रॉकेलची चिमणी संपूर्ण देवळी काळी करते पण सोबत संपूर्ण घर उजळून टाकते. या चिमणीचा हा मिणमिणता प्रकाश अनेकांची डोकी नांगरेल हे या मुखपृष्ठावरूनच कळते. याला पुस्तक म्हणावे कि दैनंदिन आयुष्यात सतत उशाशी ठेवावा आणि उराशी बाळगावा असा ग्रंथ हा प्रश्न मला पडलाय आणि तुम्हालाही पडेल, पण त्यासाठी हे पुस्तक लवकरात लवकर घ्या आणि वाचा. आपल्या हातून एखादी चूक झाली कि नेमकं कुठं बदल करावा असा विचार मनाला शिवला तर त्याचे उत्तर या पुस्तकात कुठे ना कुठे मिळेल याची खात्री बाळगा.
या पुस्तकातील ४८ लेख म्हणजे स्वतःला मिळणारे कमीत कमी ४८ आणि जास्तीत जास्त कितीही धडे आहेत. जड, जाडजूड आणि मोठेमोठे शब्द न वापरता जणू काही आपणच आपल्याशी बोलतोय आणि आपल्यालाच पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधतोय आणि ती मिळालीतही असे वाटेल इतके सुंदर पुस्तक देवा दादांनी “ये हृदयीचे ते हृदयी” आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचविले आहे.
प्रत्येकाला जुन्या आठवणी येणारच, आपले बालपण आठवणारच, आपल्या चुकांची जाणीव होणारच, ग्रामीण आणि शहरी जीवन आठवणारच, या आणि अशा अनेक घटना हे पुस्तक आपल्याला सांगेल पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागोजागी त्यांची आई आपल्याला सापडेल आणि त्यात आपण आपली आई शोधतो किंवा ती आपल्याला दिसतेच. प्रत्येक लेखानंतर आपल्याला एक विचार, तात्पर्य, गमक, आठवण किंवा धडा देते. अतिशय सोपी भाषा, ज्यांनी ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांच्यासाठी ग्रामीण शब्द, सोशल मीडियासोबत जन्म झालेल्या मुलांसाठीही कान टोचणी, पालक आणि प्रत्येक नागरिकासाठी समोर आरसा धरावा असे हे पुस्तक आहे. विहिरीतल्या पोहण्याची मजा स्विमिंग पूलला कधीच येणार नाही, अल्ला कि देव हे महत्वाचे नसून तुमच्यातला माणूस जागा ठेवणे, प्रकाशवाटा निर्माण करणारी माणसे, संपत्ती गोळा न करता गरजूंपर्यंत पोहोचविणारी माणसे, फळा खडूचे नाते, आयुष्य घडविणारे महत्वाचे वाचन, शेतकऱ्यांची पिडा हे आणि असे अनेक संदेश तुमच्या मेंदूची मशागत करून काही ना काही तुम्हाला गवसेल म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचा.