Reviewed by: Dr. Prashant Mulay, Vice Principal (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)
श्री पु ग सहस्रबुद्धे यांनी सुमारे 45 वर्षांपूर्वी महाराष्ट्र संस्कृती हा जवळपास 800 पानांचा ग्रंथ इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन 1947 या सुमारे 2200 वर्षाच्या कालखंडाचा आढावा घेण्यासाठी लिहिलेला आहे. हा ग्रंथ लिहिताना लेखकाने सदर कालखंडाचे चार वेगवेगळे विभाग केले आहेत. यात इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन 1318 हा सातवाहन ते यादव राज्यकर्त्यांचा पहिला विभाग इसवी सन 1318 ते 1647 हा मुस्लिम राज्यकर्त्यांचा दुसरा विभाग इसवी सन 1647 ते 1818 हा मराठी सत्तेचा तिसरा विभाग तर 1818 ते 1947 हा ब्रिटिश सत्तेचा चौथा विभाग यांचा समावेश आहे. लेखकाच्या मते धर्म, राजकारण, समाज रचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण संस्कृतीचे आठ प्रमुख मापदंड आहेत. या मापदंडांच्या आधारे त्या त्या कालखंडाचे विवेचन लेखक या पुस्तकातून करीत आहे.
पहिल्या विभागाची सुरुवात लेखकाने ‘महाराष्ट्र संस्कृतीचा’ उदय कशाप्रकारे झाला याच्या विवेचनातून केला आहे. लेखकाच्या मते धर्म, वंश, भाषा, प्रदेश यानुसार मानवांचे समूह बनत असतात. आणि अशा स्वतंत्र संस्कृतीचा त्या समूहांना अतिशय अभिमान असतो. त्यामुळे लेखकाच्या मते महाराष्ट्र संस्कृतीचा उदय होण्यामागे भाषा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तत्कालीन कालखंडातील ‘महाराष्ट्री’ ही भाषा महाराष्ट्रामध्ये बोलली जात होती. या भाषेमध्ये लिहिलेले सातवाहन कालीन अनेक शिलालेख महाराष्ट्रात आढळून येतात. सातवाहन काळात रचला गेलेला ‘गाथा सप्तसई’ हा ग्रंथ देखील महाराष्ट्री भाषेत लिहिला गेलेला होता. थोडक्यात इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ‘महाराष्ट्र संस्कृती’ महाराष्ट्री भाषेच्या रूपाने अस्तित्वात आली. नंतर महानुभाव पंथाच्या साहित्या मधून ‘महाराष्ट्र’ या प्रदेशाची आपणाला ओळख होते. अशा ह्या ‘महाराष्ट्र संस्कृतीला’ जोपासण्याचे काम सुरुवातीच्या काळात सातवाहन घराण्याने केले. इसवी सन पूर्व 235 पासून सुमारे साडेचारशे वर्ष या घराण्याने महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांच्या वैभवशाली राज्याच्या पाऊल खुणा विविध शिलालेख आणि नाण्यांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. ‘गाथा सप्तसई’ हा महाराष्ट्री भाषेत लिहिलेला आणि येथील लोक जीवनाचे वर्णन करणारा ग्रंथ सातवाहनांच्या कालखंडात तयार झाला. सातवाहनानंतर इसवी सन 1318 च्या मुस्लिम आक्रमणापर्यंत महाराष्ट्रात वाकाटक, बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव अशा पाच राजघराण्यांनी राज्य केले. देवगिरीच्या यादव घराण्याकडे दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे सन 1318 मध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी देवगिरी जिंकून घेतली आणि महाराष्ट्राचे स्वातंत्र्य संपुष्टात आले असे लेखकाचे मत आहे. या सर्व कालखंडात घटनात्मक बंधने नसलेली अनियंत्रित राजसत्ता अस्तित्वात असली तरी तिच्यावर धर्माची म्हणजेच विवेकाची बंधने होती. असे असले तरी जनपद ग्राम, राष्ट्र अशा राज्याच्या विभागांमधून लोकशाहीच्या पाऊलखुणा या काळात दिसून येतात. धार्मिक पातळीवर देखील जैन, बौद्ध धर्मापेक्षा वैदिक धर्माचा प्रभाव या सर्व राज्यकर्त्यांना होता असे आढळून येते. या कालावधीत वर्णधिष्ठित समाज रचना अस्तित्वात होती. तसेच स्त्रियांच्या बाबतीत उदारमतवादी धोरण अवलंबिले जात होते. समुद्रमार्गे बाहेरील राष्ट्रांशी व्यापार उदीम चालत असे. साहित्य, कला, विद्या यांचा देखील विकास या कालावधीत झालेला आढळून येतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली लेणी याच राजसत्तांच्या कालावधीत कोरली गेली आहेत.
