Review By Prof. Suroshe Shailesh Waghaji, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल्या “मन में है विश्वास ” या पुस्तकामध्ये त्यांनी वाईट परिस्थितीमध्ये आपल्यावर आलेलं संकट कस दूर करायचं ,त्याला कस समोर जाऊन त्या संकटावर मात करायची आणि त्यावर विजय मिळवायचा याच आगळ वेगळ उदाहरण त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवना मधून दिलेलं आहे. खर तर माणूस गरिबीमध्ये जन्माला येणं ही त्याची चूक नाहीये ,पण गरिबीमध्ये मरण हे त्याची चूक असू शकते. लेखकांनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल ती परिस्थिती खूप हलाखीची होती परंतु त्यांचे स्वप्न आणि त्यांचे ध्येय एवढे मोठे होते की त्यांच्या ध्येयापुढे आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांपुढे त्यांना झोप लागत नव्हती. खरंच मला तर अस वाटते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये असताना “मन में है विश्वास ” हे पुस्तक वाचावं हे पुस्तक एक उत्तम वाचन अनुभव देणारं आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने जीवनातील विश्वास आणि संघर्ष यांचा सखोल अभ्यास केला आहे. लेखक विश्वास नांगरे पाटील, हे एक प्रभावी व्यक्तिमत्व असलेले आणि विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये योगदान देणारे आहेत. त्यांच्या पुस्तकात, त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव, शिकवणी आणि मूल्ये यांचा संगम केला आहे, त्यांच्या लेखन अनुभवाने शालेय विद्यार्थी प्रेरित होतात. पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने त्यांचे व्यक्तिगत अनुभव, परिवार आणि समाजातील संघर्ष यांच्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. हे अनुभव विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा ,एक नवीन दृष्टिकोन देतात आणि जीवनातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन करतात. त्यांची लेखन शैली सुस्पष्ट आहे आणि त्यात एक प्रकारचा संवादात्मक अनुभव आहे.
“मन में है विश्वास” हे पुस्तक केवळ आत्मविश्वास वाढविण्यासाठी नसून ते समाजातील विविध समस्यांवर विचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे. लेखकाच्या जीवनातील संघर्ष आणि अडचणी आणि त्यात त्यांनी केलेली प्रगती वाचकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. त्यांनी विश्वास ठेवण्याचे महत्त्व सांगितले असून हा विश्वास त्यांच्यासाठी फक्त आत्मविश्वासापर्यंत मर्यादित नाही तर समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे.
संपूर्ण पुस्तक वाचताना, वाचकांना एक अशी प्रेरणा मिळते की, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचा संगम आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकतो. या पुस्तकाने एक अत्यंत महत्त्वाचे संदेश दिला आहे की, कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास गमवू नका. “मन में है विश्वास” हे पुस्तक प्रेरणादायक, विचारप्रवर्तक आणि जीवनात प्रगती करण्याचे महत्त्व सांगणारे आहे. वाचकांना ते आपल्या जीवनात लागू करण्याची प्रेरणा देते.