युगंधर ही कादंबरी जवळपास 1000 पानांचा ग्रंथच आहे. खरे तर या कादंबरी चा आवाका येवढा आहे की, त्याचे परीक्षण सुद्धा आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असते.
कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक आणि माहितीप्रद जास्त आहे. भावनात्मक कमी आहे. म्हणजे अशा अशा पद्धतीने असे असे घडत गेले हे फक्त आपल्यासमोर उलगडत जाते. महाभारत काळातील प्रसंग, व्यक्ती, वस्तू, खाण्याचे पदार्थ यांचे जसेच्या तसे वर्णन चपखल विशेषण लावून लेखकाने केले आहे.
कणीदार दह्याच्या कवड्या आणि तो रुक्मिणीच्या हातचा ओदन / काही खाण्याचे पदार्थ पाहिले नसतानाही तोंडाला पाणी सुटते ही लेखकाची कमाल. घटोत्कचच्या केसाळ आणि पोटाचे वर्णन करताना लेखक त्याला पालथ्या मारलेल्या काळ्या कढईची उपमा देतो.
या कादंबरीमध्ये लेखकाने स्पष्ट केले आहे की, कृष्णाच्या प्रतिमेला वर्षानुवर्ष चमत्काराचे आणि अति मानवी रूपाचे लेप काढून कृष्ण एक माणूस म्हणून कसा जगाला हे दाखवले आहे. युगंधर मध्ये कृष्ण गोकुळात राहताना पासून ते कंस वधापर्यंत आपण ऐकत आलेले जवळपास सर्व प्रसंग लेखकाने गाळून टाकलेत.
कालिया मर्दन, मुखांत यशोदेला दिसलेले ब्रम्हांड असे अनेक प्रसंग यात अक्षरशः नाहीत. अगदी कृष्ण जन्माची कथासुद्धा वगळण्यात आली आहे. मात्र कृष्णाला एकानंगा नावाची बहीण असते. तसेच आठ काका आजोबा ( चित्रसेन ) अशा अनेक नाविन्यपूर्ण कधीच न ऐकलेल्या गोष्टी यात वाचायला मिळतात.
काहीही असले तरी कृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम, व्यक्ती, नाते, गोतावळा स्थळे याची इथ्यंभूत माहिती मिळवायची असेल तर युगंधर कादंबरीला पर्याय नाही. कृष्णाचा आणखी एक पैलू युगंधर अतिशय स्पष्टपणे समोर आणतो तो म्हणजे स्त्रियांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन. मग त्या त्याच्या कुटुंबातील असोत किंवा दूरच्या राज्यात अत्याचार झालेल्या स्त्रिया असोत.
कृष्ण आणि बलराम यांच्यातील वाद विवाद योग्य पद्धतीने समोर येतात. तसेच बलराम कौरवांकडे कसा आणि का झुकतो हेही आपल्याला कळते. तसेच सुदामा कृष्ण यांची भेट फक्त दोनदाच ( शिक्षण घेताना आणि पोहे आणतो तेंव्हा ) होत नाही तर नेहमी द्वारकेत होत राहते. हे यातून मला प्रथमच कळले. तसेच द्रोपदी स्वयंवरासाठी कृष्ण सुद्धा स्पर्धक म्हणून आला होता. ब्राम्हणवेशधारी अर्जुन तेथे भाग घ्यायला नसता आला तर द्रोपदी कृष्णाची नववी पत्नी झाली असती. हे कधीही न ऐकलेले यात वाचायला मिळाले तसेच द्रोपदीच्या तोंडुन तिच्या पाच ही पतींचे स्वभाव वर्णन एकाने मजेशीर वाटते.
एकमेव अशी युगंधर कादंबरी लिहिल्याबद्दल लेखकाचे शतशः आभार.