Mr. Vikas Bansode , Librarian, SKN Sinhgad School of Business Management Pune
“एक भाकर तीन चुली” या कादंबरीचे लेखक देवा झिंजाड हे आहेत. या कादंबरीची पहिली आवृत्ती २४ डिसेंबर २०२३ ला प्रकाशित झाली. त्यानंतर त्याच्या तीन आवृत्ती प्रकाशित झाल्या. त्याची आता चौथी आवृत्ती १ मे २०२४ रोजी प्रकाशित झाली.
या कादंबरीला आजपर्यंत सात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ही कादंबरी वाचनासाठी निवडण्यामागचे कारण मला ग्रामीण लेखनशैली खूप आवडते. त्यातच एक भाकर तीन चुली ही कादंबरी वाचण्याचा योग आला.
या कादंबरीमध्ये जात वास्तव, ग्रामीण,कष्टकरी शोषित, उपेक्षित,अन गांजलेल्या स्त्रीचे जगणं अतिशय प्रकर्षाने मांडले आहे.
समाजामध्ये पेरलेले जातीय विष, पूर्वपार चालत आलेली भाऊबंदकी आणि स्त्रीला समाजामध्ये मिळणारी अवहेलना या सर्वावर मात करून जिद्दीने समाज व्यवस्थेच्या छातीवर पाय ठेवून उभे राहिलेल्या एका खंबीर स्त्रीची कहाणी या कादंबरीमध्ये देवा झिंजाड यांनी लिहिली आहे.
लेखकानी त्यांच्या आईच्या परवडीचे भयान वास्तव मांडणारी आत्मचरित्रात्मक अशी हि कादंबरी आहे.
या कादंबरीमध्ये मुलगी जन्माला आली म्हणून आजोबांनी दिलेला त्रास,बालविवाह,सासरी होणारा छळ, लग्न झाल्यानंतर एका महिन्यामध्ये आलेले विधवापण अशा अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागल्यानंतरही कोणापुढे हात न पसरता एकट्याने लढणारी स्त्री या कादंबरीची नायिका आहे. त्या नायिकेचे नाव पारू असे आहे.
समाजाने हिनवल, निंदानालस्ती केली तरी त्या सर्वावर मात करून पारूने पोटासाठी,पोटच्या मुलासाठी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता कठीण परिस्थितीस तोंड दिले. रडत न बसनारी त्याला तोंड देत राहणारी आणि समाजात जगत असताना एकट्या बाईला काय भोग भोगावे लागतात याचं उदाहरण पारूच्या रूपाने या कादंबरीमध्ये प्रकर्षाने मांडले आहे.
या कादंबरीचे लेखन ज्या काळातील आहे त्याकाळी बालविवाह ही प्रथा होती. ज्यावेळी पारू चे लग्न झाले त्यावेळी तिचे वय फक्त दहा वर्षाचे होते आणि तिचा नवरा वयस्कर होता त्याचे नाव दगडू असे होते.तो सतत पारूवर संशय घेत असे पण त्याचा एकच महिन्यामध्ये मृत्यू झाला त्याचे खापर पारूवरती आले.
पारूचे बालपण करपवून टाकणाऱ्या अशा अनेक घटना तिच्या लहान वयामध्ये घडून गेल्या. तिला लहान वयातच वैधव्य आल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी समाजाचा विरोध डावलून दुसरं लग्न लावून दिले पण त्या नवऱ्याच्या पहिल्या तीन बायका मरलेल्या असतात अशा शहाजी या पुरुषाशी तिचे लग्न लावून दिले. त्याच्याशी काही वर्ष संसार केल्यानंतर त्याचाही मृत्यू होतो. त्यानंतर तिची परत परवड चालू होते पण त्याही गोष्टीला ती कणखरपणे तोंड देऊन उभी राहते.
त्यानंतर तिचे काही कालावधीमध्ये तिसरे लग्न होते. तिसरा संसार,तिसरे गाव तिची भटकंती काही करून थांबत नाही. तिसऱ्या नवऱ्यापासून एक मूल जन्माला येते.
त्यावेळी पारूला वाटलं आपल्या आयुष्यामध्ये आता काहीतरी उजेड येईल पण परिस्थिती अगदी बिकट असल्यामुळे जगण्याची वणवण काही थांबत नव्हती.
आयुष्याच्या लढाईमध्ये वारंवार खचण्याचेच प्रसंग येत असतानाही त्यातून जिद्दीने मार्ग काढणाऱ्या आणि परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या पारूची असामान्य प्रतिमा या कादंबरीमध्ये लेखकाने अतिशय प्रकर्षाने मांडले आहे.गाव- खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिम्मत हा या कादंबरीचा गाभा आहे.
ग्रामीण आणि मुक्त संवादामुळे कादंबरीत
अतिशय परिणामकारकता साधली आहे. माणसांमधील माणूस लेखनातून जागा झाला पाहिजे या बाबीचा विचार केल्यास देवा झिंजाड यांची ही “एक भाकर तीन चुली” हि कादंबरी अतिशय विलक्षण आहे यात तीळमात्र शंका नाही.