‘बंजारा’ हा समाज मुळातच इंग्रज येण्याच्या आधी व्यापारी म्हणून सुपरीचित होता. भारतातील सर्व राजेरजवाडे यांना युध्द सामुग्रीसह अनेक गरजा भागविण्याचे काम करायचा. त्यामुळे सर्व भारतभर भ्रंमती करण्याचा त्यांच्याकडे परवानाच होता. त्यांना कोणीही अडवत नव्हते. लाखोच्या संख्येत बैलांचा लवाजमा यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी असायचा. इतिहासात याचे पुरावे आहेत. मात्र इंग्रजांनी भारतातील विरोध करणाऱ्या राजे रजवाडे यांना नामोहरम करायचे असेल, वर्षानुवर्ष राज्य करायचे असेल तर रसद पुरविणारे यांचा बंदोबस्त आधी केला पाहिजे या कुटील हेतूने सर्व बंजारा जमातीच्या लोकांना सापडतील तेथे गुन्हेगार म्हणून घोषीत करून तारेच्या कुंपणात डांबले. त्यामुळे संपूर्ण भारतात बहुतांशी ठिकाणी बंजारा समाजाची वस्ती (तांडा) डोंगरदऱ्यावर, नापिक जमिनीवर जास्त आढळते. काळानुसार व परिस्थितीनुसार उपजीविकेसाठी जे काम मिळेल ते स्वीकारले. आजही अनेक तांड्यातील बंजारा समाजातील लोक शेती, पशुपालन यांच्या बरोबर उपजीविकेसाठी साखर कारखान्यावर ऊस तोड कामागार म्हणून काम करतांना दिसतात. ऊस तोड काम कमी दर्जाचे किंवा वाईट आहे असे नाही. पण ऊस तोड कामगारांच्या पिढीं पिढी हे काम करीत आहे. यांच्या कष्टाचे चीज का होत नाही. यांची आर्थिक साखर कारखान्यावर परिस्थिती का सुधारत नाही ? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कवी संदीप राठोडचे आई आणि वडील पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोड करण्यासाठी जातात.
तांड्यातील माणूस इतर समाजातील वर्गरचना मानत नाही. कारण तांड्याची स्वंतत्र अशी समाज रचना आहे. स्वत:ला श्रेष्ठ समजला जाणारा या वर्गातही श्रेष्ठ कनिष्ठ अशी रचना आहे. पण ती स्वत:ची आहे. बाहेरच्या समाजाला ती समजत सुध्दा नाही. रोटी बेटी व्यवहाराचा असो वा विधीकर्म असो त्यात फरक जाणवतो. अलिकडे तर वेगळीच वर्गरचना समाजात जाणवते ती बंजारा समाजातही आहे. श्रीमंत व्यक्तीला आदर मान सन्मान जास्त मिळतो. तर गरीबाची फारच हलाकिची परिस्थिती जाणवते. जिवंत राहण्यासाठी केविलवाणी धडपड चालू असते. जीव चिमटीत पकडून, स्वास रोखून रखरखत्या उन्हात म्हणजे खडतर परिस्थितीतही मार्ग काढण्यासाठीची धडपड त्यांच्या पहिल्याच कवितेतून व्यक्त झाली आहे. उदरनिर्वाहाच साधन नसल्यावर किंवा साधनच हिसकावून घेतल्यावर भाकरीसाठी जी वणवण करावी लागते, भटकावे लागते जेव्हा. . .
“ अतृप्त राहिलेल्या आत्म्यांना | जगावं की मरावं |
हेच कळत नाही | भूक छळते तेव्हा . . .”
अंगावर काटा येणारा भयानक असे एकविसाच्या शतकातील वास्तववादी चित्रण संवेदनशील मानवास चिंतन करायला प्रवृत्त मात्र करते. ‘भूख छळते तेव्हा . . .’ मधील बापाचे चित्रण : वेदनांच्या कुळात जन्माला आलेला कवी संदीप राठोड यांचे वडील ऊसतोड कामगार. कष्ट पाचवीलाच पुजलेलं. बीड जिल्ह्यातील पौळाचीवाडा नावाच्या तांड्यात जन्माला आलेला हा कवी. लहानपणापासूनच ऊस तोड कामगाराचा मुलगा असल्याकारणाने त्यांना मुकादमाकडून उचल घेतलेल्या पैशावर कपडालत्ता, खाणपिणं, दुखणंखुपणं सर्व भागवावं लागायचं. हातात कोयता घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी कवीचे वडील लहू तुकाराम राठोड व आई पारूबाई लहू राठोड छाती फुटेस्तोवर काबाडकष्ट करायचे. ऊस तोडतांना पाचटाने कापलेल्या देहातून भळभळणारे रक्त ठसठसणाऱ्या वेदनांची होळी करून चार सहा महिने ऊस तोड करायचे व नंतर पावसाळ्यात कोरडवाहू जमीन करायचे त्यात मध्ये मध्ये दुष्काळ पडायचा. लेकराबाळांच्या ताटातला घास मातीत जाताना पाहणारा आशावादी बाप सरतेशेवटी रिकामे हात पाहून आतल्याआत तीळतीळ तुटायचा. आतड्यांना पडणारा पीळ घालवण्यासाठी भुकेचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठीला पोट चिकटलेला बाप काळजावर दगड ठेवून खाली मान घालून भाकरीच्या शोधात बायको पोरांना घेऊन अनवाणी भटकत राहिला. आपल्या वाट्याला आलेले जीवन आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून अनवाणी पायाने भूक तळहातावर ठेवून फिरत राहिला. शेवटी वडिलांना शेतमजुरीचे काम मिळाले ते निघोज गावात आणि भटकंतीला पूर्णविराम मिळाला.
ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे