Share

Book Reviewed by
Gaikar Rupali Namdev, TYBCOM, MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik.

पुस्तके ही जीवनाला नवी दिशा प्रदान करतात. पुस्तकांचे एक नवे विश्व असते. आपल्या जीवनात आपल्याला भावलेली व दिपस्तंभ ठरलेली पुस्तके सगळ्यांनी वाचावे असे आपल्याला वाटते. त्याचप्रमाणे असे अनुभव कुणाला सांगताना किंवा ते पुस्तक कुणाला भेट देताना आपल्याला खरोखरंच किती आनंद होतो. मी अनेक पुस्तके आतापर्यंत वाचलेली आहेत. माझ्या वाचनात सर्वप्रथम आलेले पुस्तक म्हणजे श्यामची आई होय. हे पुस्तक मला सर्वाधिक आवडते. श्यामची आई पुस्तकाचे लेखक आहे सदाशिव पांडुरंग साने ज्यांना प्रेमाने लोक’ साने गुरुजी असेही म्हणतात. खरा तो एकचि धर्मजगाला प्रेम अर्पावे असे म्हणून जगाला प्रेम शिकवणारे साने गुरुजी व त्यांची आई खरोखरच किती थोर म्हणावी.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिक तुरुंगात लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचून सगळ्यांचेच डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. यात साने गुरुजींनी स्वतःच्या बालपणीच्या प्रसंगांना गोष्टीत रूपांतर करून यथातथ्य शब्दात वर्णिले आहे.
मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. या पुस्तकाचा प्रारंभच इतक्या प्रभावी शब्दांनी होतो की संपूर्ण पुस्तक वाचण्याची इच्छा मनाला चैन पडू देत नाही. या पुस्तकातील प्रारंभीचा माझे मनपरिवर्तन करणारा उतारा साने गुरुजींच्या शब्दात मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावणांतील कानाकोपऱ्यात असे एखादे रमनीय व सुगंधी फुल फुललेले असेल की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात गोलबंद व पाणेदार मोती असतील की, जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की, जे पल्लेदार दुर्बीणीतून ही अजून दिसलेले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहित असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे ही जाणीव ज्याला होते तो मोठा होत आहे.
अशा उत्तुंग शब्दांनी ही कादंबरी ओतप्रोत भरलेली आहे. या परिच्छेदातून लेखकाचे मन किती मोठे आणि विचार किती थोर आहेत याची जाणीव होते. तसेच लेखकांवर किती चांगले संस्कार झालेले आहेत, हे यातून स्पष्ट होते.
साने गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिलेली आहे मोरोची मावशी हे पुस्तकही छान आहे. हे पुस्तक वाचतांना असे दिसून येते की, श्याम अर्थातच लेखक त्यांच्या आईशी किती जास्त भावनिकरित्या जुळले गेलेले होते. श्यामचे बालपण कोकणातील एका लहानश्या खेडेगावात गेलेले होते. तिथला निसर्गरम्यपणा वाचताना अनुभवताही येईल, इतक्या सुंदर शब्दांत साने गुरुजींनी वर्णन केले आहे.
आजकाल आपण वर्तमाणपत्रात अनेक बातम्या वाचतो, जास्तीत जास्त आत्महत्येच्या बातम्या असतात. आणि आत्महत्या करणाऱ्या मुलांचे वय हे १२ ते १६ वयोगटातील असते, अशा बातम्या वाचल्या की मन खिन्न होते. परवाच्याच वर्तमानपत्रात ब्ल्यू व्हेल या गेम मुळे मुंबईतील एका मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त वाचले, फार वाईट वाटले. मुलांना योग्य वयात चांगले संस्कार मिळणे फार महत्वाचे असते. कमीत कमी या गोष्टीसाठी तरी हे पुस्तक एक चांगले मार्गदर्शक ठरू शकते.
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे या पुस्तकात साने गुरुजींनी त्यांच्या आईची थोरवी गायिली आहे. अब्दुल कलाम म्हणतात, मुलांना घडवण्याची जबाबदारी ही आई- वडील व शिक्षक यांच्यावर असते. त्यांच्या कोवळ्या मनाला आकार देण्याचे काम हे करत असतात. तसेच लहानपणी मुलांचा आदर्शही हेच असतात. त्याचप्रमाणे मुलांचीही भूमिका ही कृतज्ञ राहणे हीच असते. अनंत उपकार असतात, त्यांचे आपल्यावर हे आजन्म विसरायचे नसते. आजकाल, आपण सर्रास आईवडिलांचा अपमान करणारी मंडळी बघतो, तसेच उच्चशिक्षित वर्गही आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. मात्र, ही परिस्थिती बदलायला हवी.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी खरोखरच या उक्तीप्रमाणे तिन्ही जगांचा स्वामी ही आईविना भिकारी असतो. याचे वर्णन करणारे पुस्तक म्हणजे श्यामची आई होय. अशाप्रकारे, हे पुस्तक उत्तमप्रकारे संस्कार कसे देता येऊ शकतात याचेही वर्णन करते. मुलांवर आईवडिलांचे अपार प्रेम असते, परंतु त्या प्रेमामुळे म्हणजेच अतिप्रेमामुळे मुले बिघडणार असतील तर त्याचा काहीही उपयोग नसतो. श्यामची आई फार प्रेमळ व प्रसंगी कठोरही असायची. यामूळेच तीने श्यामला घडवले, संस्कारक्षम केले. आणि समाजाच्या उपयोगीही आणले.
मी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला सगळयांना देते. माझ्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी हे पुस्तक वाचले आहे. माझी आई थोडीशी हळवी आहे, त्यामुळे शेवटी वाचताना ती ढसाढसा रडायला लागली. अशा प्रकारे हे पुस्तक हृदयाला भेदुन टाकते. मला हे पुस्तक वाचायला कधीही आळस किंवा कंटाळा येत नाही. काही परिच्छेद तर अगदी तोंडपाठ आहे. मी हे पुस्तक लहानपणी वाचले होते परंतु अजूनही ते पुस्तक मला घडवीत आहे. माझ्या विचारांना विस्तीर्ण करते. त्यामुळे जरीही या छोट्या छोट्या गोष्टी असल्या परंतु मेंदूला व मनाला शुद्ध करून मला त्यांनी एक प्रेरणा मिळते. त्यामुळे ‘ श्यामची आई ‘ हे पुस्तक मला अधिक आवडते. आणि माझे आवडते पुस्तक श्यामची आई असे मी अभिमानाने सांगते.

Recommended Posts

The Undying Light

Yogita Phapale
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Yogita Phapale
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More