काही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. “प्रसिद्ध”, “सनसनाटी”, “मैलाचा दगड” “आक्षेपार्ह” वगैरे त्यांना लावलेले लेबल्स आत्मसात करतो आणि चर्चेत अनेकदा माना डोलावतो. पण असले एखादे प्रसिद्ध आणि बहुचर्चित पुस्तक एकदाचे वाचण्यात आले, की त्याबद्दल नवीन काय आणि कसे म्हणायचे, हा प्रश्न उठतो. (काही म्हणायलाच हवे असे नाही हे मान्य आहे, तरी शांत बसवत नाही म्हणून :-)) “हे तुला आत्ता कळलं? पुस्तकाला येऊन प वर्षं झाली की, ही चर्चा आता जुनी झाली!” हे ऐकावे लागते. पण आमची परिस्थिती थोडीफार सिनेमातल्या पोलीसांसारखी असते – मोक्याच्या ठिकाणी पोहोचायला हमखास उशीर. साहित्यिक मैलाच्या दगडांपर्यंतही धापा टाकत उशीराच पोहोचतो, आणि कसेबसे आपले मत सगळ्यांना सांगू लागतो.
विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी वाचून माझे असेच काहीतरी झाले. बेडेकरांबद्दल तपशीलवार असे काहीच वाचले नव्हते, पण त्यांच्याबद्दल, आणि कादंबरीबद्दल तुटक-तुटक बरेच काही ऐकले-वाचले होते. अलिकडेच रणांगण वाचून काढली, आणि भयानक आवडली. पुस्तकाने खूप अस्वस्थ ही केले, आणि त्याच्या भोवती इतकी चर्चा झाली याचे नवल वाटत नाही.
कांदंबरीचा काळ १९३० च्या दशकाचा, दुसर्या महायुद्धाचे वारे लागलेल्या दिवसांचा आहे. इंग्लंडहून परत मुंबईकडे येताना, जहाजावर कथानायक चक्रधर हॅर्टा नामक जर्मन ज्यू महिलेला भेटतो, आणि तिच्या प्रेमात पडतो. कथानक बहुतांश बोटीवरच उलगडते. बोटीवर विविध देशाचे, धर्माचे, वंशाचे लोक असतात, त्यातील मोजक्याच तिघा-चौघांना आपण भेटतो. त्यांचे परस्पर संबंध जुळत, मोडत जातात. कादंबरी जागा, काळ आणि पात्रांनी अगदी सीमित असली तरी बेडेकर विश्वाचे एक लघु रूप तयार करून जीवन, अस्मिता आणि मानवी संबंधांबद्दल व्यापक प्रश्न उभे करतात.
कादंबरीचा आशय राष्ट्रीयत्व, आणि राष्ट्रीय अस्मितेची चिकीत्सा आहे. प्रत्येक पाउलावर या अस्मितेची ओढ आणि तिचे पोकळपण हे दोन्ही बेडेकर उभे करतात. कथेचा काळ राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा कळस होता, तरी त्या भाववेचा उद्रेक म्हणावा अशा महायुद्धाच्या मुळाशी देखील व्यापार आणि लोभच आहे, आणि तोही तिसर्याच देशाच्या (अमेरिकेच्या) लोकांचा, हे आपण वाचतो. चक्रधर भारतीय/मराठी आहे, पण त्याचा देश ब्रिटिश साम्राज्यात सामिल आहे – जागतिक पातळीवर स्वतंत्र असे अस्थित्व त्याला नाही. बोटीवर विविध जातीजमातीचे लोक आहेत – ब्राह्मण, मराठा, मुसलमान, उत्तरेकडील मंडळी. बोटीवरच्या भारतीयांच्या अगदी मोजक्या, नेमक्या संवादातून बोत मुंबईच्या दिशेने चालली असली तरी “घरी मायदेशी” परत जाणे तितके सरळसोपे नाही हेही कळते. आपल्या देशावर ब्रिटिशांचाच नाही, तर मुसलमानांचा किती हक्क आहे, यावर सर्वांचे एकमत नाही. पॅलेस्टाइनच्या अगदी जवळ जाऊनही तिला पुण्यभूमी मानणार्या यहूद्यांना तिथे उतरता येत नाही. ज्यू प्रवासी स्वत:ला जर्मनच मानतात, पण तेथून त्यांची क्रूर हकालपट्टी झालेली असते. (पुढे ह्याच हकालपट्टीमुळे ते गॅस चेंबरातल्या सामुहिक कत्तलेतून वाचतात, हे भीषण सत्य कादंबरी लिहीताना बेडेकरांना अर्थात माहित नव्हते) यातले काही नाइलाजाने इँग्रजी हीच जगाची भाषा म्हणून तिला केविलवाणी पद्धतीने शरण जातात. (इंग्रजीला शरणागति देखील पुढे जागतिकीकरण आणि प्रगतीच्या नावाने अनेकांच्या नशिबी येईल हे देखील त्यांना ठाउक नव्हतेच!) भारतीय आणि पाश्चात्य जगात आणि विचारांमध्ये मनमुराद वावरणारा चक्रधर ऐन वेळी त्या cosmopolitan जगात शिरून हॅर्टाला आपले करू शकत नाही. किती नाही म्हटले तरी त्याला “घरी” यावेच लागते, तो तिने त्याला दिलेल्या नावासारखे पुर्णपणे “बॉब” होऊ शकत नाही.
