्यासारखे उतरवून ‘पृष्ठ’ भूमीवर सरांनी आणलेले आहेत. या व्यक्तिगत जीवनातील चांदण्या लोकांसाठी त्यांनी एकत्रित केल्या आहेत म्हणूनच ‘लोकायत’ प्रकाशनने त्या प्रकाशित केल्या याचे आश्चर्य वाटत नाही.
आयुष्याच्या उत्तरार्धात संपूर्ण जीवन जगत असताना जे काही अनमोल तत्व त्यांना आकळले व जे काही खरंच राहून गेलं ते सर्व साळुंखे सरांनी अगदी आपलेपणाने मांडल्या आहेत. प्रत्येक लेखाचे शीर्षकही मनात घर करून बसणारे आहे. अगदी चांदण्यांसारखेच. जसे की, ‘कितीही फुललो तरी आणखी फुलायला वाव असतोच!’, ‘मरणापासून पळणे म्हणजे जीवनापासूनच पलायन’, ‘सुरुंगांनं पहाड फोडता येतो पण कळी उमलविता येत नाही’, ‘आपली फुलण्याचीही आणि फुलवण्याचीही क्षमता ओळखू या!’ व मला सर्वात जास्त भावलेले, ‘मृत्यूच्या एकेका घावाबरोबर जगण्याची इच्छा हजारो पटींनी उफाळतेही शीर्षके फुलांच्या रंगांप्रमाणे डोळ्यात भरून मनात उतरतात अंतरंग फुलवतात, हे सारे लेख वाचताना सातत्याने जाणवत होते की, “आसमान के परे जहां और भी है!”
पुस्तकातून केवळ एवढेच समोर येत नव्हते तर साळुंखे सरांची नात्यांच्या सखोलतेपासून ते विश्वाच्या व्यापक आंतरक्रियांमधील सामाजिक तात्विक पैलूंचे चित्रही समोर येत होते. त्यामुळे मनात एक उपनिषदच अवतरत होते. जयकरची वेळ संपली तसा घंटीचा आवाज झाला. पुस्तक हळुवार बंद करून मी बाहेर आलो. अंधार पडायचा अजून बाकी होता पण मी मात्र चांदण्यात भिजून रस्त्याकडे निघालो होतो.
लेख स्वरूपात एक एक प्रसंग किंवा साळुंखे सरांना जे काही भरभरून सांगायचे आहे ते एका एका लेखात नेमकेपणाने मांडल्यामुळे पुस्तक कोणत्याही प्रकारच्या वाचकाला अत्यंत सुलभ झाले आहे. हे सगळे अनुभव तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातले असल्यामुळे आणि एक अभ्यासक असणाऱ्या साळुंखे सरांच्या, समाजातील जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीकडे सृजनात्मक पद्धतीने पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे हे पुस्तक एक समृद्ध अनुभवाची शिदोरी झालेली आहे, कोणीही, कधीही, केव्हाही, कुठेही या पुस्तकातला कोणताही लेख काढावा आणि वाचावा त्याला चांदण्यात भिजल्याचा अनुभव येईलच पण त्या सोबत हे सगळे आपल्या आयुष्यात खरोखरीचं उतरावं आणि आपलं जगणं समृद्ध व्हावं हे वाटून त्याच्या आयुष्यात नवी पालवी फुटल्यावाचून राहणार नाही. जणू आपलाच पुनर्जन्म.