‘शिदोरी’ प्रत्येकाच्या जीवनासाठी….हा अनमोल विचार ठेवा!!
कुटुंबातील जेष्ठांचे कष्ट,ध्यास,स्वप्न, नाती, मैत्री, सेवा आणि व्यवसाय यातील अनुभवाचे विश्व पेललेल्या ‘आधारवड’यांना जीवनपथावर सकारात्मकतेने मार्गक्रमण करत असताना, येणाऱ्या अडीअडचणी संकटाच्या हिंदोळ्यावर
आपण कसे वागावे? असे सजगपणे असावे? याचे उत्तम कथाबीज आदर्श वस्तूपाठ म्हणजे ‘शिदोरी, प्रत्येकाच्या जीवनासाठी…’ही जेष्ठांच्या अनुभव समृद्ध विचारांची गाथा सहज सुंदर ओघवत्या शैलीत कथा स्वरुपात रसिक वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.
आदरणीय मित्रवर्य कदम सरांनी अचानक एके दिवशी माझ्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. पुस्तक परिचय मालिकेसंदर्भात संक्षेपाने चर्चा झाली.प्रत्यक्ष भेट नसतानाही आपलेपणाने कौतुक केले.तदनंतर सरांनी शिदोरी हे पुस्तक पोस्टाद्वारे भेट म्हणून पाठविले.ती माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे.सरांच्या ‘शिदोरी’या पुस्तका विषयी वाचनसाखळी समूहातील संयोजक आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक लक्ष्मण जगताप सरांनी,कदम सरांच्या साहित्यकृती विषयी माहिती दिली होती.तदनंतर दोनदिवसापूर्वी मिळालेल्यापुस्तकाचे रसग्रहण करताना विशेष आनंद झाला.
विचारगाथेच्या या ‘शिदोरी’त आपली काळजी घेणारे,सल्ला देणारे,कष्टाची भाकर खाऊन सुखाचा संसार करणारी आणि समाधानाने जीवनाचा आनंद घेत आयुष्य जगणारी वडीलधारी माणसं ‘नायक प्रधान’करण्याचं मौलिक कार्य कथेच्या स्वरुपात व्यक्त केले आहे. आपल्या कुटुंबासारखीच आपल्या नात्याची,शेजारची आणि गावची वडिलधारी बुजुर्ग मंडळी,तीच आपल्या अवतीभवती विचारांनी श्रीमंत असणारी माणसं असतात. तीआई-वडील,आजी-आजोबा, काका-काकी,नाना-नानी,मामा-मामी,शेजारी-पाजारी,सगसोयरे आणि ज्यांचे आपणही अनुकरण करतो. असे सिनेमा व मालिकेतील चरित्र अभिनेते व अभिनेत्री ….अशा गावातील ऋणानुबंध जपणाऱ्या आणि जुळविणाऱ्या नात्यागोत्यातल्या आणि आयडॉल असणाऱ्या व्यक्तिंचे चित्रण वेचकदृष्टीने प्रसंगानुरूप कथेत मांडले आहे.त्यांच्या अंतरंगातील आतल्या आवाजाची, माणुसकीची आणि मदतगारीची ओळख षठ्यब्दी लेखातून अधोरेखित केली आहे.
प्रत्येकाच्या जीवनासाठी अनमोल अश्या भेटीचा ठेवा, आयुष्यभर उपयोगी पडेल असा आहे. शिर्षकनामातच कथेचे बीज आणि आशयघनतेचा सार वाचताना लक्षात येतो.
लेखक प्रा.कुंडलिक कदम यांनी ‘शिदोरी’ पुस्तक आवृत्ती त्यांचे पिताश्री आणि सासूबाई यांना अर्पण केली आहे. कारण या लेखातील आणि कथेतील बीज त्यांना,त्यांच्या सहवासात लाभले आहे.
