नाव :- वैष्णवी शहाजी पवार,(M.Sc. Bioinformatics)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे .
“सनातन धर्म – सर्व विज्ञानाचा खऱा स्रोत” हे पुस्तक लेखक विवान करुळकर यांनी लिहिले असून, सनातन धर्माच्या शाश्वत तत्त्वज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडणारा एक गहन व प्रगल्भ विचार प्रस्तुत करते. या पुस्तकात लेखकाने सनातन धर्म आणि त्याच्या वेदांतील शास्त्रीय ज्ञानावर सखोल प्रकाश टाकला आहे आणि हे ज्ञान कसे आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांसोबत जोडले जाऊ शकते हे स्पष्ट केले आहे.
लेखकाचा मुख्य युक्तिवाद असा आहे की पाश्चात्य सभ्यतेने जे ज्ञान प्राप्त केले आहे, ते खरेतर आधीच वेदांमध्ये आहे. हे पुस्तक हे दर्शवते की, वेदांमध्ये हजारो वर्षांपूर्वी जे शास्त्रीय तत्त्वज्ञान मांडले गेले, तेच आजच्या विज्ञानाच्या मुलभूत सिद्धांतांशी साम्य दर्शविते. लेखक हे सिद्ध करतात की न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतापासून ते डेमोक्रिटसच्या अणु संकल्पनेपर्यंत अनेक शास्त्रीय शोध वेदांत आधीच आढळून येतात. ऋग्वेदातील श्लोकांचा संदर्भ घेत लेखक हे दर्शवितात की त्या काळातच विज्ञानाच्या गूढ संकल्पनांवर चर्चा झाली होती.
उदाहरणार्थ, लेखक ऋग्वेदातील १०:१४९:१ श्लोकाचा उल्लेख करतात, जो न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताच्या आधीच गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान देतो. तसेच, १०:८२:३ श्लोकातील अणु संकल्पनाही डेमोक्रिटसला माहिती होण्याआधीच विद्यमान होती. या संदर्भात लेखक यावर विचार करतात की पाश्चात्य सभ्यतेने जे ज्ञान ‘नवीन’ म्हणून मांडले, ते प्रत्यक्षात वेदांमधून घेतले गेले होते.
हे पुस्तक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांची दृषटिकोनं एकत्र करून प्राचीन भारतीय ज्ञानाचे एक सशक्त प्रस्तुतीकरण करते. लेखक विवान करुळकर हे ठामपणे सांगतात की वेद आणि त्याच्या ज्ञानामध्ये असलेल्या शास्त्रीय संकल्पनांबद्दल आपल्याला अधिक सखोल माहिती मिळाल्यास, त्याचे विज्ञानाशी असलेले नाते समजून घेतल्यास, भारतीय ज्ञान परंपरेला संपूर्ण जगाला समजून देण्याचा मोठा मार्ग मोकळा होईल.
स्वामी विवेकानंदांच्या “वेदांकडे चला” या संदेशाचा संदर्भ घेऊन लेखक पुस्तकात सांगतात की, वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाचा समृद्ध अभ्यास करून मानवतेला एक नवीन दिशा दिली जाऊ शकते. विवेकानंदांच्या दृष्टिकोनावर आधारित, हे पुस्तक आधुनिक काळातील वाचकांना प्राचीन भारतीय शास्त्राची गूढता समजून देण्याचा प्रयत्न करते.
पुस्तकाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ते वेदांमधील ४६ वैज्ञानिक संकल्पनांचा सुस्पष्ट आणि प्रमाणित ऊहापोह करते. लेखकाने यासाठी विविध संदर्भ आणि उदाहरणांचा वापर केला आहे, ज्यामुळे वाचकाला या ज्ञानाची शास्त्रीय पद्धतीने खरी अशी समज मिळू शकते. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक पाश्चात्य सभ्यतेच्या विज्ञानाला एक वेगळ्या दृषटिकोनातून पाहण्याचे आव्हान करतात.पुस्तकाची भाषा साधी आणि वाचनीय आहे, तरीही शास्त्रीय विचारांना स्पष्टपणे मांडताना ते ज्ञानाच्या गूढतेला सहजपणे उलगडते. वाचनकर्ता हा पुस्तक वाचताना भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व आणि त्यातील वैज्ञानिक तत्त्वज्ञानाच्या संदर्भातील सत्यता समजून घेऊ शकतो.
लेखक काही ठिकाणी साधारण अर्थाने शास्त्रीय सिद्धांत आणि प्राचीन तत्त्वज्ञान यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न करते, जेव्हा कधी काही तुलनाआंकीत मुद्दे थोडे अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतात. काही वेळा, लेखक एक विशिष्ट संवाद किंवा विचार देतो, जे आधुनिक शास्त्राच्या अधिक ठोस आणि पद्धतशीर विवेचनापेक्षा वेगळे असू शकते. यामुळे काही वाचकांना पुस्तकाच्या दाव्यांचा विश्वास ठेवणे थोडे कठीण होऊ शकते. काही वाचकांना असे वाटू शकते की लेखकाने एकतर्फी दृष्टिकोन मांडला आहे.
अखेर, “सनातन धर्म – सर्व विज्ञानाचा खऱा स्रोत” हे पुस्तक वेदांतून मिळालेल्या शास्त्रीय ज्ञानावर आधारित एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक कृति आहे. लेखक विवान करुळकर यांनी या पुस्तकात जो संदेश दिला आहे, तो आपल्याला वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानाच्या दृषटिकोनातून सनातन धर्माच्या महत्त्वाची पुनर्रचना करण्याची प्रेरणा देतो. हे पुस्तक निश्चितच वाचकांना प्राचीन भारतीय ज्ञानाची शास्त्रीय दृष्टिकोनातून दखल घेण्यास प्रवृत्त करेल.