यादवांच्या सत्तेचा लोप होऊन इसवी सन १३१८ मध्ये मुस्लिमांची सत्ता महाराष्ट्रावर स्थापन झाली. इसवी सन 1647 पर्यंतचा हा कालखंड लेखकाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या पारतंत्र्याच्या कालखंड आहे. आणि यासाठी लेखक तत्कालीन हिंदू राजांच्या अदूरदर्शीपणा, कर्तव्य शून्यता, असामर्थ्य आणि नादानपणाला जबाबदार धरतो. या कालावधीत बहामणी सत्तेचा अंमल होता. जीची पुढे गाविलगडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेरीदची बिदरशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी पाच शकले झाली. या सर्व शाह्या महाराष्ट्रात रुजण्यासाठी लेखक तत्कालीन, मनातील स्वातंत्र्याची भावना लोप पावलेल्या आणि इनाम जहागिरीच्या लोभात गुरफटलेल्या मराठा सरदारांना जबाबदार धरतो. अगदी राजवाडे, वा सी बेंद्रे यासारख्या इतिहासकारांनी केलेला शहाजी राजे यांचा कार्य गौरव किंवा सरदेसाई यांनी शहाजीराजांना ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून दिलेले नामाभिधान म्हणून लेखकाला अमान्य आहे. त्यांच्या मते शहाजीराजांची स्वतंत्र ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याची क्षमता असताना देखील ते आदिलशाही निजामशाही आणि मुघलांची चाकरी करत बसले तसेच त्यांचा वतीने समकालीन ‘हिंदू राज्ये’ बुडवण्याचे काम त्यांनी केले आणि शक्य असताना देखील स्वतःच्या सैन्यास छत्रपती शिवाजी महाराजांना कोणतीही लष्करी मदत केली नाही. याच कालावधीत शास्त्र पंडितांना प्राचीन वैदिक धर्माचा विसर पडून कर्मकांडाला अति महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे या काळात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचा या भूमीत उदय झाला नसता तर महाराष्ट्राचा सर्वनाश अटळ होता असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. या संतांनी ‘भागवत धर्माच्या’ माध्यमातून लोकशिक्षणाची मोठी चळवळ उभी केल्याचे दिसून येते. यानंतरचा कालखंड अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाचा आणि मराठी राज सत्तेचा. लेखकाने ‘महाराष्ट्र धर्म’ या नावाने पूर्ण प्रकरण लिहिले असून त्यात ‘महाराष्ट्र धर्माच्या’ उत्पत्तीसाठी रामदास स्वामी कसे जबाबदार आहे याचे विवेचन केले आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य स्थापने साठी त्यांनी केलेल्या जनजागृतीचा मोठा फायदा झाला असे लेखकाचे मत आहे. त्याचबरोबर ते महाराजांच्या गुरुस्थानी देखील रामदासांना मानतात. लेखकाच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना केली असली तरी ही ‘हिंदूपदपातशाहीची’ मुहूर्तमेढ होती. महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मोठ्या फौज फाट्यासह महाराष्ट्रावर आक्रमण करून देखील त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही कारण हा एतदेशीय जनतेचा लढा होता असं लेखकाचं मत आहे. लेखक पुढे म्हणतो की मुघलांच्या हल्ल्याने गलीतगात्र झालेल्या मराठी सत्तेला उर्जित अवस्था आणण्याचं काम मुख्यतः पेशव्यांच्या माध्यमातून झालं. पेशवा बाजीरावाने मराठा स्वराज्याचे ‘साम्राज्यात’ परिवर्तन करून मराठ्यांना हिंदुस्तानच्या इतिहासात वैभवाचे स्थान मिळवून दिले. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड आदी सरदारांच्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सत्ता अटकेपार पोहोचली होती. परंतु याच सरदारांना मराठीशाहीच्या पतनासाठी देखील लेखक जबाबदार धरतो. याच काळात महाराष्ट्रात मुक्तेश्वर, वामन, श्रीधर, मोरोपंत इत्यादी ‘आख्यान कवी’ उदयास आले. ‘शाहिरी’ सारखा नवा प्रकार परशुराम, होनाजी बाळा, अनंत फंदी, राम जोशी इत्यादी शाहिरांनी महाराष्ट्रात रुजवला. कर्मकांडांना आलेलं अनन्यसाधारण महत्त्व, पराकोटीचा जातीभेद, स्त्रियांची दैन्यावस्था, शेती आणि व्यापार उदिमाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष ही पेशवाईचा अंत जवळ आल्याची लक्षणे होती. अखेरीस 1818 मधील इंग्रजांच्या बरोबरच्या युद्धातील दुसऱ्या बाजीरावाच्या पराभव मुळे पेशवाई लयास जाऊ महाराष्ट्रावर ब्रिटिशअंमल सुरू झाला.
सन 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर महाराष्ट्रात सामाजिक स्तरावर परिवर्तन सुरू झाले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्वे, शिंदे, आगरकर यासारखे समाज सुधारक आपल्या परीने समाजाला जागृत करण्याचे काम करत होते. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाबरोबरच ब्रिटिश राजवटी विरोधातील चळवळ उभी राहत होती. राजर्षी शाहू सारखा उदारमतवादी राजा याच कालखंडातील. नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, सावरकर हे स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी होत. याच काळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायासाठी मोठा लढा या महाराष्ट्रात उभा केला. ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला गेला. तर गायन, संगीत, नाटक या कलेच्या क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्र प्रगती करत होता.
एकंदरीत ‘महाराष्ट्र संस्कृती’ या ग्रंथाचा मागोवा घेतल्यावर महाराष्ट्रात गेल्या अडीच हजार वर्षापासून ‘महाराष्ट्र सांस्कृती’ अस्तित्वात आहे आणि ती वेगवेगळ्या कालखंडामध्ये समृद्ध होत गेलेली दिसते. परंतु त्याच वेळी दाक्षिणात्य संस्कृती च्या तुलनेत संगीत, नाट्य, चित्र, शिल्प या कलांच्या उपासनेचा अभाव तसेच राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान याबद्दलची अनासक्ती देखील बहामनी आणि मराठेशाहीच्या काळात आढळून येते.
या ग्रंथाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र संस्कृतीची’ विस्ताराने ओळख करून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे असे नक्कीच म्हणता येईल.