प्राणी, वनस्पती, आदिवासी जीवन अशा एका वेगळया जगात आपल्याला घेउन जाणारे पुस्तक

Share

Reviewed by: Dr. Savita Kulkarni, Head, Dept of Geography (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)

जंगलामधील जीवन कसे असते? त्यांची संस्कृती ही पर्यावरणाशी कशी
जोडलेली आहे याची कल्पना दटा हंकाट – चला चालायला सुरूवात करू या श्री. किरण
पुरंदरे यांच्या पुस्तकावरून करता येते. वसंत पब्लिकेशन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले
असून त्याची प्रथम आवृत्ती आॅक्टोबर 2016 मध्ये आली पुस्तक अतिशय लहान 84
पानांचे असूनही मनाची पकड घेते आणि जंगलातील जगामध्ये आपल्याला घेउन जाते.
आदिवासी समाज आणि त्याचे पर्यावरणाशी असणारे नाते याचा उलगडा या पुस्तकातून
होतो. लेखनाची कोणतीही वैशिष्टयपूण शैली न वापरता आपले अनुभव सहजपणे मांडलेले
आहेत. त्यामुळे ते आपल्या जवळचे असल्याचे जाणवते. दटा हंकाट या वेगळया शब्दामुळे
पुस्तकाविषयीचे कुतूहल जागे झाले आणि जंगल, आदिवासी आणि त्यांचं जीवन जवळून
अनुभवायला मिळेल असे वाटल्याने पुस्तक हातात घेतले. महाराष्ट्रातील गोंदिया आणि
भंडारा जिल्हयांमध्ये विभागलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये चार
अभयारण्ये आणि एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो. यापेकी भंडारा जिहयातील
साकोली तालुक्यातील पिटेझरी हे एक छोटं गाव. या गावातील बहुतेक सर्व लोक गोंड
आदिवासी आहेत. या गावामध्ये त्या लोकांबरोबर त्यांच्यामधील एक होउन 400 दिवस
मुक्काम केल्यावर तेथील जीवन लेखकाला कळले आणि ते अनुभव या पुस्तकाच्या रूपाने
मांडलेले आहेत. हा अनुभव हवाहवासा वाटल्याने पुन्हा एकदा आदिवासींबरोबर लेखक
राहण्यास गेले असताना हे अनुभव त्यांनी पुस्तकरूपाने कथन केलेले आहेत. दैनंदिन गरजा
सहजपणे भागणा-या, सुखासीन आयुष्य जगणा-या माणसाला जंगलात राहताना स्वतःच्या
सवयींमध्ये बदल घडवून त्या लोकांशी समरस होउन निसर्ग कसा जवळून अभ्यासता आला
याचाही अनुभव लेखकाने यात मांडलेला आहे.
सारांश – नागझि-याचे जंगल हे आपली कर्मभूमी मानून तिथे राहून खूप फिरून,
आदिवासींना जवळून न्याहाळत परिश्रमपूर्वक लेखकांने माहिती गोळा केलेली आहे. या
दिवसात सुरवातीला आलेले अनुभव आणि नंतर पिटेझरी गावक-यांनी आपलं
मानल्यानंतरचे दिवस याविषयीचे सहज अनुभव यात मांडलेले आहेत. हे करत असताना
आदिवासी समाजाच्या अनेक अंधश्रध्दा कशा चुकीच्या आहेत आणि पशू पक्षी, जंगल संवर्धन
किती महत्त्वाचं आहे हे तेथील लोकांना लहान लहान गोष्टींतून दाखवून दिलेले आहे.
त्यासाठी छोटे मोठे उपक्रम करून तेथील लोकंाच्या आनंदात दुःखात सहभागी होउन
त्यांना जमेल तेवढी मदत करण्याच्या उददेशाने केलेले वास्तव्य अतिशय सहज सोप्या भाषेत
लेखकाने मांडलेले आहे.
विश्लेषण – पुस्तक जंगलातील जीवनाविषयी असल्याने प्राणी, पक्षी यांचा उल्लेख सतत
आलेला दिसतो. यामध्ये साप, कीटक, सापसुरळी, नागतोडे यांचा उल्लेख, विरळा शिंगळा,

