Share

नाव :- ज्योति गोरख मुसळेमुसा, वर्ग – बी ए.एल.एल.बी तृतीय वर्ष, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे

मन में है विश्वास’ हे आय. पी. एस. अधिकारी मा. श्री. विश्वास नारायण नांगरे पाटील यांचे हे पुस्तक त्यांच्या अस्सल अनुभव व मनाला घट्ट पकडून ठेवणा-या लेखनशैलीमुळे चांगलेच गाजते आहे. मराठी साहित्यात आत्मकथनांची मोठी परंपरा असली, तरी विश्वास नांगरे पाटील यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं आत्मकथन ‘मन में है विश्वास’ हे या परंपरेतील महत्त्वाचं आत्मकथन ठरावं. स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अत्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.

स्वतःच्या भूतकाळात खोल खोल उतरून यू.पी.एस.सी. स्वतःच्या भूतकाळात खोल खोल उतरून यू.पी.एस.सी. यशाच्या मार्गक्रमणेचा अर्थ लावू पाहणारा भावड्या प्रत्येक अनुभव इतक्या पोटतिडकीने मांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभर थरारून उठते. भावड्याला बोलायचंय ते आपल्या गावाविषयी, आईवडिलांविषयी, नातेवाईक, मित्र, गुरूजनवर्ग स्वतःच्या अपार संघर्षाविषयी, यातनांविषयी, त्याच्या मनोविश्वाला व्यापून असणाऱ्या हरेक घटनेविषयी, त्याला पराभूत करू पाहणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तीविषयी, आशा-निराशा, यशापयश, स्वप्न आणि भ्रमनिरास या साऱ्याविषयी. अशी बहुपेडी आशयसूत्रे असलेला एक कॅलिडोस्कोप म्हणजे ‘मन में है विश्वास’ हे आत्मकथन. अतिशय सहज सुंदर ओघवत्या भाषेत अगदी प्रांजळपणे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या हातून घडलेल्या चुका, बेहोषी, अविचार सर्व काही हातचं राखून न ठेवता अतिशय मोकळेपणाने लेखकाने आपली कथा सांगितली आहे. भावड्याचा सुरुवातीचा काळ बरा गेला, पण कॉलेजचा काळ, मुंबईतील वास्तव्य खूप हलाखीचं गेलं. खाण्यापिण्याची ददात आणि राहण्याची दैना यातून झुंज देत कष्टाने स्वकर्तृत्वाने भावड्या यू.पी.एस.सी. (UPSC) परीक्षा पास होऊन आघाडीचा आय.पी.एस. (IPS) अधिकारी बनतो. हे आत्मकथन वाचताना जुन्या आठवणींशी खेळत वर्तमानात असलेल्या परिस्थितींशी जुळवून घेत भविष्याला आकार देणारी ही आत्मकथा फक्त भावड्याची राहात नाही तर आपलीही होते.

दहावी, बारावी, बी. ए. नंतर काय? असा प्रश्न तरुण पिढीसमोर कायम असतो. त्याचं उत्तम उत्तर म्हणजे- ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक ! सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगतो (IPS) अधिकारी होतो स्वकार्य, कर्तृत्वाने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरतो, तसेच तरुणाईच्या मनातील मानबिंदू होतो, ही सहजसोपी गोष्ट नाही. यश हे त्यागाशिवाय व भोगाशिवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरा जातो तोच खरा यशस्वी होतो. प्रत्येक व्यक्तीच्या यशाचे कारण कुणीतरी असते. विश्वास नांगरे पाटील यांनाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी कुणी भेटत गेले व मार्ग दाखवत गेले. शाळेत असताना गावच्या सरपंचाचा मुलगा असल्यामुळे वर्चस्व गाजवण्याची वृत्ती, शिक्षक नसताना त्यांच्या खुर्चीत बसणे, त्यांनी विनंती केल्यावर जागेवर बसणं, अशावेळी कदमबाई येतात खडसावतात, ‘विद्या विनयेन शोभते. नम्रता अंगी नसेल तर तुझ्या हुशारीची कवडीमोल किंमत. चालता हो माझ्या वर्गातून.’ भिडेसर, गोखलेसर, सुतारसर, ज्ञानाच्या कक्षा जेवढ्या विस्तृत व समृद्ध करता येतील त्या करीत राहायचे असं सांगणारे दिगवडेकरसर, तर बारावीत असताना मराठी माध्यमातून परीक्षा देऊन आय.ए.एस. होणाऱ्या गगराणीसरांच्या भाषणाचा प्रभाव… या सगळ्यांजणांच्या विचारांचा- आचारांचा एका खेड्यातील मुलावर प्रभाव पडतो आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं.

उच्च माध्यमिक व पदवी शिक्षण कोल्हापूरला पूर्ण करून एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी.चा अभ्यास करण्यासाठी भावड्या मुंबईत येतो. मुंबई विद्यापीठात इतिहास विषयात एम.ए. साठी प्रवेश घेतो. वसतिगृहात राहातो. एस.आय.सी.त अभ्यास करत UPSCची तयारी करताना MPSCची ही तयारी सुरू करतो. यासाठी नियोजन, उजळणी व बुड तुटेस्तोवर मेहनत करण्याची तयारी करून आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा व परिश्रम या त्रिसूत्रीचा दिवा सतत पेटता ठेवतो.

‘भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं पहायचंय’ असं म्हणणाऱ्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता भावड्या बुडाला फोड येईपर्यंत मेहनत करून अखेरच्या लढाईपर्यंत मजल मारीत (UPSC) ची व (MPSC) ची लढाई जिंकून घेतो.

आत्मकथनातील आशयाबरोबरच लेखकाने पुस्तकात उत्तमोत्तम छायाचित्रंही दिल्यामुळे पुस्तक वाचनीयतेबरोबरच प्रेक्षणीयही झालं आहे. हे आत्मकथन मुख्यतः तरुणांसाठी असले तरी मोठ्यांनी, म्हणजे पालकांनाही वाचण्यासारखं पुस्तक आहे. सतत यश-अपयश, नैराश्याच्या गर्तेत उसळणारी मनस्थिती, तरी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारण्याची जिद्द, भावड्याच्या भावनिक घुसमटीचा हा उणापुरा २३ वर्षांचा जीवनपट ताकदीनं उभा राहिला आहे. प्रसंगाचे फार तपशील न देता संवादावर भर, उत्तमोत्तम कविता, सुंदर बोधप्रद वाक्यरचना, उत्तम भाषासौष्ठव यामुळे आत्मकथनाला कलात्मक सौंदर्यदेखील प्राप्त झालं आहे.

२६/११च्या ताजच्या दहशतवादी हल्ल्यात साक्षात मृत्यूला आलिंगन देणारे, निधड्या छातीचे विश्वास नांगरे- पाटील कार्यक्षम व उत्तम पोलिस अधिकारी, म्हणून प्रख्यात आहेत. त्यांच्या ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाने त्यांची ही इमेज अधिक उजळून निघते, एवढं नक्की!

Recommended Posts

उपरा

Prakash Jadhav
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Prakash Jadhav
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More