गोविंद श्रीपत साबळे (Student)
SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY
SATPUR, NASHIK
नटसम्राट
लेखक- (कुसुमाग्रज) वि.वा. शिरवाडकर
नटसम्राट हे मराठी साहित्यातील एक कालजयी नाटक आहे. या नाटकाचे लेखक कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर हे मराठी साहित्यातील महान कवी कथाकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. नटसम्राट म्हणजेच “नाटकांचे सम्राट” ज्याने रंगभूमीवर आयुष्यभर लोकांना हसवले,रडवले, पण ते स्वतः मात्र शेवटी एकाकी आणि दुःखी राहिले अशी हृदयस्पर्शी कथा या नाटकात आहे. या नाटकाचा नायक गणपतराव बेलवळकर हा एक श्रेष्ठ रंगभूमीवरील कलाकार आहे. अभिनयाच्या जगात त्यांनी प्रचंड कीर्ती मिळवली, पण निवृत्तीनंतर त्यांचे आयुष्य दुःखमय बनते. आपल्या मुला-सुना कडून अपमान आणि उपेक्षा सहन करत तो पत्नी कावेरी सह दुःखाच्या गर्तेत जातो. शेवटी दोघेही एकाकी पणाने ग्रासले जातात.
कुसुमाग्रजांनी या नाटकातून वृद्धत्व, मानवी स्वाभिमान, कुटुंबातील मूल्ये आणि जीवनातील वास्तव यांचे प्रभावी चित्रण केले आहे. नटसम्राटचे संवाद हे मराठी रंगभूमीवरील अमर ठेवा आहे.
आयुष्य रंगभूमी आहे आणि आपण सगळे कलाकार असा संवाद आजही प्रत्येक वाचकाला विचार करायला भाग पाडतो.
या कादंबरीचा मध्यवर्ती विचार खूप गहिरा आहे नटसम्राट हे नाटक फक्त एका नटाचं आयुष्य नाही तर एका कलाकाराच्या अंतर्मनाची यात्रा आहे. ती आपल्याला शिकवते की आपली कला आणि आयुष्य यांचा मेळ कसा घालायचा तसेच वृद्धापकाळातील एकटेपणा, कुटुंबातील अपेक्षांची तूट आणि समाजाचा दृष्टिकोन यांचा विचार आपल्याला अंतर्मुख करतो लोकांच्या टाळ्या या कलाकाराच्या आयुष्याचा आत्मा असतात पण तो आत्मा गेला की बाकी फक्त स्मशान उरतं ही गणपतरावांची ओळख आपल्याला थेट अंतकरणाला भिडते. त्यावेळी त्यांच्या वेदना केवळ त्यांच्याच नसतात ती प्रत्येक कलाकाराची कहाणी बनते. “कोणी घर देत का?”ही ओळ एक वृद्ध व्यक्तीच्या हृदयात उमटलेली शोकात्मिका ओळ आहे. जेव्हा आपल्या जीवनात सगळं काही गमावलं जातं आणि समाज तुम्हाला विसरतो तेव्हा या साध्या शब्दातून व्यक्त होणारी वेदना शब्दात मांडता येणे अशक्य असतं. ही ओळ आपल्याला माणुसकीला गहिर्या पातळीवर थेट भिडते. ती आपल्याला विचार करायला लावते, की “आम्हा वृद्धांना कसा वागवतो? त्याचं आयुष्य काय जणू काही फुकट आहे का ?”
नाटक हे रम्य काव्य आहे म्हणून इतर साहित्य प्रकाराप्रमाणे चांगले नाटक हे वांग्मययीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा प्रयोग आहे
विषय आणि मध्यवर्ती कल्पना- हे नाटक “नटसम्राट” या पद्धतीने ओळखल्या जाणाऱ्या एका महान कलाकाराच्या जीवनातील दुःखद शोकांतिका आहे.
शेक्सपियरचा प्रभाव- नटसम्राट नाटकावर शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकाचा प्रभाव दिसून येतो, कारण यातही पित्यांची मुलाकडून होणारे हाल आणि नियतीचा खेळ चित्रित केला आहे मात्र कुसुमाग्रजांनी त्याला मराठी मनाचा पदर देत एक वेगळी आर्तता दिली आहे.
साहित्यिक मूल्य- नटसम्राट हे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नाटक असून ते कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचे प्रतिक आहे.
अभिनयाची चमक- या नाटकाचा पहिला प्रयोग 1970 साली झाला आणि तेव्हापासून अनेक कलाकारांनी या भूमिकेला न्याय दिला आहे. श्रीराम लागू आणि नाना पाटेकर यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. नाटकातील भाषाशैली अत्यंत प्रभावी काव्यात्मक आणि भावनांनी परिपूर्ण आहे. प्रत्येक प्रसंगात लेखकाने सामाजिक भान आणि मानवी मनाचे गहिरे निरीक्षण जाणवते. या नाटकावर आधारित चित्रपट नाना पाटेकर यांच्या अभिनयात देखील प्रचंड लोकप्रिय झाला. एकूणच नटसम्राट हे फक्त एक नाटक नसून आयुष्याचा आरसा आहे. ते आपल्याला सांगते की कीर्ती,पैसा आणि सन्मान हे क्षणभंगुर असतात पण मानवी मूल्य आणि आत्मसन्मानच खरे शाश्वत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने हे नाटक वाचून जीवनाचा अर्थ आणि नात्यांचे खरे महत्त्व समजून घ्यावे.