‘शिदोरी’या विचारगाथेला आणि विचारधारेला डॉक्टर मनोहर जगताप सोमेश्वरनगर बारामती यांची प्रस्तावना लाभली आहे.यात लेखकांची आणि त्यांच्या साहित्य कृतीतील लेखांची ओळख सुंदर शब्दांकनात मांडली आहे.यापूर्वी त्यांनी अनेक वृत्तपत्रात, दिवाळी अंकात, मासिकात चौफेर लेखन केले आहे.त्यांच्या अनेक कथा वाचनाचे सद्भाग्य प्रास्ताविककार यांना लाभले आहे. लेखक प्रा.कदम सर तळेगाव ढमढेरे येथे उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक असून त्यांनी लेखन -वाचणाचा व्यासंग जोपासला आहे.ते सिध्दहस्त लेखक असून उत्तम व्याख्यातेही आहेत. मित्रपरिवार स्नेहीजणांच्या मोहोळात रमणारे ,मैत्रीच्या गोतावळ्यात हवेसे वाटणारे सर!त्यांचा चाहतावर्ग आबाल वृद्धांच्यातही आहे.त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा आलेख दिवसेंदिवस रुंदावत आहे..
“आपल्या अवतीभवती घडलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून सहजपणे विविध विषयांची हाताळणी केली आहे.यातील कथा संस्कारक्षम जगणं,जीवनाची मूल्ये, आणि भारतीय संस्कृतीची नितीमूल्यांची जाणीव निर्माण करुन देतात.त्यांना या कथांमध्ये नातेसंबंध, भावभावनांचे पट आणि काळाच्या ओघात नात्यात,मैत्रित आणि समाजात हरवत चाललेल्या कर्तव्यांची जाणीव अधोरेखित करतात.या कथा तीन पिढ्यांतील अंतर आचरण,वर्तन, प्रेम आणि सलोख्याने घट्ट कसे करावे? याची शिकवण देतात.”समस्त तरुणाईला दिशादर्शक ठरणारा हा ‘विचारांंचा वारसा ‘ शिदोरीत मांडलेला आहे.
प्रसिद्ध लेखक संपादक आणि विचारवंत संदीप काळे, मुंबई यांनी मलपृष्ठावर ‘शिदोरी’या पुस्तकाचे कौतुक अप्रतिम अक्षरवैभवात केलेआहे.त्यातील काही विचार मनाला स्पर्शून जातात. ‘माणुसकी’ च्या गतीला मोजायचे तर माणुसकीचेच डोळस मोजमाप करावे लागते. लेखक प्रा.कुंडलीक कदम यांच्या आचार, विचार आणि लेखणीला ‘डोळस’मोजमापाचा गंध भरभरून चिकटला आहे.सामाजिक चेहऱ्याला समतेची झालर लागली आहे.विचार जागे होवू पाहणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीसाठी अंत:प्रेरणा आहेत.नैतिकमूल्ये,संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची माळ आपल्या सद्विवेक विचारातून गुंफण्याचा हातखंडा यातील कथांमधून रसास्वाद घेताना पानोपानी दिसून येतो.कदम सरांचे लिखाण येणाऱ्या पिढीसाठी डोळसपणा,सकारात्मकता आणि सजगता या ट्रिपल विचारांची लस देणारं आहे.
प्रत्येकाच्या जीवनासाठी अनमोल असणारी ‘शिदोरी’ प्राध्यापक लेखक कुंडलिक कदम सरांनी ओघवत्या व प्रवाही शैलीत मांडली आहे.यातील दृश्य स्थळे ग्रामीण भागातील ओळख करून देतात. गावचे आध्यात्मिक तीर्थक्षेत्र म्हणजे मंदिरं, मंदिरासमोरील झाडाचे पार, जीवनवाहिनी नदी आणि हितगुज साधणारी वडिलधारी बुजुर्ग मंडळी. याचं कथाबीज अप्रतिम शब्दसाजात गुंफले आहे..त्याच कथांची
‘शिदोरी’चा काव्यातून परिचय देण्याचा प्रयत्न…….
