Girnarkar Ashlesha Girish (Student)
Samarth Shikshanshastra Mahavidyalay,
Satpur, Nashik 422012.
“मृत्युंजय” ही मराठी साहित्यातील एक अजरामर कादंबरी असून, पौराणिक पात्र कर्ण याच्या आयुष्यावर आधारित आहे. ही कादंबरी केवळ एका योद्ध्याची कथा नसून ती मानवी आयुष्याच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेणारी कलाकृती आहे. मृत्युंजय जीवनातील अनेक पैलू मांडते, जसे ही वाक्य दर्शवते, “संस्कार म्हणजे जीवन.” फुलाच्या परागदंडात लपलेली कृमि सुद्धा सत्संगतीने मूर्तीवर चढवली जातात.
पुस्तकाची रूपरेषा
शिवाजी सावंत यांनी “मृत्युंजय” मध्ये कर्णाच्या जीवनातील संघर्ष, स्वाभिमान, मैत्री, निष्ठा आणि दुःखाचे दर्शन घडवले आहे. कर्णाच्या जीवनाचा प्रवास पांडव व कौरवांच्या कथांशी गुंफून उलगडला जातो. पुस्तकाची मांडणी विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून केली आहे, जसे की कर्ण, कुंती, दुर्योधन,कृष्ण आणि कर्णाची पत्नी वृषाली. ही शैली वाचकाला प्रत्येक पात्राच्या भावनिक जिव्हाळ्यात सामील करून घेते.
कथानकाचे वैशिष्ट्ये
१. कर्णाचा जन्म आणि संघर्ष : कर्ण हा सूर्यपुत्र असूनही त्याचा कुंतीने परित्याग केला. समाजाने त्याला सूतपुत्र मानून बहिष्कृत केले.
2. मैत्री आणि निष्ठा: दुर्योधनाशी असलेली कर्णाची मैत्री आणि त्याची निष्ठा जणू सूर्य आणि त्याच्या प्रकाशासारखी एकमेकांना उजळवणारी.
3. स्वाभिमान आणि न्याय: कर्णाला नेहमीच आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान असतो. त्याच्या निर्णयांमध्ये तो नेहमी न्यायाचा विचार करतो.
4. करुणा आणि शाप: कर्णाला प्राप्त झालेले शाप त्याच्या जीवनाला वळण देतात, जे मानवाच्या दुःखांशी समांतर वाटतात.
लेखनशैली आणि प्रभाव
शिवाजी सावंत यांची लेखनशैली अतिशय ओघवती, भावनिक आणि विचारांना चालना देणारी आहे. कादंबरीतील प्रत्येक वाक्य वाचकाच्या मनात खोलवर ठसा उमटवते. कर्णाच्या संघर्षाने वाचकाच्या डोळ्यात पाणी तरलते आणि त्याच्या स्वाभिमानाने प्रेरणा मिळते. “मृत्यूला जिंकणाऱ्या योद्ध्याला जग कधीच विसरत नाही.” हे वाक्य त्याचेच प्रतीक.
मृत्युंजयचे साक्षेप
१. मानवी संघर्षाचा आरसा: “मृत्युंजय” ही केवळ कर्णाची कथा नाही तर मानवी जीवनातील लढ्यांचे प्रतिबिंब आहे.
2. न्याय-निष्ठा आणि नशिबाचा खेळ: कर्णाच्या जीवनातून “नशिबावर मात करणारी निष्ठा” शिकता येते.
3. सामाजिक संदर्भ: जातीभेद, राजकारण आणि सामूहिक दुराभिमान यावरही प्रकाश टाकला आहे.
“कर्ण” महाभारतातील एक अद्वितीय स्वाभिमानी आणि अजरामर योद्धा. एक सूर्यपुत्र जो सूतपुत्र बनला. दानशूर, दानवीर जो कधीही दानाला नाही चुकला. अगदी मरण वेळीही त्याने दान केले असा तो राधेय. कर्णाला अनेक शाप मिळाले. परशुरामांचा युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्या विसरण्याचा शाप असो वा सुतपुत्र असल्याने द्रोणाचार्यांनी नाकारलेली शिक्षा असो. मातेने जन्मताच केलेला त्याग, एक क्षत्रिय असूनही जीवनभर संघर्षात घेरलेला तो शूरवीर दानवीर महारथी कर्ण. नियतीने रचलेला खेळ फारच भीषण होता कारण कुरुक्षेत्रावर समोर उभा अनुज होता. बाण चालवावा पण घात आपलाच होणार होता, मातेला दिलेल्या वचनात तो वीर हरला होता. तेजाने चमकलेला तो वीर अंगराज कर्ण कुळाच्या चक्रात अडकला आणि माझा तो श्रेष्ठ कुंडलधारी सूर्यपुत्र उपेक्षितच राहिला. अहंकार होता पण असा जो एका क्षत्रियाला असावा, स्वाभिमान होता असा जो एका सूत पुत्राला हवा, तेज होते असे जे एका सूर्यपुत्राचे आणि पुरुषार्थ होता असा जो एका राजाला असावा.
समारोप
मृत्युंजय वाचून आपल्याला मानवी जीवनाचा खरा अर्थ समजतो. ती एका योद्ध्याचीच नव्हे तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयातील हाक आहे. कर्णाचे जीवन संघर्षमय असूनही त्याचा आदर्श आजही कित्येकांना प्रेरणा देतो तो एका शापित पण दिव्य योद्धाचे प्रतीक आहे. कर्ण केवळ पौराणिक कथांचा भाग नाही तर तो एक प्रेरणादायी, स्वाभिमानी आणि संघर्षशील व्यक्तिमत्व आहे. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरीने कर्णाला केंद्रस्थानी ठेवून त्याचे भावनिक, सामाजिक आणि मानसिक कंगोरे प्रभावीपणे उलगडले आहेत.
कर्ण म्हणजे अशा व्यक्तीची कथा ज्याने इतरांसाठी आजन्म त्याग केला पण स्वतःच्या न्यायासाठी नेहमी झगडला. “मृत्युंजय” केवळ वाचायचं नसतं, तर अनुभवायचं असतं!”