Share

“एक भाकर तीन चुली” संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे. गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका खंबीर स्त्रीचा अनुभव, तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, स्त्रीच्या जीवनातील जगताना येणाऱ्या अनुभवांचे भयान वास्तव मांडणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे.
पारु ची लढण्याची जिद्द,बापाचा हळवेपणा, आईचा जिवाला लागणारा घोर,काळजी, रूढी , सामाजिक परंपरा एका बाईला जगण्यासाठी किती आणि कशाप्रकारे घातक आणि बाधक ठरतात याची असंख्य उदाहरणे यामध्ये दिली आहेत.अठरा विश्वदारिद्र्य असेल तरीही मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी पडेल ते कष्ट करण्याची धडपड,पुरुषप्रधान संस्कृतीशी तिने दिलेला लढा ‘पारू’ या पात्रातून रेखाटलेला आहे. पारूच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे आळ सहन नाही झाला म्हणून तिने घेतलेला दुर्गेचा अवतार यामुळे ठेचला गेलेला पुरुषी अहंकार तिच्यात ऊर्जा निर्माण करून तिला कणखर बनण्यास प्रवृत्त केले. मुलांच्या आयुष्यासाठी संसाराची राख रांगोळी करून ती काळजावर दगड ठेवून लेकरांना सोडून जाण्याचा निर्णय जसा की वासरापासून वेगळ्या झालेल्या गाई सारखा वाटत होता.
समाजातील जातिभेदांच्या भिंती दूर करून माणसाने माणूस म्हणून दुसऱ्यांना कसं वागून घ्यावं याविषयी वाटणारी तळमळ कुठेतरी जातिभेद संपुष्टात आणण्यासाठी केलेला विचार मनाला आशावादीत करून जातो असा संदेश या पुस्तकातून होत आहे. पारूची शिक्षणाविषयी विचारांची रीत नवीन पिढीला अंगिकारण्यासारखी आहे. शिक्षण घेतलेच पाहिजे शाळेचा खर्च भागविण्यासाठी पोटाला दिलेला चिमटा आईची शिक्षणाविषयीची तळमळ सांगून जातो. शिकण्यासाठी आपल्या काळजाच्या तुकड्याला परगावी दूर पाठवताना हळवी पारू काळजावर दगड ठेवून उभी राहते.
सदर पुस्तकातून लेखक, देवा झिंजाड यांनी पारू नावाच्या एका स्त्रीला खूप द्वेषाचा सामना करावा लागतो पण तरीही ती आपली प्रतिष्ठा आणि ताकद टिकवून ठेवते. कथेत तिचा संघर्ष आणि ती तिच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कशी सामोरे जाते हे दाखविले आहे स्त्री म्हणजे केवळ उपभोगाचे साधन आहे. तिला काडीची किंमत नाही, जनावराप्रमाणे तिचे शारीरिक व मानसिक छळ अपमान, तिची कुस उजवली तरच तिच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हटले जाते. समाजाच्या प्रतिष्ठेपुढे पोटच्या लेकीची मदत करू न शकणारे हतबल झालेले आईबाप व अहंकाराने भरलेले सासरचे कुटुंब याने पारू या पात्रातून एका स्त्रीची झालेली वाताहात यावर टाकलेला प्रकाशझोत या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. पारूच्या आयुष्याचे हे समीकरण कशा पद्धतीने गुंतागुंतीचे तिच्या वरील द्वेषापोटी मांडले गेले आणि ती खंबीरपणे आपला स्वाभिमान आणि चारित्र्य सांभाळून तिने या सर्वावर कशा पद्धतीने मात केली अशा संघर्षमय स्त्रीचे वर्णन देवा झिंजाडे यांनी काल्पनिकतेतून वास्तवात मांडलेले आहे. लेकरापैकीचा तुटणारा जीव, हाताबाहेर झालेली परिस्थिती आणि तिची परवड डोळ्यात पाणी आणणारी व्यथा रेखाटलेली आहे. या संपूर्ण लेखनातून असे दिसून येते की आजही स्वातंत्र्यानंतर स्त्री वरील अत्याचार आणि अन्याय जुलूम थांबणार आहेत का? स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा अधिकार फक्त कायद्यातच असणार आहे का? अशा असंख्य अशा प्रश्नावर विचार करायला लावणारी कादंबरीतील जिद्दीने लढा देणारे आई व तिच्या व्यथा मांडून पुस्तक रूपे ऋण फेडणाऱ्या तिच्या कष्टाचं चीज करणाऱ्या आईच्या संवेदनशील प्रतिभावंत जगण्यातून मार्ग काढणाऱ्या स्त्रीवर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीतून लेखक देवा झिंजाड यांनी केला आहे.

Related Posts

Pawar Anuj Dipak

Yashoda Labade
Shareसंगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – पवार अनुज...
Read More