देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव ‘माणूस!’ तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात.
एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही. वाडिया महाविद्यालयात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे चाळीस वर्षे प्राणिशास्त्राचे अध्यापन करणारे उर्दू शायर, क्रीडासमीक्षक अशा विविध नात्यांनी परिचित असलेले प्राध्यापक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना! – त्याची ही रसपूर्ण, विचारांना चालना देणारी कहाणी.
मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध. या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोधून काढत आहे; परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत. मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत. या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक.