मृत्युंजय ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. सर्वसामान्यांना महाभारतातील खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मागोवा घेणारी ही कादंबरी आहे या कादंबरीतील बऱ्याच कथा अनेकांना परिचित आहेत. खलनायक म्हणून भासणारा कर्ण प्रत्यक्षात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे हे ही कादंबरी पटवून देते. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्याने स्वतःला सुतपुत्र मानले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्याने आपली ओळख सांगितली नाही, ज्याने स्वतःच्या गुरूचा शाप ही वरदान समजून घेतला.
या कादंबरी ला वाचतांना जणू आपणही त्रेतायुगात वावरत आहोत असा भास होऊ लागतो. मृत्युंजय कादंबरी हाती घेतल्यावर कर्णाचे जीवन नव्याने मनात उलगडू लागते. साक्षात इंद्रदेवाला दान देणाऱ्या त्या सूर्य पुत्रसारखा दानविर या धर्तीवर आजवर झाला नाही अन् भविष्यात होणारही नाही. कर्ण ज्याने स्वतःच्या शब्दा साठी आपलं अस्तित्व दान केले आपले प्रण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले, स्वतःचे वचन पूर्ण केले.
या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरु द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
आजचा तरुण व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने अवश्य वाचावी अशी हि मराठी साहित्यातील सावंत यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय कादंबरी आहे