Share

‘द अल्केमिस्ट’ ही बघायला गेलं तर एक सरळसाधी गोष्ट. सॅन डियागो नावाच्या मेंढपाळाची. तो एका छोट्याशा खेड्यात राहत असतो. आपल्या मेंढ्यांना कुरणात नेणे, त्यांची निगा राखणे हेच त्याचं आयुष्य. त्याला एक स्वप्न सतत पडत असतं. त्याला वाटतं, या स्वप्नात कदाचित एखादी भविष्यवाणी दडलेली आहे. म्हणून तो जवळच असलेल्या एका खेड्यातल्या भविष्य सांगणाऱ्या बाईला त्या स्वप्नाचा अर्थ विचारतो. ती त्याला सांगते की, ‘इजिप्त देशातल्या पिरॅमिड्सजवळ त्याला एक खजिना मिळणार आहे.’ आणि मग सॅन डियागो तो खजिना शोधण्यासाठी बाहेर पडतो. तो खजिना शोधण्याच्या त्याच्या प्रवासाची ही कथा.त्याला सर्वप्रथम भेटतो सालेमचा राजा. इजिप्तला जाण्याच्या बदल्यात तो सॅन डियागोला त्याच्या सर्व मेंढ्या विकायला सांगतो आणि पर्सनल लेजंडची माहिती देतो. पर्सनल लेजंड म्हणजे आपल्याला आयुष्याकडून अपेक्षित असलेलं ध्येय. या प्रवासात त्याला हे समजतं की, पर्सनल लेजंड म्हणजे ‘आपण आहोत त्याहून अधिक चांगले, परिपक्व होतो, तेव्हाच आपल्याला आयुष्याचं ध्येय, सार समजतं. जेव्हा अगदी मनापासून एखादी गोष्ट आपण मागतो, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट सत्यात आणायला मदत करते.’ आणि हीच काहीशी या पुस्तकाची थीम आहे.
खजिना शोधायच्या या प्रवासात त्याला खूप लोक भेटतात. इंग्लिशमन, जिप्सी बाई, फातिमा- जिच्यावर त्याचं प्रेम जडतं. त्याचा मेंटॉर -म्हणजे गुरू- त्याला याच प्रवासात गवसतो. तो गुरू म्हणजेच अल्केमिस्ट. मार्गात अनेक अडथळे येऊनही अल्केमिस्टने सांगितल्याप्रमाणे तो इजिप्तमधल्या पिरॅमिड्सपर्यंत जातोच. तिथे येऊन तो खूप वेळ खणत राहतो. पण त्याला खजिना काही सापडत नाही. काही वेळाने निर्वासित लोकांची टोळी तिथे येते, त्यांना पैशाची गरज असते. सॅन डियागोकडे त्यांना सोनं सापडतं. आणि त्यांना वाटतं उरलेलं सोनं इथेच आहे म्हणून ते त्याला आणखी खणायला लावतात, पण तिथे त्यांना काहीही सापडत नाही. सॅन डियागोकडे जे काही असतं, ते हे लोक घेऊन जातात. त्याच्या शरीरातले सगळे त्राण एव्हाना गळून पडलले असतात. या टोळीचा म्होरक्या निघताना त्याला म्हणतो, “स्वप्नं पडतात म्हणून असं सातासमुद्रापार कोणी येत नाही तुझ्यासारखं! मलासुद्धा एक स्वप्न वारंवार पडायचं. स्पेनमध्ये एका पडक्या चर्चजवळ एक झाड आहे, जिथे मेंढपाळ त्यांच्या मेंढयांसोबत झोपतात. त्या झाडाच्या जवळ खजिना आहे, असं माझ्या स्वप्नात मला दिसतं पण म्हणून मी काही वेड्यासारखा इतक्या दूर थोडीच जाणार आहे?” असं म्हणून तो निघून जातो आणि सॅन डियागोच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तो जे शोधत होता, ते त्याच झाडाखाली होतं – जिथे तो झोपत असे. आपल्या घरी येऊन तो त्या झाडापाशी जातो. खणत असताना त्याला वाटतं की, ‘हे मला आधीच उमजलं असतं, तर मी इतका फिरलोच नसतो.’ पण एव्हाना त्याला समजलेलं असतं की, खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास हाच मुळी खरा खजिना होता!
आता बघायला गेलं तर तो ज्या झाडाखाली रोज झोपत होता, तिथेच खजिना दडलेला होता; मग त्याला इतका आटापिटा करून तो का बरं मिळवावा लागला? इथे पाउलो कोएलो यांचं वेगळेपण दिसून येतं. खजिना मिळणं म्हणजे पैशाची प्राप्ती नव्हे तर या प्रवासात सॅन डियागोला जे ज्ञान मिळालं, जे स्वतःबद्दल शिकायला मिळालं, तोच खऱ्या अर्थाने त्याचा खजिना. आणि म्हणूनच या पुस्तकातून जे काही अनुभवायला मिळतं, ते असं शब्दांत सांगणं कठीण आहे. ते प्रत्यक्ष वाचूनच अनुभवायला हवं. कित्येकदा आपण एखाद्या स्वप्नाच्या मागे धावतो. ते पूर्ण व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतो; पण काही वेळा ते प्रत्यक्षात येत नाही. आपल्याला अपेक्षित यश, फळ मिळत नाही आणि आपण खचून जातो. खरं तर हीच ती वेळ असते जिथे आणखी जोमाने प्रयत्न करायचा असतो. कारण आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असतो. पण आपल्याला ते दिसत नाही म्हणून आपण हार मानतो. ‘मी एवढा इजिप्तपर्यंत प्रवास केला, कित्येक अडचणींचा सामना केला तरी मला खजिना मिळाला नाही..’ असा विचार सॅन डियागोने केला असता, त्या चोराचं बोलणं निगेटिव्हली घेतलं असतं तर त्याला मूळ खजिना सापडलाच नसता. कित्येकदा एखाद्या विविक्षित ठिकाणापर्यंत पोहोचणं म्हणजे स्वप्नपूर्ती नसते; त्या प्रवासात जे आपण शिकतो, अनुभवतो आणि माणूस म्हणून प्रगल्भ होतो तोच खरा खजिना असतो.