राष्ट्रीयत्वाच्या उदाहरणावरून एकूण माणसाच्या भावनांच्या सत्यतेचे स्वरूप कादंबरी शोधत जाते. दुसर्या व्यक्तीप्रती प्रेमभावना, राष्ट्रप्रेम, धार्मिक अस्मिता, या सर्व भावनांना बेडेकर विसंगत आणि अतिरेकी रूपात सादर करतात; एकीकडे प्रेम आणि सहानुभूति यांना काही राष्ट्रीय सीमा नाही हे वेगवेगळ्या संबंधातून आपण पाहतो – चक्रधर आणि हॅर्टाचे प्रेम, मन्नान या पात्राशी हॅर्टाचा संबंध, डॉ शिंदे यांना लुई या लहान मुलाचा लळा, इत्यादी. तरी हे सगळं इतकं सोपं देखील नाहीये, कदाचित अशक्यच आहे, असा निराशाजनक सूरही आहे. जागतिक युद्धासारखेच हे वैयक्तिक रणांगण जिंकणं देखील तितकेच कठीण असा एकूण निष्कर्ष निघतो. मग आपला देश, आपले रीतिरिवाज, आपले लोक, आपलं माणूस म्हणजे नक्की काय? एका माणसाशी नाते जोडणे म्हणजे नक्की काय? कितपत सामाजिक, आणि कितपत वैयक्तिक? कादंबरी कमालीचा संयम पाळून आपल्याला सरळ उत्तर देत नाही. हॅर्टा आत्मजत्या करते, पण तिच्या आणि चक्रधरच्या प्रेमाला बेडेकर खोटे ठरवत नाहीत. मला शेवटी काय होणार हे आधीच माहित असूनही फार वाईट वाटले.
रणांगणातला व्यक्तींचा सामाजिक चौकटींविरुद्ध संघर्ष वाचला की समकालीन ई. एम. फॉर्स्टर चे “Howard’s End” आणि “A Passage to India” कादंबर्या आठवल्यावाचून राहिले नाही. दोन्ही कादंबर्यांमध्ये वेगवेगळ्या वर्ग/जमातींमधले संबंध बनत राहतात (“always connect!”) पण शेवटी निराशाच हाती लागते (“not here, not now”).
राष्ट्रीय भावना ही एकतेचे गुणगान करत असली तरी मुळात ती कृत्रिम आणि विभाजनवादी, विध्वंसक आहे, हा तर्क दुसर्या युद्धानंतर जगात अनेकांनी निरनिराळ्या पद्धतीने मांडला. युरोपातच नाही तर भारतीय उपखंडात फाळणीच्या भीषण हिंसेला साक्षीदार असलेल्या अनेक लेखकांनी (मण्टो, रजा, यशपाल, प्रीतम, गंगोपाध्याय, खुशवंत सिंह), हिंदी-उर्दू-बंगाली साहित्यात हा विचार व्यक्त केला. स्वत: स्थलांतरित झालेल्या, किंवा एकूण स्थलांतर, जागतिकीकरण, गढूळ अस्मिता, इत्यादीत रस असलेल्या “इंडियन इंग्लिश” लेखकांचाही हा आवडता विषय राहिला आहे. मराठी साहित्यात राष्ट्रीयत्वाची अशी मार्मिक, वैश्विक, आणि समानानुभूतिपूर्ण चर्चा मी प्रथमच वाचली, ती देखील १९३९ या काळात, अशा विलक्षण पात्रांतून. ही कादंबरी खरोखर एकाच वेळी cosmopolitan ही, आणि मराठीही आहे असे जाणवले.
