Share

Review By डॉ.विठ्ठल नाईकवाडी, ग्रंथपाल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७
अगदी सुरुवातीलाच मला पडलेला प्रश्न, इकिगाई म्हणजे काय? तो कदाचित सर्वांनाच पडलेला प्रश्न असावा, पुस्तकाचे काही पानं वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजला इकि म्हणजे जगणे आणि गाई म्हणजे प्रयोजन अशा या दोन शब्दापासून ‘इकिगाई’ हा शब्द बनलेला आहे. इकिगाई हे पुस्तक लोकप्रिय जपानी लेखक आणि न्यूरोसायंटिस्ट केन मोगी यांनी लिहिले आहे व सदर पुस्तकाचा मराठीत अनुवाद लेखक उल्का राउत यांनी केला आहे. जपानी लोक दीर्घायुषी आणि आनंदी जीवन कशापद्धतीने जगतात त्याचे जपानी रहस्य या पुस्तकात नमूद केलेले आहे. जपानमधील तणावहीन, आरोग्यदायक, आनंदी जीवनशैलीचा मूलमंत्र म्हणजेच इकिगाई. माणूस जीवन जगत असताना मोठे स्वप्न बघतो परंतु छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे विसरून जातो. जीवनात प्रोत्साहित होण्यासाठी नेहमीच भव्यदिव्य, प्रेरणादायक गोष्टींची गरज नसते, दिनचर्येतील नियमित घडणारे साधे सुधे प्रसंग देखील प्रेरणा देतात हे या पुस्तकात अगदी साध्या सोप्या भाषेत मांडलेले दिसून येते. यात छोटे छोटे उदाहरण देऊन जपानी जीवनशैली रेखाटली आहे. स्वतःवर नियंत्रण, संयम आणि मितभाष्य या गोष्टींना इकिगाईमध्ये अधिक महत्त्व दिलेले दिसून येते. इकिगाई म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं, मग ती परिस्थिती कितीही कठीण असो. इकिगाई जाणणाऱ्या लोकांना हार आणि जीत यांसारख्या सर्वसाधारण गोष्टींपलीकडला आनंद अनुभवता येतो. जपानमध्ये मैत्री, संघर्ष व विजय याची रुजवण मुलांमध्ये लहानपनीच केली जाते. जीवन आणि काम यातील समतोल, मानसिक समाधान देणारं आवडतं काम यामध्येही इकिगाई दडलेली दिसून येते. सकाळची प्रफुल्ल हवा, सूर्यकिरणाची तिरीप अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इकिगाईचं अस्तित्व या पुस्तकात मांडलेले दिसून येते.
आजच्या धावपळीच्या युगात ‘इकिगाई’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सदर पुस्तक वाचल्याने तुमच्यामधील हरवलेली इकिगाई शोधण्यास मदत होईल, जीवनामध्ये सकारात्मक बदल घडेल, सुख, शांती व उत्तम आरोग्य मिळेल. आपल्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी व यातील रहस्यमय गोष्टींचा अवलंब करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

Related Posts

इळनमाळ

Dr. Vitthal Naikwadi
Shareनाव :-जगताप प्रतिक प्रभाकर जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ,( ग्रंथालय प्रशिक्षणार्थी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे , इळनमाळ हे अशोक पवार...
Read More

जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश

Dr. Vitthal Naikwadi
Shareपुस्तक परीक्षण – जाधव सुरेखा रामचंद्र , तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमातील तिसरा वर्ग , भरती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय...
Read More