शिदोरी,प्रत्येकाच्या जीवनासाठी…
प्रत्येकाच्या सदानंदी जीवनासाठी
सकारात्मक भावविचारांची शिदोरी
जिव्हाळ्याच्या शब्दपालखीत नाचती
शक्तीभक्तीमय चैतन्याचे वारकरी ||
आजी-आजोबा अनुभवांचे व्यासपीठ
आई-वडील सुसंस्कारांचे विद्यापीठ
‘आधारवड’ बुजुर्ग सल्ल्यांचे विचारपीठ
मूल्यांची शिदोरी आधाराचे ज्ञानपीठ||
वडिलधाऱ्या जेष्ठांची मायेची साथ
उकलत जाते समजावण्याची गाठ
कलह रुसण्या अबोल्यावर मात
जीवनात असतात आधाराची वाट||
प्रेरणा कामाची कौतुके मिळते
जेष्ठांच्या कष्टांचे मनी जाणते
संवाद चर्चाने मनमयूर नाचते
सुखसमाधान जीवनात फुलते ||
संवर्धूया गावच्या मातीशी नातंगोतं
त्यातून झळकेल प्रेमाची झालर
सळसळेल प्रेमळ आपुलकीचं नातं
त्यातून फुलेल भावनांचा बहर||
यातील सर्व कथा मनाला भावतात. विचाराला चालना देतात.समाजात घडणाऱ्या घटना प्रसंगांचे सकारात्मक, प्रेरणादायी आणि सृजनात्मक विचार करायला कथा लावतात.स्नेहाचे बोल ह्रदयात, मनात साठवायला उद्युक्त करणाऱ्या छोट्या छोट्या कथा आहेत.त्याकथा विचार मंथन-चिंतन करायला लावतात..
विचाररुपी धन देवून श्रीमंत करणारं अनोखे कथाचित्र आहे.पुस्तकातील कथांचे रसग्रहण सर्वांनाच आपोआपल्या काळीज कप्प्यातील जेष्ठ बुजुर्ग मंडळी आणि आपले आई-वडील यांच्या आठवणी जागृत करणाऱ्या वाटत राहतील. सिनेमा आणि मराठी वृत्तवाहिनीवरील गाजलेल्या मराठी मालिकेतील लोकप्रिय भूमिकाभिनय कलाकारांचे गारुड लोकांच्या मनात अढळस्थान झाले आहे.याचेही लेख वाचनीय आहेत.सद्यस्थितीवरच्या घरघरातील कहाणीचे मार्मिक लेखन ‘मातीचं नातं’आणि ‘पैशाला हवी कष्टाची साथ’या कथेत जाणविले आहे. ऐषरामी जीवन जगणाऱ्या सुखलोलुप तरुणाईंच्या डोळ्यात अंजन घालणारी अप्रतिम कथा आहेत.
आदर्श जेष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे, सुखा समाधानाने जीवन व्यतित करणारे,जिद्दीने जीवनरथ चालविणारे, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत उमेदीने संसारवेल फुलविणारे,आपल्या वर्तन,आचरण, कृती,उक्ती आणि संस्कारातून इतरांना प्रेरणादेणारे, दु:खाचे संकटांचे अगणित चटके धैर्याने आणि व्यवहारी दृष्टिकोनाने सहन करत सामोरे जाणारे.सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वे आपली साधी सरळ भोळी माणसं… कथाकार व.पु.काळे यांचे लोकप्रिय कथासंग्रह ‘मी माणूस शोधतोय’ यातील कथा माणसांचे अनोखे स्वभाव दर्शवितात तर लेखक प्रा. कदम ‘शिदोरी ‘ पुस्तकातील कथांमधून त्याच नात्यागोत्यातील आपल्या माणसांचे कृतीयुक्त अनुकरणीय विचार व्यक्त करतात. त्यांच्या छोट्या कथा रसिकांना वाचकांना मंत्रमुग्ध करतात.अशा वैचारिक मंथन-चिंतन करायला लावणाऱ्या लेखक प्रा. कुंडलिक कदम यांच्या समर्थशाली लेखणीस सलाम आणि त्रिवार वंदन