हे पुस्तक वाचताना मला कित्येक अशी वाक्यं गवसली, ज्यांच्यामुळे आयुष्यातल्या त्रासदायक व कठीण प्रसंगांमध्ये शांतपणे, सकारात्मक दृष्टिकोनातून मी पाहू शकलो . जसं की – या पुस्तकात एके ठिकाणी लेखक म्हणतात… – ‘आपण जेव्हा प्रेम करतो, तेव्हा आपण आहोत त्यापेक्षा आणखी चांगले बनण्याचा प्रयत्न करतो आणि जेंव्हा आपण असा प्रयत्न करतो तेंव्हा आपल्या आजूबाजूचं जगही आपोआप चांगलं बनत जातं.’ खरं प्रेम ते असतं, जे आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवतं; मग ते आपल्याला मिळो अथवा न मिळो. त्याला पूर्णत्वाचा हव्यास नसतो. ते असतंच आपल्या साथीला, आपल्या सुख-दुःखात आपल्या सोबतीला. त्याचा आधार वाटतो आपल्याला. ते खंबीर बनवतं, एकटेपण एन्जॉय करायला शिकवतं आणि आपल्याला स्वतःचीच एक सुधारित आवृत्ती बनवतं. मग आपलं जगही सुंदर बनत जातं.’आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट तुम्हाला मिळावी यासाठी तुमची मदत करतं.’ आज कित्येक लाईफ कोच या थिअरीवर बोलतात. कित्येक वर्षांपूर्वी पाउलो कोएलो यांनी हा फंडा या पुस्तकात मांडला होता. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खरंच हवी असते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, तेव्हा ती नक्कीच प्रत्यक्षात येते. विश्वासाची, स्वतःवरच्या श्रद्धेची ताकद काही औरच असते, हेच खरं! अल्केमिस्ट वाचताना आयुष्य बदलवणारी अशी कित्येक वाक्य ठिकठिकाणीआढळतात. फक्त वाचताना आपलं मन जागृत हवं, इतकंच.
आणखी एका ठिकाणी लेखक म्हणतात… ‘माणूस हा त्याच्या आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्षम असतो.’ कित्येकदा काही वर्षं प्रयत्न करूनही आपल्याला हवं तसं न मिळाल्याने आपण खचून जातो. कित्येक जण ‘आता या वयात काय शक्य होणार आहे?’ असं म्हणून आपली स्वप्न एका गाठोड्यात बांधून टाकतात. खरं तर उशीर कधीच झालेला नसतो. आपली स्वप्नं आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण करू शकतो. स्वप्नं बघण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार आपणा सर्वांना आहे. आपल्यामध्ये खूप शक्ती असते. कित्येकदा आपल्याला त्याची कल्पनाही नसते. हाच आपल्यामध्ये दडलेला खजिना असतो. कधी कधी काही अप्रिय घटनांमुळे आपल्याला जगणं नकोसं होतं. पण खरं तर हा सगळा आपल्या आत्मशोधाच्या प्रवासाचा एक भाग असतो, जो आपल्याला आपल्यासाठी ठेवलेल्या खजिन्यापर्यंत पोहोचवतो.
अशा अनेक गोष्टी, अनुभव या पुस्तकातून मिळतात. मला वाटतं, ‘द अल्केमिस्ट’ हे पुस्तक मी आत्तापर्यंत वाचलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे. मला वाटतं ‘द अल्केमिस्ट’सारख्या पुस्तकांमध्ये जादू असते. जेव्हा सॅन डियागो आपल्या स्वप्नाचा अर्थ समजावून घ्यायला त्या जिप्सी म्हातारीकडे जातो, तेव्हा ती त्याला म्हणते, “खरं बघायला गेलं तर, आयुष्यातल्या सगळ्यात सोप्या वाटणाऱ्या गोष्टीच विलक्षण असतात. आणि फक्त ज्ञानी व्यक्ती हे समजू शकते.” मनाची, हृदयाची आणि आत्म्याची झापडं बाजूला करून जर हे पुस्तक वाचलंत, तर त्यातला गर्भितार्थ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, हा माझा विश्वास आहे. खरा खजिना कशामध्ये दडला आहे? बाह्य खजिन्याच्या मागे पळताना खऱ्याखुऱ्या मौल्यवान गोष्टी आपण बाजूला फेकून तर नाही देत? अवघड गोष्टींच्या मागे धावताना, सोप्यासहज गोष्टी आपल्या नजरेआड तर होत नाहीयेत ना? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं आणि आपल्यात जे दडलंय त्याच्या सहाय्याने आपली सर्व स्वप्नं आपण पूर्ण करू शकतो, हा विश्वास निर्माण करणारं ‘द अल्केमिस्ट’ हे पुस्तक निदान एकदा तरी वाचून अनुभवावं असंच!

Recommended Posts

उपरा

Dr. Amar Kulkarni
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr. Amar Kulkarni
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More