Reviewed by: Dr. Nana Zagade, Professor, Dept of Marathi (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)
‘द इंडियन्स’ या डॉ.गणेश देवी, टोनी जोसेफआणि रवी कोरीसेट्टर यांनी इंग्रजीत संपादित केलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर आणि ज्ञानदा आसोलकर यांनी केला असून मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भाषावैज्ञानिक असलेल्या डॉ.गणेश देवी यांनी जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या १०० तज्ञांकडून १०५ अभ्यासपूर्ण लेख लिहून घेऊन ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध केले आहेत. या पुस्तकात ‘इंडिया’ या शब्दाची व्याप्ती स्पष्ट करताना ‘इंडिया’ म्हणजे दक्षिण आशिया अशी करण्यात आली आहे. हिमनग संपल्यापासून (होलोसीन काळ) ते इ. स. २००० पर्यंतचा म्हणजेच साधारणपणे बारा हजार वर्षांच्या माणसाच्या गुहेत राहणाऱ्या रानटी अवस्थेपासूनच्या आजपर्यंच्या प्रवासाची स्थित्यंतरे नोंदवत माणसाने निर्मिलेल्या समाज, संस्कृती विषयक प्रागतिक परिप्रेक्षातून इतिहासाची मांडणी केली आहे.
या ग्रंथात भारतातील समाज आणि संस्कृती यांचा विकास, वैदिक वाङमय, बौद्ध, जैन वाङमय आणि पाली व प्राकृत भाषांचा विकासाचे टप्पे नोंदवले आहेत. येथील हडप्पा-मोहेंजोदडो – सिंधू संस्कृती येथील विविध धर्म व धर्मग्रंथ यांचा एकमेकांवर पडलेल्या प्रभाव आणि परस्पर संबंधाविषयीचे प्रागतिक परिप्रेक्षातून चिकित्सक विश्लेषण केले आहे. हे पुस्तक सात विभागात विभागलेले आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात दक्षिण आशियातील मानवाची उत्क्रांती त्यांचे स्थलांतर आणि हवामानाचा भारतीय लोकवस्तीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आहे. दुसऱ्या भागात वनस्पती, प्राणी आणि इतर घटकांच्या पालन-पोषणाद्वारे प्रदेशातील विविध सभ्यतेच्या आणीबाणीवर होणारा परिणाम आणि या सभ्यतेचा ऱ्हास कसा होतो यावर लक्ष केंद्रित केले आहे. तिसऱ्या भागात प्राचीन भारत, बौद्ध धर्म, जैन धर्म, संस्कृत, इंडो-इराणी भाषा आणि पाली साहित्य इत्यादींची व्याख्या करणाऱ्या भाषा आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आहे. चौथ्या भागात उत्तर दक्षिण, उत्तर पूर्व, दख्खन पूर्व आणि पश्चिम भारत यातील विविध भौगोलिकता तसेच समाज आणि संस्कृतीचा अभ्यास आहे. पाचव्या भागात वसाहतवादाचे आगमन आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, सामाजिक बांधणी आणि ज्ञान प्रणालीवर होणारा परिणाम याची चर्चा आहे. सहाव्या भागात आदिवासी चळवळी, आंबेडकरी राजकारण, गांधीवादी प्रतिकार आणि स्वतंत्र प्रजासत्ताकाची पायाभरणी करणाऱ्या इतर घटनांची चर्चा करतो. आणि शेवटी सातवा भाग समकालीन भारताकडे पाहतो. संविधानाचे कार्य आणि शहरीकरण, उदारीकरण आणि आधुनिक भारतीय अनुभवाचे विविध पैलू दर्शवतो.
या ग्रंथातील सर्व अभ्यासक त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांनी संशोधन हे शास्त्रीय स्वरूपाचे आहे. ससंदर्भ पुराव्यांमध्ये या संशोधनाला मूल्य प्राप्त झाले आहे. अनुवादकांनी मूळ इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद करताना ऐतिहासिक, सांस्कृतिक व भाषिक संदर्भ अतिशय मौलिक पद्धतीने हाताळले आहेत. सांस्कृतिक अनुवाद करताना भाषिक मर्यादा येत असतात पण हे पुस्तक वाचताना हा अनुवाद असे वाटत नाही. तात्विक विषय वाचकाला वाचनीय वाटतो हे अनुवादकांचे यश आहे.
“भारताच्या भूतकाळातील एकूण एक कालखंड इथे ग्रथित झाले आहेत, असे आम्ही दूरान्वयानेसुद्धा सूचित करू इच्छित नाही. तसा दावा करणे अशक्य आहे कारण ती असाध्य गोष्ट आहे. सतत चालू राहावे असे हे काम आहे. थोड्या थोड्या कालांतराने यातील विषयांची पुनर्मांडणी, दुरुस्ती आणि सुधारणा करत राहायला हवी. अतिरेकी विभाजक शक्तींनी भारतीयांच्या मनाचा ताबा घेऊन, लोकांची एकजूट साधणाऱ्या संविधानाला क्षती पोहोचवू नये म्हणून हे काम आवश्यक आहे.” असे मत या ग्रंथाचे संपादक गणेश देवी अतिशय प्रांजळपणे व्यक्त करतात.
“मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, भटका-अन्नसंकलन व पशुपालन करणारा समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम दडलेला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासूनच भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्त्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे. काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपले घर बनवण्यास प्राधान्य दिलेले आहे. परिणामी युगानुयुगे ‘बहुसांस्कृतिकता’ हा इथला स्थायीभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडील काही वर्षांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून-तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचे दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. ‘फेक नरेटीव्हज’ रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या सहाय्याने भारताच्या तब्बल बारा हजार वर्षांच्या गतकाळाचे अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा ‘द इंडियन्स’ हा ग्रंथ अतिशय प्रस्तुत ठरणारा आहे.
‘द इंडियन्स’ हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये जगभरातील सुमारे शंभर एक अभ्यासकांनी आपले योगदान दिलेले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण याप्रति सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा अलीकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.” हा ग्रंथाच्या मलपृष्ठावरील अभिप्राय या ग्रंथांची प्रस्तुतता अधोरेखित करणारा आहे.
‘द इंडियन्स’ हा ग्रंथ भारताच्या अनेक सहस्रकांचा समग्र इतिहासाचे चिकित्सक दर्शन घडवतो. ‘इंडियन’ या शब्दाची व्याप्ती स्पष्ट करून ‘भारतीयत्वा’ची संकल्पना विशद करतो. या ग्रंथात मनुष्य, समाज, संस्कृती, धर्म, इतिहास, भाषा आणि प्रांत अशा घटकांची तर्कसंगत व शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बहूसांस्कृतिक भारताच्या ज्ञान परंपरेचा प्रागतिक परिप्रेक्षातून परिचय करून देणारा हा मौलिक ग्रंथ आहे.