Mr. Sachin Kulkarni, Asst. Librarian, SKN Sinhgad School of Business Management Pune
शंकर पाटील (८ ऑगस्ट, १९२६:पट्टण-कोडोली, हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत – १८ ऑक्टोबर , इ.स. १९९४) हे मराठी कथाकार होते.
पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली गावी झाला.. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून काम केले. इ.स. १९८५ सालातील नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
शंकर पाटलांनी ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसांचा वेध घेणारी कथा लिहून मानाचे स्थान मिळविले. ग्रामीण परिसरातील माणसे असोत, की नागरी परिसरातील माणसे असोत, पाटील आपल्या कथांतून व्यक्तिमनाचे पदर न् पदर सहजपणे उलगडतात. त्यांची भाषा ही त्या कथांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा आहे. पाटील कथालेखनात सतत प्रयोग करीत राहिले, त्यामुळे त्यांच्या कथेतील चैतन्य कधीच संपले नाही. कथेच्या अंगभूत घाटाची एक विलक्षण जाण त्यांच्या कथांतून प्रतीत होते.
ग्रामीण ढंगाच्या अस्सल कथा… ग्रामीण कथाकार म्हणून लोकप्रिय ठरलेल्या, गावरान बोलीचा ठसका प्रकट करणाऱ्या शंकर पाटील यांचे कथासंग्रह नव्या देखण्या स्वरुपात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे मराठी रसिकांच्या भेटीला आले आहेत. शंकर पाटील यांची कोल्हापूरकडील गावरन बोलीभाषा, चटपटीत संभाषणांचा इरसाल बेरकीपणा, ग्रामीण जीवनातला पिढीजात शहाणपणा, परंपरेचा सामूहिक अंत:स्तर आणि कथानिवेदनातील उत्कंठावर्धक अनपेक्षित बाज यांनी मराठी ग्रामीण साहित्य आणि चित्रपटांना सत्तर-ऐंशीच्या दशकात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अस्सल मराठी मातीचा. पाटलांच्या कथा केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवत नाहीत, केवळ गावरान किस्से सांगून थांबत नाहीत, शहरी वाचकांचे दोन क्षण नर्मविनोदी हास्याने रंजन करावे एवढ्यापुरती ती कथा मर्यादित नाही असे डॉ. भालचंद्र फडके यांच्या सारख्या अभ्यासकाचे मत आहे. पाटील यांच्या एकूणच लेखनामागे सामाजिक जाणीव आहे. ज्या समाजव्यवस्थेत ग्रामीण मन वाढत आहे अस्सल कोल्हापुरी बोलीत जिवंत करण्याची त्याची हातोटी विलोभनीयच! त्यामुळे आता खेडी बदलत असली तरी पाटलांच्या या कथांतील माणसे आणि घटना अजूनही आपल्याला साद घालू शकतात.
‘धिंड’ ही कथा पाटील यांच्या लेखनाची सगळी वैशिष्ट्ये प्रकट करणारी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कथा त्यांच्या गाजलेल्या कथांमध्ये गणली जाते. जो कोणी मद्य प्राशन करील त्याची गावातून धिंड काढायची असा ठराव ग्रामपंचायतीत १५ ऑगस्टला मंजूर होतो आणि चार दिवसांनी तशी पहिलीच केस राऊ खोताची मिळते, ,सरपंच रामभाऊ विभुते खोताला विचारतात. ‘दारू प्यालास की न्हाई?’’ गुन्हा कबूल हाय का न्हाई? खोत नागाच्या फडीगत झुलल्यागत म्हणतो, ‘‘म्या दारुला शिवला न्हाई’… उगा इनकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका. ‘मग माळ्यावर तिनीसांजचा काय करत होतास? गडद झोपलो होतो. दारू घेतली न्हवतीस तर घरात बायकूसंग वाद का घालत होतास? मग कुणासंग वाद घालायचा? तुमच्याबरोबर कबूल कर. वास घ्या की त्याच्या तोंडाचा. सबंध चावडीत वास दरवळत होता. वास याचाच की! त्यो तुमच्या नाकात बसलायगा. पाटील मग शेवटचा फ़ैसला सुनावतात. काय लागलाय त्याच्या नादाला?सबंध चावडी घानाय लागलीय. भपकारा याय लागलाय…ते काय सुद्दीत न्हाय… सरळ बोलेना. उचला आणि ठेवा गाढवावर याला. राऊ खोताला गाढवावर उलटं बसवतात. तोंड मागं, पाठ पुढं, खेटराची माळ घालतात. बचकभर गुलाल उधळतात. लेजीम, हलगी, एकच गदारोळ. मारू लागतो. डांग टिकटाक टिक डांग टिकटिक. त्याच्या त्या नादावर लोक नाचू लागतात. गल्लीबोळानं धिंड फिरते. रात्रीचे दोन वाजतात. राऊ तरीही गाडवावरनं उतरायला नकार देतो. अजून म्हारुडा ऱ्हायलाय, मांगुडा ऱ्हायलाय… संबंध गाव म्हंजे संबंध गाव पालथा घालय पायजे. अर्धी धिंड काढता का माझी? लोक वाजापाची जोडणी करा. पाटील, सरपंच, पंच सारा लवाजमा गोळा करा. नव्या धिंडीची तयारी चालू होते. गावात पिणाऱ्याचा काय तोटा? ग्राम पंचायतीने ठराव केला म्हणून काय झाले? ठरावाने पिणारे थांबतात थोडेच? पकडले जायची भीती… पण तीही किती दिवस वाटणार? ग्रामीण भागातील ही वास्तवता… नाट्यपूर्ण शैलीत धिंड द्वारे समोर येते. समाजातले वेगवेगळे घटक, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांची विशिष्ट कामे वा व्यवसाय… या सर्वांचा कोलाज त्यातून उभा राहतो. शंकर पाटील यांची कुठलीही कथा घ्या. संभाषणातून ती फुलत जाते, खुलत जाते. उलगडत जाते. तिच्यातला विनोद नकळत होत असतो. बोलणाऱ्यातला आपण विनोदी काही बोलतोय याची कल्पनाही बहुतांशी नसते.. त्यामुळे आज या कथा वाचताना ग्रामीण मानसिकतेबरोबर कथाकार म्हणून तपशीलातील बारकाव्यांवर भरपूर मेहनत घेणारे शंकर पाटील यांचे निवेदन कौशल्यही आपल्याला खिळवून ठेवत.