एकच गोष्ट सतत खटकली, आणि ती म्हणजे शेवटी शेवटी आलेली पात्रांच्या दृष्टीकोनातली असंबद्धता. संपूर्ण कादंबरी चक्रधरच्या दृष्टीकोनातून आपण वाचतो, पण शेवटी शेवटी एकाएकी हॅर्टाच्या मनात शिरतो – पण अजून चक्रधरच्याच निवेदनात. तो कादंबरीभर स्त्री जातीचा इतका संशयी असताना, एकदम त्याच्या आवाजात तिचे विचार, तिची तळमळ आणि अस्मिता प्रस्तुत केलेल्या मला विसंगत, कादंबरीच्या शिस्तीला सोडून वाटले. हे वळण बेडेकरांनी ठरवून घेतले, की गोष्ट त्यांच्या हातातून थोडीशी निसटली, हे कळणे कठिण. एकूण हे स्त्रीचित्रण मला उमगले नाही – चक्रधरच्या संशयासहित स्त्रियांकडून असलेल्या “धोक्या” पासून जपून राहण्याची काही
अगदी साचेबंद विधाने कादंबरीभर आहेत, पण त्यासोबत सगळी स्त्रीपात्रे या विचाराला मोडही घालत जातात. शेवटी चक्रधरही मावळतो. त्यातून बेडेकरांना नक्की काय म्हणायचे होते हे कळले नाही – पण राष्ट्रीय स्वाभिमानाची, सामाजिक अब्रूची निव्वळ मूर्ती ठरण्यापेक्षा बेडेकरांची स्त्री पात्रे माणुसकी, लैंगिक क्षमता, स्वतंत्र विचारांनी कमालीच्या जीवंत होतात. अर्थात, कादंबरीत एकही भारतीय स्त्री नाही. तशी असती तर तिच्या पात्राची घडण वेगळी झाली असती का, कोण जाणे.
इतकी सुबक, विचारप्रवर्तक, आणि दृढबद्ध मराठी कादंबरी – खासकरून १९३०-४०च्या काळातली – मी तरी वाचली नव्हती. कथानकाची घडण अत्यंत प्रभावी आहे. अगदी नेमके शब्द आणि चित्रदर्शी वर्णन; कुठेही पाल्हाळ नाही. पटकथा लेखकाची शिस्त बेडेकरांनी कादंबरीतही पाळली आहे. मला प्रथम थोडी कृत्रिम वाटली – कोण हे सगळे युरोपियन लोक मराठीत बोलणारे! पण वाचता वाचता एकूण वर्णनशैलीची सहजता छान जाणवली. बोटीच्या प्रवासाचे असो किंवा प्रेमभावनांचे असो, अथवा अगदी पाश्चात्य पद्धतींचे, रीतिरिचाजांचे असो, त्यांच्या वर्णनांतून काहीतरी भलतंच वाचतोय असं वाटलं नाही. मुख्य म्हणजे कादंबरीचे विश्व किंवा पात्रे बघता
इंग्रजी शब्दांचा वापर फारच कमी जाणवला. त्या काळी ही भाषा आणि शैली फारच आधुनिक वाटली असावी का?
असो. आता या पुस्तकाबद्द्ल खूप कुतूहल वाटत आहे. इथल्या अनेक सदस्यांनी ही कादंबरी वाचली असावी; कादंबरीबद्दल, तिच्यावर झालेल्या चर्चेबद्दल, किंवा बेडेकरांबद्दल माहिती मिळावी, चर्चा व्हावी, या अपेक्षेने हे विचार मांडले आहेत. त्यांचे “एक झाड, दोन पक्षी” हे आत्मचरित्र वाचायची खूप इच्छा आहे, पण पुस्तक सहजासहजी उपलब्ध आहे असे दिसत नाही.