Share

लेखक शरद वाविस्कर यांना व्यवस्था आणि स्वातंत्र्य एकाच नाण्यांच्या दोन बाजू वाटतात. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य स्वीकारायचे तर व्यवस्थेला नाकाराव लागतं. दोनपैकी एकाचीच निवड करायची असते, मात्र जीवन जगतांना क्षणोक्षणी आपला व्यवस्थेशी संबंध येतो. व्यवस्थेशी फटकून वागून तुमचे चालणे, धावणे वा प्रगतीला जो गतीरोध येतो त्याचे फारसे संयुक्तिक उत्तर येथे मिळतेच असे वाटत नाही, मात्र कुंठित, नकारात्म जगण्यापेक्षा व्यवस्थेशी दोन हात करत, संघर्ष करीत जगणे केव्हाही श्रेष्ठच ! निरंकुश होत जाणाऱ्या व्यवस्थेच्या साखळदंडातून सुटका करून अस्तित्वाच्या जाणिवेपर्यंतचा प्रवास सर्वसामान्यांच्या किंवा सर्वांच्याच कुवतीचा असू शकत नाही कारण बदलत्या व्यवस्थेच्या निरंकुशतेच्या नवनव्या स्वरुपाचे तिलिस्म उघडणे अर्थातच अवघड बाब असते. ते उघडण्याचे काम भाषाशिक्षण, तत्वज्ञान तथा समजशक्तीला अधिक महत्व देणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांना कमी वयात त्यांच्या कष्ट घेण्याच्या कार्यशिलते मुळे त्यांना प्राप्त झालेले दिसते.
प्रतिकूल परिस्थितीतून जात असतांना अपयशानंतर निरर्थकते विरुद्ध विद्रोह करण्याचे सामर्थ्य आणि इच्छाशक्ती त्यांना मिळत गेली कारण अंतरंगाच्या विचारविश्वात अमुल्य स्ट्रोईक सामुराईचा दृष्टिकोन होता. प्रा. दिलिप विद्यार्थ्यांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे कर्तव्यदक्ष शिक्षक तसेच डॉ. के. बी. पाटलांसारखे प्राचार्य उन्हातल्या सावलीसारखे भूराला लाभले. उच्च शिक्षणाच्या गेटपर्यंत पोहचण्याच्या पूरा मार्गातील इंग्रजी नावाच्या डाखिणीवर भूराने मजूरदारी करतांनाच मात केली आणि इंग्रजीला वळसा घालून पुढे जाण्याचा भित्रा विचार मागे पाडला.
आपल्या आईलाही आ ह साळुंखे यांचे ‘विद्रोही तुकाराम ‘वाचायला देणारा विद्यार्थी ‘आपण हाताला जी पुस्तक लागतात ती वाचत नसून हाताला जी पुस्तकं लागू दिली जातात वाचत असतो, ‘हे लवकरच ओळखू शकतो. नियोजित अभ्यास आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी करून कृतीशिलतेतून निर्णयक्षमता वाढवितो. अभ्यासाने स्पष्टता येते आणि परिश्रम भीतीची जागा आत्म‌विश्वासाने व्याप्त करतो. व्यवस्था सामान्यांसाठी आणि गरजूंसाठी अनुकूल बनल्यास शिक्षणसंघर्ष कमी होऊ शकतो मात्र व्यवस्था वस्तूनिष्ठ घटक उपलब्ध करून देत नाही आणि फक्त व्यक्तिनिष्ठ घटकांवर जबाबदारी टाकून लोकांना आत्मनिर्भरतेचे कोरडे उपदेश लेखकाला व्यवस्थेपासून दूर असणा-या लोकांची
क्रूर थट्टा करण्याचा प्रकार वाटतो , लेखकाचा जीवन परिवर्तनावर दाट विश्वास आहे मात्र सांस्कृतिक ठेकेदाराच्या नियोजित हस्तक्षेपामुळे दैववादाला खतपाणी मिळते त्यामुळे ‘मेरीटोरीअस ‘ मंडळीसाठी व्यवस्था आडवी पडलेली असते तर बहुसंख्य मूलांमुलीसाठी ती ताठ उभी असते. कारण त्यांच्याकडे आर्थिक भांडवलासोबतच व्यवस्थामान्य, भाषिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक भांडवल नसतं. स्पेशल इंग्रजी ऐवजी फंक्शनल इंग्रजी अनुकूल व्यवस्थेने जेव्हा उपलब्ध करून दिली तेव्हा शिक्षणासाठी पुरक, योग्य भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर व्यक्तिनिष्ठ घटकांनासुध्दा चालना मिळू शकते असा विश्वास शरदमध्ये निर्माण झाला. ग्रामर अभ्यास डिक्शनरी पाठांतर, रेडिओ आणि ऑडियो रेकॉर्डर ऐकण्याच्या सवयीने इंग्रजी व फ्रेंच भाषा आत्मसात केली. त्यासाठी ‘विद्‌यार्थ्यांनों जागृत व्हा ‘चा धडा देणारे, मुडद्यामध्ये प्राण फुंकणारे मूकनायक बाबासाहेबामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली होती याची आठवण लेखक करून देतात.