दयाळ, पटटेरी पिंगळा, घुबडाला दिलेले जीवनदान, शृंगी घुबड, यांचा वार्षिक खाद्य
आकृतीबंध, उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची त्याची भूमिका असा पर्यावरणीय
अभ्यास दिसतो तर मण्यार, घुबड या विषयीचे अनुभव यामध्ये कथन केलेले आहेत.
आदिवासींचे जीवन सुलभ कसे होईल याचा विचार, घुबडाकडे माणसाचा बघण्याचा
दृष्टीकोन हा भिती आणि नकारात्मक आहे परंतू घुबड किती महत्त्वाचे आहे आणि त्याचे
संवर्धन करणे कसे आवश्यक आहे याची माहिती लेखकाने यामध्ये दिलेली आहे. पक्षांना
पाणी पिण्यासाठी केलेल्या टाक्यांमध्ये पक्षी पडतात म्हणून तयार करण्यात आलेली
जलकुंड, पक्षांचे फोटो टिपण्यासाठी, त्यांचा अभ्यासक करण्यासाठी तयार केलेली लपणं
अशा विविध गरजेच्या उपक्रमांची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ज्या जंगलात
30000 पेक्षा जास्त लोक येतात त्या जंगलाला लागून असलेल्या गावातील मुलांनीची जंगल
पाहिलेलं नाही हे लक्षात आल्यावर त्यांची काढलेली सहल ही गोष्ट वाचताना अत्यंत आनंद
देते. वाघ येतात म्हणून जलकुंड नको, झाडावर आलेल्या वेलींमुळे झाडं पडतं अशा अनेक
चुकीच्या समजुती खोडून काढत प्रत्यक्ष त्यांना या गोष्टी दाखविण्याचे काम लेखकाने या
कालावधीमध्ये केलेले दिसते. आदिवासी मंडळी वनस्पतींची फळं, फूलं, पानं, फांद्या,
डहाळया, खोडं इ. भाग वापरतात. कोणत्या झाडाचा ते कसा आणि कशासाठी वापर
करतात हे अभ्यासाअंती लेखकाने या ठिकाणी मांडले आहे.
अशा ठिकाणी काम करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग असणे महत्त्वाचे असते हे
अनुभवाअंती लेखकाने या ठिकाणी मांडले आहे. याबरोबरच जंगलाचं विरळीकरण, त्याची
कारणे, प्लॅस्टिकचा कचरा, व्याघ्र पर्यटक अशा अनेक गोष्टींवर या पुस्तकाच्या रूपाने
लेखकाने भाष्य केलेले आहे.
ताकद आणि कमकुवत बाजू – पुस्तकामध्ये कोणतीही ठराविक पात्र नाहीत तर पिटेझरी येथे
वास्तव्यास असताना आलेले अनुभव या ठिकाणी लेखकाने मांडलेले आहे. स्वतःच्या
अनुभवातून आलेले कथन वास्तव दर्शविणारे असल्याचे दिसते. जसे अनुभव आले त्याप्रमाणे
ते लिहिलेले आहेत. त्यामुळे ठराविक एका गोष्टीविषयी संपूर्ण माहिती यामध्ये आलेली
नाही. लेखकाला आलेेले अनुभव कथन म्हणून हे छान आहे पण त्याला विशिष्ट असा साचा
नाही. लिंक नाही.
वैयक्तिक विचार – पर्यावरणाविषयी आवड असणा-या व्यक्तीला पुस्तक अत्यंत आनंद देणारे
आहे. आदिवासींसाठी काम करणारे आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणा-या लोकांना हा
एक उत्तम वस्तुपाठ आहे कारण जंगलामध्ये काम करताना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे
लागते व आपला विचार करण्याचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे याची माहिती या
पुस्तकातून चांगल्या प्रकारे मिळेल असे वाटते.
निष्कर्ष – पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. प्राणी, वनस्पती, आदिवासी जीवन अशा
एका वेगळया जगात आपल्याला घेउन जाते.