श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे ते संपविल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून प्रयत्न करणारी ; पण हे संस्कार उपदेश रूपात मुलांना न देता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. आईची महती हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरूजींनी लिहिलेले ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा एक ग्रन्थ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते.