Share

कुसळकर हेमंत पोपटराव, प्र.सहाय्यक

अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले

‘वाट तुडवताना’ या आत्मकथनात उत्तम कांबळे यांनी लहान वयात आपली वाचनाची आवड कशी जोपासली हे सांगतानाच दोन – तीन रुपयांची पुस्तक खरेदी करण्यासाठीही मेहनत करावी लागायची पण ‘खाऊपेक्षा पुस्तक प्रिय वाटायचे’ हेही प्रांजळपणे मांडले आहे. प्रारंभीच ‘जादुचा राक्षस’ आणि ‘शनिमहात्म्य’ ही चार – चार आण्यांची पुस्तके घेऊन देण्यासाठी आईने किती दिवस लावले, यातूनच घरातील अठराविश्वे दारिद्रयाचा काळोख किती दाटलेला होता हे लक्षात येते.

दोन वेळच्या भाकरीसाठी लाकडाचे जळण गोळा केले. आयुष्य जगण्यासाठी आपल्या अक्काला (आईला) करावा लागणारा संघर्ष पाहत असताना सैन्यात असणार्‍या आपल्या वडीलांचे कुटुंबाकडे कसे दूर्लक्ष झाले, अशा कडू आठवणीही त्यांनी कथन केल्या आहेत. एकुणच परंपरेकडून परिवर्तनाकडे सुरु असलेली आपली चार दशकांची वाटचाल उत्तम कांबळे यांनी या आत्मकथनातून मांडली आहे. वृत्तपत्र विक्रेता, वार्ताहर, ‘सकाळ’ सारख्या एका नामांकीत वृत्तपत्राचा संपादक, अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचा कार्यकर्ता, कथा- कादंबरीकार अशी बहुआयामी ओळख लेखकाने निर्माण केली. सततच्या वाचनातून, चिंतनातून पुढे लिहिण्याची सवय जडली आणि एक चांगला वक्ता म्हणूनही स्वत:ला घडवता आले. साहित्यिक म्हणून आजही हा प्रवास सुरु आहे. म्हणूनच ‘ग्रंथ आणि माणसं एकाच वेळी वाचत जाणं अतिशय आनंददायी असतं’असे लेखकाने म्हटले आहे.

प्रामुख्याने उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आपल्या लेखणीतून आवाज उठविणे हे जणू लेखकाचे ध्येय्यच होते. समाजमन भानावर आणणारं लेखन त्यांचेकडून झालं. यानिमित्ताने समाजातील माणुसकी जागी करता आली, अनेक वंचितांना न्याय देता आला.

दलित अस्पृश्यतचे चटके सोसत असतानाच दारिद्रय, उपासमार यातही सुरु असलेला जीवनसंघर्ष या आत्मकथनात आढळतो. संघर्षमय जीवनात ग्रंथांचा मोठा वाटा आहे आणि अजूनही ही वाचनाची तहान भागलेली नाही हे लेखकाने आवर्जून सांगितले आहे. म्हणजेच ग्रंथज्ञान हेच साध्य आणि साधनही होते. त्यातूनच लेखकाच्या तब्बल पंचवीसहून अधिक पुस्तकांची निर्मिती झाली आहे, यातूनच लेखकाच्या कर्तुत्वाचा आवाका लक्षात येतो.

वृत्तपत्र माध्यमात नोकरी करत असताना आलेले कडू-गोड अनुभव स्वकथनातून व्यक्त केले आहेत. ‘समाज’ या वृत्तपत्रापासून सुरु झालेली त्यांची नोकरी ‘सकाळ’ पर्यंत पोहचली. नोकरी करत असतानाही लेखकाचे शिकणे, ज्ञान मिळवणे कधीच बंद नव्हते. वृत्तपत्राची धूरा सांभाळताना समाजाची नाळ तुटूु दिली नाही, त्यासाठी संपादक पदावर असतानाही जाणीवपूर्वक छोट्या – मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली. यातून लेखकाचे समाजभान दिसते. हेच समाजभान त्यांना वार्ताहर पदापासून कार्यकारी संपादक आणि नंतर मुख्य संपादक पदापर्यंत घेऊन गेले. या माध्यमातून वंचित, उपेक्षित समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरुच होता. यासाठी वृत्तपत्राच्या रविवार विशेष पुरवणीत सातत्याने लेखन केले. ‘देवदासी’ सारख्या अनिष्ट रुढी, परंपरा, चालीरिती मोडून काढण्यासाठी पुस्तकरुपी लेखन आणि भाषणाच्या माध्यमातून प्रबोधन सुरुच होते. अनेकांच्या अंधारमय आयुष्यात लेखकाने नव्या विचारांचा प्रकाश दिला. या माध्यमातून आपल्या वाचन आणि लेखन आवडीचे त्यांनी व्यापक अर्थाने सोने केले. अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास नेमक्या कोणत्या प्रेरणेतून, उर्जेतून घडला याचा शोध ‘वाट तुडवताना’ या पुस्तकातून घेता येतो. वृत्तपत्र विक्रेता, हमाली, मजुरी पासून सकाळ वृत्तपत्राचे संपादक पदापर्यंतचा त्यांचा स्तिमित करणारा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

एकुणच काय तर पुस्तकांनीच लेखकाला घडवले याचे प्रतिबिंबच जणू या पुस्तकातून  दिसते. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ही पाने लेखकाने वाचलेल्या पुस्तकांच्या नावांनी बनलेली दिसतात. त्यावरुनही उत्तम कांबळे यांच्या वाचनाचा प्रचंड आवाका ध्यानात येतो आणि आयुष्याची जडणघडणही वाचावयास मिळते, म्हणूनच ते या आत्मकथनाच्या अखेरीस लिहितात..

‘माझ्या सर्व प्रवासात पुस्तकं माझी छत्रं आहेत. शब्द माझे सोबती आहेत. काळीज ओले ठेवण्यासाठी आवश्यक ते अश्रूही माझ्याकडे आहेत. माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा, मोजता येणार नाही इतका मोठा. माझ्यावर सावलीही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्याच हातात मोठ्या विश्वासाने गुंतलेले. मला वाचण्यासाठी अजुन वाचायचे आहे.’

Recommended Posts

The Undying Light

Bhagwan Gavit
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Bhagwan Gavit
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More