“श्यामची आई” पुस्तक परीक्षण
माझ्या आयुष्यात अभ्यासाच्या पुस्तका व्यतिरिक्त पहिलं पुस्तक श्यामची आई हे वाचलं . “श्यामची आई” हे पुस्तक पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकांच्या लिखाणास प्रारंभ केला. इ.स. १९५३ साली या पुस्तकांवर आधारित असलेला “श्यामची आई” याच नावाचा चित्रपट देखील पडद्यावर झळकला होता. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
“श्यामची आई” हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबददल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकात मांडलेल्या आहेत. ”श्यामची आई” हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरंधन आहे. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्यांच बरोबर संस्कृत व बाळबोध , घराण्यातील साध्या व रम्य संस्कृतीचे चित्र यांत आले आहे.
“श्यामची आई” हे पुस्तक एका आईच्या आणि मुलांच्या निर्मळ नात्यांचं खुप छान अनुभव आहे. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठांतुन नक्कीच बोध मिळतो आणि तो बोध कसा घ्यावा यांची ही शिकवण अगदी उत्तम रित्या मांडली आहे. “श्यामची आई” हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करूण व गोड कथात्मक चित्र आहे . हे पुस्तक प्रवित्र आहे . जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले आहे. आचार्य अत्रे म्हणतात तसं हे पुस्तक म्हणजे “महा मंगल स्त्रोत” आहे. याबद्दल जितकं लिहावे तेवढे कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहिलेल्या या सर्व रात्री गहिवरून आणतात.
यातील प्रत्येक रात्र नवीन कसा अनुभव देते यात एक गंमत आहे. स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यामध्ये सर्वांनाच उपयोग होतो. मुकी फुले ही देवांस आवडतं नाही. पायास घाण लागू नये म्हणून जसा जपलांस तसे मनास घाण लागू नये म्हणून जप सांगणारी आई लुगडे अंथरते तेव्हा डोळ्यात साठलेलं पाणी ओसंडून वाहते. पत्रावळ, भूतदया अशा अनेक कथांनी हे पुस्तक वेली प्रमाणे फुलले आहे. श्यामला पोहता यावे यासाठीचा आईचा आटापिटा, स्वाभिमान, साधेपणा यांची जवळून ओळख होते.
बंधु प्रेमाची शिकवण चिंधी च्या गाण्यातून वाचताना अंगावर शहारे येतात. तर उदार पितृहद्य वाचताना प्रत्येक बापाने केलेल्या कष्टाचे चीज होते असे मी म्हणेन . “सांब शिवा पाऊस दे” बोलणाऱ्या इवल्याशा ओठातून स्वत कोणत्याही गोष्टीसाठी कसे झटावे, कसे आपल्या परीने मदत करावी हेचं दिसून येते. या पुस्तकातील सगळंच अगदी साफ, निरागस मनाने वाचावं असं आहे.
सुखदुःखाच्या पलिकडे जाऊन मातीशी एकरूप झालेल्या अनेक कथां ची ही एक माळ आहे. जी आपल्या मनाला समृद्ध करते. “श्यामची आई” पुस्तकाला आज इतकी वर्षे पूर्ण झाली तरी त्यांची लोकप्रियता अजून तितकीच आहे.