विदयार्थी जीवनातील साबणांच्य कंपनीतील मेहनतीच्या कामाने श्रमाचे मोल अधिक पटल्याचे लेखक सांगतात.
इन्टेसिव्ह लैंग्वेज लर्निंग प्लॅनमुळे अपेक्षेपेक्षा जास्त यश आलं होतं. फ्रेंच भाषा अवगत करून फ्रेंच तत्वज्ञान फ्रेंच भाषेत शिकण्याच भाषा कौशल्य अवगत केलं होत. लेखकाने विचारी मनुष्यात स्टोईसिज्मचा शिरकाव का होतो ते स्वतः अनुभवलं होत. स्वतःशी व निसर्गाशी संवाद करून जीवनातील निरर्थकतेला लेखक सातत्याने दूर करण्याचा प्रयत्न करतो, कृतिशिलतेला व अर्थपूर्णतेलाजवळ करतो
“ज्यूडीथ” फ्रेंच मैत्रीणीच्या शिफार‌शीमुळे संधीची समानता प्राप्त होऊन पुढे संपूर्ण जग प्रवासाची लेखकाला संधी मिळते. शिक्षणासाठी जगातील वेगवेगळ्या नामांकित विद्यापीठातील शिक्षणप्रवास प्रत्यक्ष वाचून अनुभूती घ्यावा असा सर्व वृतांत आहे.
ग्रामिण परिसरात (रातेर. जी धूळे) अभावग्रस्त शेतकरी कुटुंबात जन्मास आलेला भूरा स्वाभिमान, कर्मश्रध्दा आणि व्यक्तिनिष्ठा बाळगता खाचखळगे, हेतूपुरस्पर निर्माण केलेल्या कृत्रीम अडथळ्यांना न जुमानता इंग्रजी जाणि फ्रेंच भाषाशिक्षणाची तसेच तत्वज्ञान विष‌याच्या आकर्षणातून व्यवस्था अनुकूल नसतानाही परकीय भाषा स्वबळावर आत्मसात करतो. मार्क्स , अल्थूझर, ग्राम्शी यांचे विश्वतत्वज्ञान पचवत महात्मा फुले, शिवाजी महाराज तथा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानापर्यंत पोहचण्याचा ‘भूरा ते जेएनयू प्रा शरद बाविस्करपर्यंतचा प्रवास’ अत्यंत प्रेरणादायी व मनोबल वाढविणारा आहे. प्रत्येक व्यक्तीचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते ती माणसाला संकटात, एकटे पडलेले असतांना एकाकीपणातून गिराशेतून, व्यवस्थाचक्रव्यूहातून जगाच्या उलट्या प्रवाहात वाहत असतांना, अक्षरशः डूबत असतांनाही आई आणि आईचा विचार तुम्हाला चिखलातून वर काढतो,डूबतानाही वाचवतो, व्यवस्थेच्या चक्रव्युहातून बाहेर काढतो , रडण्यापेक्षा लढणे महत्वाच करते हे पटवून देतो. प्रश्नाला, समस्येला घ्यारून संपवण्यासाठी थिजण्यापेक्षा चंदनाप्रमाण झिजण्याचे गीतायण तत्वज्ञान् श्रेष्ठ ठरवत आळसावर मात करण्याचे शिकवितो नि व्यक्तीला कर्मशील बनवितो. भारतात ठायीठायी साखळदंड बनवणारी जात विषमता आणि आर्थिक विषमतेशीही प्रसंगी लढण्याचे बळ चांगला क्रांतीकारी विचार तथा आईचा विचार तुम्हाला देऊन तुम्हाला घडवितो, समर्थ बनवितो. संवेद‌नशिलता आणि वैचारिक शिस्तीचे जतन करतांना जीवघेण्या परीक्षांनाही तोंड देऊन संपूर्णतः शरण न जाता निराश न होता कर्मसिद्धात व सम्यक विचाराने लढून यशस्वी होण्याची, सिद्ध होण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. अर्थातच ही बाब सोपी नसते मात्र दुर्बलाच्यांही आवाक्यातली होऊ शकते हा आशावाद आणि प्रेरणा देण्याचे काम प्रा. शरद बाविस्करांचा ‘भूरा ‘नावाचा तत्वज्ञानाचा आत्मकथनपर ग्रंथ करतांना दिसतो.

कु. संगिता रामजी भगत् संशोधक वि‌द्यार्थी, मराठी विभागा सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ: गणेशखिंड पुणे, ४११००७

Related Posts

नटसम्राट

ASHWINI MALEKAR
Shareनटसम्राट’ या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपिअरच्या ‘किंग लियर’ने शिरवाडकरांच्या लेखनाला चलना दिली असली तरी त्यानंतर...
Read More